माइनमूळ ही बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोलियस बार्बेटस आहे. ती कोलियस फेर्स्कोलाय किंवा प्लेक्ट्रँथस बार्बेटस अशा शास्त्रीय नावांनीही ओळखली जाते. माइनमूळ मूळची भारतातील असून हिमालयाच्या परिसरात वाढते. मुळे औषधी असल्यामुळे तिची लागवड ब्राझील, ईजिप्त, आफ्रिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देशांमध्ये केली जाते. महाराष्ट्रात ती कोकणच्या परिसरात, मावळ, पुरंदर, कोल्हापूर इ. ठिकाणी आढळते.

माइनमूळ (कोलियस बार्बेटस) : (१) पाने व फुलोरा असलेली वनस्पती, (२) मुळे

माइनमूळ वनस्पती ३०–६० सेंमी. उंच वाढते. मुळे जाड आणि रसाळ असतात. खोड दंडगोलाकार, जाड, उभे, काहीसे शाखायुक्त आणि तळाशी काष्ठयुक्त असते. फांद्याही काष्ठयुक्त असून त्यांवर लवदार लांब केस असतात. पाने दीर्घवर्तुळाकार-आयताकृती, विशालकोनी व दोन्ही बाजूंनी लवदार असून त्यांचा तळ निमुळता होत गेलेला असतो. पानाच्या कडांनाही रोम असतात. फुले मोठी, ६–१० च्या वेढ्यात, सुरुवातीला काहीशी जवळ व नंतर १५–३० सेंमी. लांबीच्या कणसासारख्या मंजिरीवर येतात. फुलोऱ्याच्या दांड्यावर दाट ग्रंथियुक्त रोम असतात. फुलोरा किंवा फुले ज्यांच्या बगलेत येतात अशा पानांना छदे म्हणतात. छदे मोठी व आत वळलेली असतात. फुलांची लांबी सु. २·५ सेंमी. असते. निदलपुंज जांभळट असून त्याच्या बाहेरच्या बाजूला पांढरे रोम, तर घशासारख्या भागात पांढऱ्या रोमांचे वलय असते. त्याची रचना मनुष्याच्या मुखासारखी असून त्याचे वर्णन खालचा ओठ आणि वरचा ओठ असे करतात. वरचा ओठ अंडाकृती, लघुकोनी, अखंड व शिरायुक्त असून खालच्या ओठापेक्षा थोडा लांब असतो. खालचा ओठ काहीसा समान, अरुंद, त्रिकोनी व टोकदार अशा चार दातांचा बनलेला असतो. दलपुंज फिकट जांभळा किंवा निळा आणि सु. २ सेंमी. लांब असून नलिका जवळपास ९० अंशांनी वाकलेली असते. मुख तिरपे असते; वरचा ओठ आखूड, उभा व चार उथळ भागांचा असून तळाशी देठाची अरुंद मान बनते. तो नौकाकृती असतो आणि वरच्या बाजूला असा वाकलेला असतो की, त्यामुळे नौकाकृती भाग अरुंद मानेच्या पुढे क्षितिजसमांतर डोकावतो. फळ आठळीयुक्त कपालिका प्रकारचे असून गोल, लहान आणि गुळगुळीत असते.

माइनमूळ वनस्पती चवीला तिखट व गोड असते. ती भूक वाढविणारी असून कफ व शीतज्वर यांचा नाश करते. सूज, प्लीहा, जलोदर व मूळव्याध यांच्या विकारावर मुळे वापरतात. दमा, जुनाट खोकला, हृदयविकार, पोटात दुखणे, अपचन, श्‍वसनाचे विकार, मज्जासंस्थेचे विकार, काचबिंदू इत्यादींच्या उपचारांवर माईनमूळ उपयोगी असते. मुळांमध्ये फोर्स्कोलीन नावाचे औषधी संयुग असते. ते मूत्रविकार, डोळ्यांचे विकार, कर्करोग इ. आजारांवर वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये वापरतात. मुळांचे लोणचे तयार करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा