अमोनियम आयन (NH4)+

अम्‍लांची  अमोनियासह किंवा त्याच्या पाण्याची विद्रावाशी विक्रिया होण्याने अमोनियाची लवणे तयार होतात. त्याच्यात NH4+ हा रंगहीन आयन (विद्युत् भारित मूलक) असतो. त्यामुळे अमोनियाची लवणे सामान्यतः रंगहीन असतात. त्यांच्यातील धनायन (ऋण विद्युत् भारित आयन) रंगीत असला तर मात्र ती रंगीत असतात. उदा., नारिंगी रंगाचे अमोनियम डायक्रोमेट [(NH4)2Cr2O7] अमोनियाची बहुतेक सर्व लवणे पाण्यात विरघळतात व ती तीव्र जलीयविच्छेद्य (hydrolytic, पाण्याची भर घातली असता दोन विभाग होणारी) असतात. तीव्र अम्‍लांपासून तयार झालेल्या लवणांचे पाण्यातील विद्रावात जलीयविच्छेदन होत असल्यामुळे ते विद्राव अम्‍लीय असतात. अमोनियाच्या लवणांची विद्राव्यता एकंदरीत क्षारांच्या (अल्कलींच्या) लवणांसारखी, विशेषतः सोडियमाच्या लवणासारखी, असते व क्षारांच्या लवणांच्या मानाने ती पुष्कळच बाष्पनशील असतात व बाष्पीभवनात त्यांचे कमी-अधिक अपघटन होते.

 

 

काही महत्त्वाची अमोनियम लवणे :

(१) अमोनियम ॲसिटेट [NH4.C2H3O2] : कापड रंगविण्यासाठी तसेच औषधांत कफ सुटण्यासाठी, घाम येण्यासाठी व लघवी होण्यासाठी सौम्य द्रव्य म्हणून याचा उपयोग होतो.

(२) अमोनियम कार्बोनेट [(NH4)2CO3] : अमोनियम सल्फेट व कॅल्शियम कार्बोनेट यांचे मिश्रण तापवून किंवा एखाद्या शिशाच्या भांड्यातून अमोनिया, कार्बन डाय-ऑक्साइड व वाफ यांचे मिश्रण जाईल असे करून हे लवण तयार केले जाते. उघड्या जागेत राहिल्यावर त्याचे अपघटन होऊन अमोनियम बायकार्बोनेट NH4HCO3 तयार होते. बाजारी अमोनियम कार्बोनेटात बायकार्बोनेट कमी-अधिक प्रमाणात असते.

हुंगण्याचे औषध म्हणूनही किंवा कफ सुटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बेकिंग पूड (भिजविलेल्या पिठात कार्बन डाय-ऑक्साइड वायू निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी पूड) म्हणूनही त्याचा उपयोग करतात.

(३) अमोनियम क्लोराइड [NH4Cl] : साल अमोनियाक, अमोनियम म्यूरिएट, नवसागर या नावांनीही ओळखले जाते.

ज्वालामुखींच्या जवळपासच्या भागात नवसागर नैसर्गिक रीत्या आढळतो. हायड्रोक्लोरिक अम्ल व अमोनिया वायू यांपासून शुध्द नवसागर मिळतो. अमोनियम सल्फेट आणि सोडियम क्लोराइड यांचा जलीय विद्राव तापविला म्हणजे सोडियम सल्फेट वेगळे होते व नवसागर विरघळलेल्या रूपात विद्रावात राहतो. या विद्रावापासून स्फटिकीकरणाने नवसागर वेगळा करून शुध्द करतात. सॉल्व्हे पध्दतीने धुण्याचा सोडा बनविताना उपपदार्थ म्हणून नवसागर मिळतो.

गॅल्व्हानीकरण (जस्ताचा मुलामा देणे), रंजनक्रिया, कॅलिको छपाई इत्यादींमध्ये नवसागराचा उपयोग होतो.

 (४) अमोनियम नायट्राइट [NH4NO2] : याचे तापविल्यावर अपघटन होऊन नायट्रोजन व पाणी ही तयार होतात. सामान्य तापमानातही तसेच पण सावकाश अपघटन होते.

शुद्ध नायट्रोजन तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

(५) अमोनियम नायट्रेट [NH4NO3] : आर्द्रताशोषक असल्यामुळे त्याचे कण चिकटून टणक गोळे किंवा ढेकळे (विशेषतः ओलसर हवेत) तयार होतात आणि काही परिस्थितींत ते स्फोटक असते.

मुख्यतः खत म्हणून तसेच स्फोटक द्रव्ये, नायट्रस ऑक्साइड तयार करण्यासाठी व किण्वन (जैव पदार्थाचे अपघटन होण्याची प्रक्रिया, ⟶ किण्वन) करून सायट्रिक अम्‍ल तयार करण्यामध्ये याचा उपयोग होतो.

(६) अमोनियम फॉस्फेटे : यांचे मोनो-अमोनियम फॉस्फेट NH4H2PO4, डाय-अमोनियम फॉस्फेट (NH4)2HPO4 व ट्राय-अमोनियम फॉस्फेट (NH4)3PO4 असे तीन प्रकार असतात. त्यांपैकी ट्राय- अमोनियम फॉस्फेट अस्थिर असून हवेत राहिल्यावर त्याच्यातील काही अमोनिया निघून जाऊन त्याचे डाय-अमोनियम फॉस्फेट तयार होते. मोनो- व डाय-अमोनियम फॉस्फेटांचे स्फटिक किंवा त्यांची पूड पांढरी असते. ही दोन्ही फॉस्फेटे पाण्यात सहज विरघळतात. मोनो-अमोनियम फॉस्फेटाचा विद्राव किंचित अम्‍लीय व डाय-अमोनियम फॉस्फेटाचा किंचित क्षारीय असतो.

फॉस्फोरिक अम्‍ल ७५% असणाऱ्‍या विद्रावात अमोनियाची भर घालून मोनो-अमोनियम फॉस्फेट व ३५% फॉस्फोरिक अम्‍ल असणाऱ्‍या विद्रावातून अमोनिया नेऊन डाय-अमोनियम फॉस्फेट तयार केले जाते. खत म्हणून या फॉस्फेटांचा उपयोग केला जातो.

(७) अमोनियम सल्फेट [(NH4)2SO4] : बाजारी प्रतीच्या मालाला त्याच्यातील मळामुळे किंचित तपकिरी रंग आलेला असतो. विद्रावाची चव बरीच खारट असते. हे स्थिर राहत असून त्याचा द्रवांक (वितळबिंदू) १४०से. आहे. अमोनियम सल्फेटाचे व्यापारी उत्पादन करण्याच्या दोन पद्धती आहेत : (अ) सल्फ्यूरिक अम्‍लाने अमोनियाचे उदासिनीकरण करून (आ) जिप्सम पद्धती. या पद्धतीत अमोनियाचे प्रथम अमोनियम कार्बोनेट केले जाते व ४०% अमोनियम कार्बोनेट असलेल्या जलीय विद्रावाची जिप्समाच्या, CaSO4.2H2O किंवा ॲनहायड्राइटाच्या, CaSO4, सूक्ष्मकणी-चूर्णाशी विक्रिया घडवून आणतात. या विक्रियेत CaCO3 अवक्षेपित (अविद्राव्य म्हणून तळाला जाते) होते व विद्राव गाळण्याने गाळून घेतल्यावर अमोनियम सल्फेटाचा विद्राव मिळतो. वाफेने तापविलेल्या व अंशतः निर्वात असलेल्या पात्रांमधून पाणी बाष्पीभवनाने काढून टाकून स्फटिकमय अमोनियम सल्फेट मिळवितात.

अमोनियम सल्फेटाचा उपयोग मुख्यतः खत म्हणून होतो व नायट्रोजनयुक्त खतांपैकी याचा वापर सर्वांत जास्त प्रमाणात होतो.

(८) हायड्रॅझिने [NH2·NH2] :.हायड्रॅझीन हायड्रेट NH2·NH2·H2O व हायड्रॅझीन सल्फेट NH2·NH2·H2SO4. अमोनियाच्या ऑक्सिडीकरणाने बनणारी ही संयुगे महत्त्वाची आहेत. अमोनियाच्या तीव्र विद्रावात सोडियम हायपोक्लोराइट व उत्प्रेरक म्हणून थोडे जिलेटीन (सरसासारखा पदार्थ) घालून उकळल्याने हायड्रॅझीन बनते. प्रथम त्याचे सल्फ्यूरिक अम्‍लाने सल्फेट बनवितात व मग पोटॅशियम हायड्रॉक्साइडाच्या क्रियेने व नंतर ऊर्ध्वपातन करून हायड्रॅझिने बनवितात.

अग्निबाण (रॉकेट) व क्षेपणास्त्रे (फेकावयाची शस्त्रे) यांत इंधन म्हणून हायड्रॅझिनाचा वापर होतो.

तक्ता : अमोनियम लवणे – रासायनिक संरचना व गुणधर्म.
अमोनियम लवण रासायनिक संरचना गुणधर्म
(१)अमोनियम ॲसिटेट स्फटिकमय

रंगहीन

आर्द्रताशोषक

जलविद्राव्य

(२)अमोनियम कार्बोनेट स्फटिकमय

रंगहीन

पारभासी

जलविद्राव्य

उग्रवास

(३)अमोनियम क्लोराइड स्फटिकमय (तंतूसदृश)

शुभ्र रंग

गंधहीन

जलविद्राव्य

(४)अमोनियम नायट्राइट स्फटिकमय

रंगहीन

जलविद्राव्य

(५)अमोनियम नायट्रेट स्फटिकमय

रंगहीन

आर्द्रताशोषक

(६)अमोनियम फॉस्फेट स्फटिकमय

रंगहीन

जलविद्राव्य

(७)अमोनियम सल्फेट स्फटिकमय

रंगहीन

जलविद्राव्य

गंधहीन

(८)हायड्रॅझीन रंगहीन

जलविद्राव्य

बाष्पनशील

 

पहा : अमाइने, अमोनिया, नवसागर, सॉल्व्हे पध्दती, हायड्रॅझीन.