कारबॉक्सिलिक अम्लांच्या —COOH गटातील -OH चे प्रतिष्ठापन (संयुगातील एखाद्या अणूच्या जागी दुसरा अणू येणे) -NH2 या गटाने झाले म्हणजे अमाइडे सिद्ध होतात. -NH2 मधील एक अथवा दोन्ही हायड्रोजन अणू प्रतिष्ठापित झाले असतील, तर प्रतिष्ठापित अमाइडे हे अनुजात (एखाद्या संयुगापासून तयार केलेले दुसरे संयुग) मिळतात.
गुणधर्म : अम्लांपासून अमाइडे सुलभतेने बनविता येतात ती सामान्यतः घनरूप असून त्यांचे वितळबिंदू काटेकोर असतात. त्यामुळे अम्लांच्या निर्धारणात (निश्चित करण्यात) त्यांचा उपयोग होतो.
संश्लेषण पध्दती : अमाइडे सामान्यत: पुढील विक्रियांनी मिळविता येतात : (१) कार्बॉक्सिलिक अम्लाचे अनुजात (उदा., ॲसिल हॅलाइड) व अमोनिया यांची विक्रिया झाली असता अमाइडे तयार होतात.
एस्टरे, अम्ल हॅलाइडे अथवा ॲनहायड्राइडे यांवर अमोनियाची किंवा प्राथमिक व द्वितीयक अमाइनांची विक्रिया घडवून अमाइडे तयार होतात.
(२) नायट्राइलांचे आंशिक जलीय विच्छेदन (पाण्याने कमी गुंतागुंतीच्या घटकात रूपांतर करणे) करून अमाइडे मिळतात.
(६) काही धातूंपासूनही अमाइडे मिळतात, उदा., सोडामाइड (NaNH2). अकार्बनी अम्लांपासून होणाऱ्या अमाइडांत नायट्रो अमाइड (NH2.NO2 ) व सल्फामिक अम्ल (NH2.SO2.OH) यांची गणना होते.
(७) सल्फॉनिक अम्लापासून मिळणाऱ्या अमाइडांना सल्फॉनामाइडे म्हणतात. उदा., C6H5.SO2.OH पासून C6H5SO2.NH2 बेंझीनसल्फॉनामाइड मिळते.
रासायनिक विक्रिया : (१) प्रखर परिस्थितीत जलीय विच्छेदन केले तर अमाइडांपासून अम्ले मिळतात व निर्जलीकरणाने अमाइने मिळतात.
(२) हायपोहॅलाइटांच्या (उदा., सोडियम हायपोक्लोराइटाच्या) विक्रियेने अमाइडापासून एक कार्बन अणू कमी असलेल्या घटनेचे अमाइन मिळते. या विक्रियेला ‘हॉफ्मान-विक्रिया’ म्हणतात.
जेव्हा अमाइडाची ब्रोमिनासोबत (सोडियम हायड्रॉक्साइड विद्रावामधील) विक्रिया होते तेव्हा विक्रियाकारकापेक्षा एक कार्बन कमी असलेले प्राथमिक अमाइन तयार होते, तेव्हा याच विक्रियेला हॉफ्मन ब्रोमामाइड विक्रिया असे म्हणतात.
उपयोग : (१) डायमिथिल फॉर्मामाइड [H.CO.N.(CH3)2] याचा उपयोग विद्रावक (विरघळविणारा द्रव) म्हणून होतो. (२) यूरियाचा [CO(NH2)2] खत म्हणून तसेच प्लॅस्टिके आणि औषधी द्रव्ये यांच्या निर्मितीमध्ये केला जातो. (३) सल्फोनामाइडांचा सल्फा-औषधनिर्मितीमध्ये वापर केला जातो. (४) स्टियरामाइडाचा उपयोग वस्तू जलाभेद्य (पाण्याचा शिरकाव होण्यास प्रतिरोधी) करण्याकरिता केला जातो.