आ. १. ॲझाइड आयन.

ॲझाइडाचे रासायनिक सूत्र R(N3)x  असे आहे. सूत्रातील R हा सामान्यत: कोणत्याही धातूचा, हायड्रोजनाचा किंवा हॅलोजनाचा अणू किंवा अमोनियम मूलक (radical), अल्किल किंवा ॲरिल यासारखा कार्बनी गट किंवा एखादा जटिल मूलक असू शकतो व x चे मूल्य R च्या संयुजेनुसार १, २, ३,… असते.

त्यानुसार ॲझाइडांचे दोन प्रकार होतात : (अ) अकार्बनी ॲझाइडे :  उदा., सोडियम ॲझाइड (NaN3), चांदीचे ॲझाइड (AgN3), अमोनियम ॲझाइड (NH4·N3), क्लोर ॲझाइड (ClN3), आयोडीन ॲझाइड (IN3).

(ब) कार्बनी ॲझाइडे : मिथिल ॲझाइड (CH3N3), एथिल ॲझाइड (C2H5N3), फिनिल ॲझाइड (C6H5N3).

 

संश्लेषण : (१) नायट्रस ऑक्साइडाची सोडियम अमाइडासोबत विक्रिया झाली असता सोडियम ॲझाइड तयार होते.

 

(२) ॲसिल क्लोराइडाची सोडियम ॲझाइडासोबत विक्रिया झाली असता ॲसिल ॲझाइड तयार होते.

 

 

 

उपयोग : (१) काही ॲझाइडे स्फोटक असतात. उदा., शिशाचे ॲझाइड [Pb(N3)2]. टीएनटीचा स्फोट घडविण्यासाठी सुरुवातीचा विस्फोटक पदार्थ म्हणून ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. (२) सोडियम ॲझाइड स्फोटक नसते. ते पाण्यात विद्राव्य (विरघळणारे) असते. शिशाचे ॲझाइड व इतर तशीच संयुगे बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून सोडियम ॲझाइडाचा उपयोग होतो. म्हणून त्याला औद्योगिक महत्त्व आहे. (३) स्वयंचलित वाहनांमधील सुरक्षा हवा-पिशवीचा (airbag) परिचालक म्‍हणून सोडियम ॲझाइड वापरतात. उष्णता मिळताच सोडियम ॲझाइडाचे अपघटन (decompose) होते आणि तयार झालेला नायट्रोजन वायू पिशवीत भरला जातो.

(४) काही कार्बनी ॲझाइडे रॉकेट परिचालक (rocket propellant) म्हणून वापरतात.