चाकवत : (हिं. बेथुसाग, बेथुआ; गु. चील, तांको; क. चक्रवति; सं. वस्तुक, चक्रवर्ति; इं. गूजफूट, पिगवीड, वाइल्ड स्पिनॅक; लॅ. चिनोपोडियम आल्बम; कुल-चिनोपोडिएसी. ही लहान (१-२ मी. उंच) ओषधी भारतात आणि इतरत्र शेतात तण म्हणून वाढते. शारीरिक लक्षणे चिनोपोडिएसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे सर्व भाग काहीसे भुरकट; पाने जाडसर व खोड साधारण पिंगट व रेषांकित व शाखायुक्त; फुले लहान हिरवट असून नोव्हेंबरात येतात. बी चपटे व करडे असते. पानांमध्ये पोटॅश भरपूर असल्याने ती तांब्याची भांडी स्वच्छ करण्यास वापरतात. बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, कॅरोटीन व ‘क’ जीवनसत्त्वही असते. ही वनस्पती शीतल, सारक व कृमिनाशक आहे. पालेभाजी म्हणून या वनस्पतीचा उपयोग करतात.

हिमालयाच्या पश्चिम भागात व महाराष्ट्रात हे पीक घेतात. याला मध्यम काळी निचऱ्याची जमीन लागते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २० – २५ टन शेणखत घालून कुळवितात व ३.६ X १.८ मी. आकाराचे वाफे करून त्यांत हेक्टरी ४-५ किग्रॅ. बी फोकून जमिनीत मिसळून पाणी देतात. पुढे दर ८ दिवसांनी पाणी देतात. बी टाकल्यापासून पाच सहा आठवड्यांनी रोपे पालेभाजी म्हणून विक्रीसाठी उपटून घेतात. या पिकावर रोगराई विशेष आढळत नाही. हेक्टरी ८,००० – ९,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते. क्रमांक ११ या संशोधित नवीन वाणाची पाने हिरवी असून देठ गुलाबी असतात. त्याचे उत्पन्न स्थानिक वाणापेक्षा १६ टक्के अधिक येते.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.