अजमोदा ही अंबेलिफेरी कुलातील वनस्पती तिचे शास्त्रीय नाव एपियम ग्रॅव्हिओलेन्स आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य सागरी प्रदेशातील आहे. तिची लागवड सर्वांत प्रथम फ्रान्समध्ये करण्यात आली. भारतात ती वायव्य हिमालयाचा पायथा, पंजाब व उत्तर प्रदेश या भागांत वाढते. या वनस्पतीत औषधी गुणधर्म असल्यामुळे ते नगदी पीक म्हणून घेतले जाते. तिची मुळे मांसल असून त्यावर लांब दांड्याच्या संयुक्त पानांचा झुबका असतो. पांढर्या रंगाचा फुलोरा असलेली अजमोदा वनस्पती सु. १ मी. उंच वाढते. तिचे दांडे रसाळ आणि मोठे असून व्यापारी दृष्टिकोनातून कृत्रिम प्रकाशबंदीने ते अधिक पांढरट बनविता येतात. फळे शुष्क, गर्द पिंगट आणि बारीक रेषांकित असतात.अजमोदा फळांचे तेल सुंगधी द्रव्य म्हणून वापरतात. मुळांचा उपयोग विविध आजारांवरील औषधांत केला जातो. शामक, मूत्रल (लघवी साफ करणारी), सूज व वेदना कमी करणारी औषधे मुळांपासून करतात. बिया उत्तेजक, पौष्टिक, वायुनाशी व मूत्रल आहेत, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. बियांतील स्वादिष्ट तेल पदार्थांना खमंगपणा आणते.
- Post published:11/09/2019
- Post author:नरेंद्र देशमुख
- Post category:जीवसृष्टी आणि पर्यावरण / वनस्पती
- Post comments:0 Comments