(इंडियन गोल्डन ओरिओली). पिवळ्या रंगाचा एक आकर्षक पक्षी. हळद्या पक्ष्याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील ओरिओलिडी पक्षिकुलात केला जातो. त्याच्या ओरिओलस प्रजातीत सु. ३० जाती असून त्या यूरोप, आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडांत दिसून येतात. भारतात आढळणाऱ्या हळद्या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ओरिओलस कुंडू आहे. त्याच्या भडक पिवळ्या रंगामुळेच त्याला ‘हळद्या’ असे स्थानिक नाव पडले असावे. याखेरीज ‘हळदी, पीलक, कांचन, सुवर्ण मंजू’ या नावांनीही तो ओळखला जातो.

हळद्या (ओरिओलस कुंडू )

हळद्या पक्षी आकारमानाने साळुंकीएवढा असून त्याची लांबी १३.६–१४ सेंमी. लांब असते. नराच्या शरीराचा रंग सोनेरी पिवळा असून पंखांचा व शेपटीचा भाग काळा असतो. नराच्या शरीराचा पिवळा भाग मादीमध्ये हिरवट-पिवळा असतो, छाती व पोटावरील भागावर तपकिरी रंगाच्या उठावदार रेषा असतात, तर नराच्या शरीराचा काळा भाग मादीमध्ये तपकिरी असतो. डोळे किरमिजी असून चोच फिकट गुलाबी रंगाची, अणकुचीदार व मजबूत असते. चोचीच्या तळाकडून एक काळा पट्टा निघून तो गळ्यामधून मागे गेलेला असतो. पाय काळसर रंगाचे असून पायाच्या एकूण चार बोटांपैकी तीन बोटे पुढील बाजूस तर चौथे बोट मागे वळलेले असते. बोटांच्या अशा रचनेमुळे त्याला फांदी घट्ट धरून ठेवण्यास मदत होते.

हळद्या वेगवेगळ्या अधिवासात आढळतो. तो पानझडी वने, निमसदाहरित वने, वनांच्या कडेला, खारफुटी वने, तुरळक झाडी असलेला प्रदेश, बागा, उद्याने अशा जागी दिसून येतो. वड, उंबर, पिंपळ अशा वृक्षांची फळे आणि लहान कीटक तो खातो. तो फुलांतील मकरंददेखील पितो. त्याचा आवाज मोठा असला तरी मंजूळ असतो. एक प्रकारच्या ‘पीलोलोऽऽ’ अशा आवाजात तो शीळ घालतो. हळद्या वृक्षवासी असून दाट पाने असलेल्या झाडांवर तो राहतो आणि सहसा जमिनीवर उतरत नाही. तो वेगाने उडू शकतो; परंतु शक्यतो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यापुरता उडतो. अनेकदा कमी खोल असलेल्या पाण्यात पुन:पुन्हा डुबक्या मारून तो स्नान करतो.

बुरखाधारी हळद्या (ओरिओलस झॅन्थोर्नस )

हळद्याचा प्रजननकाळ एप्रिल ते ऑगस्ट हा असतो. मादी बारीक गवत व झाडांच्या सालीचे मजबूत तंतू विणून वाटीसारखे घरटे तयार करते. घरटे झाडाच्या आडव्या फांदीवर व शक्यतो फांदीच्या टोकाला असते. कोतवाल पक्षी ज्या झाडावर घरटे बांधतो, त्याच्या जवळपास हळद्या घरटे बांधतो. मादी घरट्यात ३-४ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यांवर लालसर तपकिरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके असतात. अंडी उबविणे, पिलांना भरविणे ही कामे नर व मादी दोघे मिळून करतात. तसेच नर व मादी मिळून कावळा व शिकरा या पक्ष्यांपासून पिलांचे संरक्षण करतात. पिले मोठी झाली की, नर की मादी ते ओळखता येते. हळद्याचा आयु:काल ९ ते १० वर्षांचा असतो.

हळद्या पक्ष्याची . झॅन्थोर्नस  नावाची जाती भारतात आढळते. त्याचे आकारमान व रंग . कुंडू  यासारखा असतो; परंतु डोके, गळा व छातीचा वरील भाग काळा असतो. त्याला बुरखाधारी हळद्या किंवा काळी टोपीवाला हळद्या असेही म्हणतात. याचसारखी दिसणारी . लार्व्हाटस  ही जाती आफ्रिकेमध्ये आढळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा