सूर्यफूल (हेलिअँथस ॲन्यूस) : फुलांसहित वनस्पती.

(सनफ्लॉवर). खाद्यतेल तसेच तेलबिया यांसाठी लागवड केली जाणारी एक वनस्पती. सूर्यफूल ही वर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हेलिअँथस ॲन्यूस आहे. ती मूळची मेक्सिकोतील असून इ.स.पू. २६०० वर्षांपूर्वी तेथे लागवडीखाली आणली गेली. झेंडू, शेवंती, डेलिया इ. वनस्पतीही ॲस्टरेसी कुलातील आहेत. हेलिअँथस प्रजातीत सु. ७० जाती असून त्या सर्वांना सूर्यफूल म्हणतात. त्यांपैकी हे. ॲन्यूस ही वनस्पती सूर्यफूल म्हणून विशिष्ट मानली जाते. हे. ॲन्यूसच्या वन्य प्रकारात फांद्याच्या टोकाला अनेक पुष्पबंध फुलोरे येतात, तर लागवडीखाली असलेल्या जातीमध्ये फांद्याच्या टोकाला एक मोठा फुलोरा (पुष्पबंध) येतो. सोळाव्या शतकात सूर्यफुलाच्या बिया अमेरिकेतून यूरोपात तेलासाठी आणल्या गेल्या आणि तेव्हापासून सूर्यफुलाच्या तेलाबरोबर या वनस्पतीचा प्रसार घडून आला.

सूर्यफूल ही वनस्पती १—४ मी. उंच वाढते; खोड बळकट, जाड व खरखरीत असते. पाने साधी, एकाआड एक, करवती व लांब टोकांची असून पानांच्या दोन्ही बाजू खरखरीत असतात. क्वचित खाली फांद्याच्या टोकाला पिवळी, आकर्षक तबकासारखे (स्तबक) फुलोरे येतात. फुलोरे सामान्यपणे पावसाळ्याच्या शेवटी व थंडीत येतात. त्यांचा व्यास १०—१५ सेंमी. असतो. बाहेरच्या कडेला पाकळ्यांसारखी दिसणारी फुले असतात. त्यांना किरणपुष्पे म्हणतात. ती वंध्य आणि जिभेच्या आकाराची म्हणजे जिव्हिकाकृती असून रंगाने पिवळी, लाल, नारिंगी किंवा इतर रंगाची असतात. मध्यभागी असलेल्या फुलांना ‘बिंबपुष्पे’ म्हणतात. ती गर्द पिवळी, द्विलिंगी आणि नलिकाकृती असतात. बिंबपुष्पे पक्व झाली की त्यांचे फळांत रूपांतर होते. फळे कृत्स्न प्रकारची असून किंचित दबलेली असतात. या फळांनाच सामान्यपणे ‘सूर्यफुलाच्या बिया’ म्हणतात. सूर्यफुलाच्या फळांवरची टरफले म्हणजे तुसे काढून टाकली की गर मिळतो.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलातील बिंबपुष्पांची रचना सर्पिलाकार असते. प्रत्येक बिंबपुष्प हे पुढच्या बिंबपुष्पाकडे साधारणपणे १३७.५ अंशांनी कललेले असते. याला ‘सुवर्ण कोन’ (गोल्डन अँगल) म्हणतात. सुवर्ण कोन ही संकल्पना वर्तुळाशी निगडित आहे. सूर्यफुलातील बिंबपुष्पांच्या या विशिष्ट सर्पिलाकार रचनेमुळे कमीत कमी जागेत अधिकाधिक बिया तयार होतात.

सूर्यफुलाच्या १०० ग्रॅ. बियांमध्ये पाणी (५%), कर्बोदके (२०%), मेद (५१%) आणि प्रथिने-समूह (२१%) असतात. बिया प्रथिने, तंतुमय पदार्थ, -समूह जीवनसत्त्वे आणि -जीवनसत्त्व यांचा स्रोत मानली जातात. सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५—५०% असते. तेलात -जीवनसत्त्व, ओलेइक आम्ल व लिनोलीइक आम्ल यांचे मिश्रण असते. आहाराच्या दृष्टीने ते चांगले मानले जाते. अनेक देशांत दैनंदिन आहारात सूर्यफुलाचे तेल स्वयंपाकासाठी वापरतात. तेल पिवळसर व गोड असते. त्यापासून लोणी बनवितात. लहान क्षेत्रात व कमी वेळेत या सूर्यफुलाच्या पिकापासून अधिक तेल मिळते. याशिवाय त्यापासून जनावरांना पेंड तसेच खत किंवा इंधन म्हणून वापरता येते. अंग-मालिश करण्यासाठी तसेच रंग, रोगण (व्हार्निश), प्लॅस्टिक इ. बनविण्यासाठी सूर्यफुलाच्या तेलाचा उपयोग करतात. खोडापासून रेशमासारखा तलम धागा तयार करतात. काही देशांत सूर्यफुलांच्या बिया भाजून खाल्ल्या जातात किंवा मोड आणून खातात. सूर्यफुलाचे तेल डीझेलमध्ये मिसळून इंधन म्हणून वापरता येते.

सूर्यफुलांच्या कळ्यांची वाढ होत असताना त्या सूर्याच्या दिशेने कलत राहतात आणि पूर्ण बहरली की त्यांचे कलणे थांबते. या आविष्काराला सूर्य-अनुवर्तन (हेलिओट्रोपिझम) म्हणतात.