प्राचीन ईजिप्शियन सूर्यदेवता. ईजिप्शियन पुराणकथांमध्ये तिचा उल्लेख ‘विश्वनिर्माता’ असा आढळतो. ‘रा’ तसेच ‘री’ असे या देवतेचे उल्लेख आढळतात. ‘रा’ ही ‘मध्यान्ह सूर्यदेवता’ (Noon Sun) आहे. ईजिप्तमधील पाचव्या राजवंशाच्या काळात म्हणजे इ.स.पू. २४-२५ व्या शतकात या देवतेला मुख्य स्थान मिळाल्याचे दिसते. अनेक राजांची ती उपास्य देवता होती. ईजिप्तमधील धर्मसंस्थेने या देवतेला उच्च स्थान दिले. या देवतेचे मुख्य मंदिर हीलिऑपोलिस येथे होते.
ईजिप्तमधील पुराणकथांनुसार या विश्वाची निर्मिती होण्यापूर्वी ‘नन’ किंवा ‘नु’ नावाचा आद्यसागर होता. या सागराच्या उदरामध्ये संपूर्ण विश्वाच्या निर्मितीची बीजे धारण करणारी ‘आतुम’ नावाची देवता होती. ती आपले तेज टिकविण्यासाठी कमळाच्या कळीमध्ये डोळे बंद करून राहत होती. एके दिवशी तेजस्वी स्वरूपात ‘रा’ देवतेच्या रूपात ती प्रकट झाली. या उत्पत्तीनंतर या देवतेपासून अनेक दांपत्ये उदयास आली आणि विश्वाची निर्मिती झाली. काही अभ्यासकांच्या मते ‘रा’ देवतेच्या अश्रूंपासून विश्वाची निर्मिती झाली असावी.
‘रा’ देवतेची पत्नी ‘रात’ किंवा ‘इउसास’ या नामाभिधानाने ईजिप्शियन पुराणकथांमध्ये ओळखली जाते. रा देवतेची शक्ती हे तिचे डोळे आहेत. या देवतेला सेखमेट, हाथोर आणि बास्टेट अशा तीन कन्या आहेत. तिच्या नेत्रातील अग्नीने सेखमेट देवतेला निर्माण केले. सेखमेट ही देवता हिंसक असून ती रा देवतेचा विश्वासघात करणाऱ्यांना ठार मारते. हाथोर ही देवता शांत, दयाळू आणि क्षमाशील आहे. बास्टेट ही सभ्य आणि पालनपोषण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. काही कथांमध्ये आलेल्या उल्लेखांनुसार सेखमेट ही उग्र देवता असून ती शांत झाल्यावर हाथोर देवता होते. ती देवता बास्टेट देवतेचे पालनपोषण करते.
‘रा’ ही जवळजवळ एक हजार वर्षे विश्वनिर्माती देवता म्हणून प्रसिद्ध होती. नद्यांचे प्रवाह, मानव, तसेच अन्य देवतांचीही निर्मिती या देवतेने केली आहे, असे पुराणकथांमध्ये उल्लेख आढळतात.
‘रा’ देवतेचे वर्णन : राजपुत्राच्या स्वरूपात कमळातून जन्मणारे बालक, मस्तकाभोवती सूर्यमंडल असणारा माणूस, मेंढ्याचे मस्तक असणारा मनुष्य इ. रूपांमध्ये ही देवता आढळते. युरेअस (Uraeus) नावाच्या सर्पासह मस्तकाभोवती तेजोमंडल असणारा तसेच ससाण्याचे मस्तक असलेला मनुष्य, असे ‘रा’ देवतेचे स्वरूप विशेष प्रसिद्ध आहे. या देवतेचे फिनिक्स, बैल, मांजर, सिंह असेही स्वरूप दिसते.
प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीमध्ये ‘रा’ देवता अनेक उपास्य देवतांपैकी एक होती. कालांतराने या देवतेच्या उपासनेने इतर देवतांच्या उपासनांना व्यापले. त्यामुळे अनेक देवतांच्या नावामागे ‘रा’ किंवा ‘रे’ असे जोडले गेले. उदा., ॲमन रे, सेबेक रे, मिन रे इ. त्यामुळे देवतांची संमिश्र रूपे तयार झाली. याउलट इतर देवतांचाही तिच्यावर प्रभाव पडला. उदा., होरसच्या प्रभावामुळे तिला ससाण्याचे मस्तक प्राप्त झाले. ‘ॲपेप’ नावाचा सर्प असून तो ‘रा’ देवतेचा मुख्य शत्रू आहे. त्याचा हल्ला काही कालावधीसाठी यशस्वी होतो, तेव्हा सूर्यग्रहण होते, अशी आख्यायिका आहे.
‘रा’ देवतेचा अंतिम काळ : या देवतेला यातुविधीत पारंगत असणाऱ्या इसिस देवतेने सर्पदंश घडवला. त्यानंतर विष उतरविण्याच्या निमित्ताने या देवतेची सर्व गुपिते जाणून घेऊन तिचे साम्राज्य बळकावले. त्यानंतर लोकांनीही तिच्याविरुद्ध बंड केले. त्यांची कृतघ्नता पाहून रा देवता स्वर्गात निघून गेली. तेव्हापासून काही काळ ती तिच्या राज्यात फिरते आणि काही काळ अधोलोकात फिरते, असे मानले जाई.
संदर्भ :
- Armour, Robert A. Gods and Myths of Ancient Egypt, New York, 1986.
- Cooper, W. R. ‘The Myth Of Ra’, New York, 1877.
- https://www.ancient-egypt-online.com/egyptian-god-ra.html
समीक्षक – शकुंतला गावडे