वाळवंटे, वादळे, अव्यवस्था, हिंसा, आणि परदेशी लोकांशी संबंधित प्राचीन ईजिप्शियन देव. तो नापीक वाळवंटाचा प्रतीक असून अंधाराचेही प्रतिनिधित्व करतो, असा समज आहे. त्याचा ‘सेत’ असाही उच्चार केला जातो. सेथ हा गेब (पृथ्वी) आणि नट (आकाश) ह्या आद्य दांपत्याचा मुलगा असून ओसायरिस, इसिस, नेफ्थिस आणि थोरला होरस ह्या चौघांचा भाऊ आणि नेफ्थिसचा पती होय. त्याला नेफ्थिसपासून अनुबिस; तर सिरियन देवता अनात, फिनिशियन देवता अस्तार्त ह्या परदेशी देवतांपासून नक्रदेवता मग ही मुले झालीत.

भित्तिचित्रे आणि शिल्पांमध्ये सेथचे मुख एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा जिराफाप्रमाणे लांबुळके दाखवलेले असते. आर्दवर्कनामक आफ्रिकी प्राण्याशी त्याचे साम्य वाटते. नंतरच्या काळात त्याला प्रत्यक्ष गाढवाचेच मुख दाखवले गेले. त्याचे टोकदार कान, तिरके डोळे आणि टोकेरी शेपटी दाखवलेले असतात. उर्वरित शरीर मात्र मानवी असते.

सेथचा प्राणी हे त्याचे चित्रलिपीतील मुख्य चिन्ह आहे. लाल रंग, लाल केस असणारे प्राणी व माणसे ह्यांच्याशी त्याचा संबंध आहे. एड्फू येथील होरसच्या मंदिरात पाणघोडा किंवा डुकराच्या रूपातही सेथ दाखवलेला आहे.

ईजिप्तमध्ये ओसायरिस हे सुष्टतेचे व सेथ हे दुष्टतेचे प्रतीक मानले जाई. त्यामुळे सेथला ओसायरिसच्या राज्यातील सांस्कृतिक व भौतिक सुबत्तेबद्दल आणि प्रजेला ओसायरिसबद्दल वाटणार्‍या आपुलकीबद्दल मत्सर वाटू लागला होता. एका पुराणकथेनुसार नेफ्थिसने इसिसचे रूप घेऊन ओसायरिसला भुरळ घातली आणि त्याच्यापासून तिला अनुबिस हा मुलगा झाला. त्यामुळे सेथने ओसायरिसला मारण्याचे ठरवले. त्यानुसार एका मोठ्या उत्सवी मेजवानीचे आयोजन करून त्यासाठी ओसायरिससह अनेकांना त्याने निमंत्रण दिले. उपस्थितांसमोर एक सुंदर, रत्नांनी मढवलेली शवपेटिका ठेवून त्यात जो पाहुणा नेमका मावेल त्याला ती पेटी भेट देण्यात येईल, असे त्याने सांगितले. उपस्थित सर्वांनी त्यात झोपून पाहिले, मात्र पेटी ओसायरिसच्या मापाची असल्याने तो त्यात नेमका बसला. अशा तऱ्हेने सेथने ओसायरिसला विश्वासघाताने पेटीत बंद करून ती पेटी नाईल नदीत फेकली. ओसायरिसच्या पत्नीने, इसिसने, नेफ्थिसच्या मदतीने ती पेटी शोधून काढली; पण सेथने पुन्हा ओसायरिसला मारून त्याचे अनेक तुकडे केले व ते ईजिप्तभर इतस्तत: फेकून दिले आणि ओसायरिसचे  राज्य बळकावले. इसिसने ते तुकडे एकत्र जुळवून ओसायरिसला परत जीवंत केले.

होरस आणि सेथमधील युद्ध

ओसायरिस आणि इसिसचा मुलगा होरस यालाही मारण्याचे सेथने प्रयत्न केल्याचे उल्लेख सापडतात. नंतर वाग्युद्धात, कायदेशीर झगड्यात आणि प्रत्यक्ष युद्धात होरसने सेथचा पराभव केला व स्वतःच्या पित्याचे हक्काचे राज्य पुन्हा प्राप्त करून घेतले. ‘होरस आणि सेथमधील युद्धे’नामक एका प्राचीन रचनेत ह्या युद्धांचे वर्णन येते. एका मतानुसार थोथने ईजिप्तचे दोन भाग होरस आणि सेथ यांमध्ये वाटून देऊन त्यांचे वैर मिटवले. दुसर्‍या मतानुसार नीथने ईजिप्तची मुख्य संपन्न भूमी होरसला; तर वाळवंटी, वैराण अशी दूरची भूमी सेथला दिली, आणि त्याची भरपाई म्हणून सिरियन देवता अनात आणि फिनिशियन देवता अस्तार्त ह्या त्याला पत्नीरूपात मिळवून दिल्या.

ओंबस हे सेथच्या पंथाचे मुख्य स्थान असून सपरमेरू हे त्याच्या उपासनेचे एक प्रधान केंद्र मानले जाते. तेथे त्याच्या जोडीला त्याची पत्नी नेफ्थिसचेही स्थान आहे. जुन्या साम्राज्यात तो महत्त्वाचा मानला जाई. सूर्यदेव रा याला त्याचा शत्रू अपोफिसपासून सेथनेच वाचवले होते. दुसर्‍या राजवटीमधील पेरिबसेन राजाने आपल्या नावात सेथचे नाव जोडले होते. पहिला व दुसरा सेती ह्या राजांची प्रत्यक्ष नावेच त्याच्या नावावर बेतलेली आहेत. ह्या काळात ॲमुन रे, आणि प्ताह ह्या देवतांबरोबरीने त्याला महत्त्व होते. नव्या राजवटीत तो युद्धदेवता म्हणूनही प्रसिद्ध होता.

सूर्यदेव राचे अपोफिसपासूनरक्षण करणारा सेथ

परंतु त्याचे वाळवंट आणि वैराण जमिनीवर असणारे स्वामित्व ओसायरिसच्या संपन्न, समृद्ध साम्राज्याशी संपूर्ण विपरित असल्याने सुबत्तेचा आणि समन्वयाचा देव ओसायरिस सर्वोच्च देव ठरल्यावर वैराणपणाच्या आणि अव्यवस्थेच्या स्वामी असलेल्या सेथला खलत्व येणे अपरिहार्य ठरले. परकीय आक्रमकांकडून ईजिप्तचा पाडाव झाल्यानंतरच्या काळात सेथचे ओसायरिसशी असणारे वैर, त्याने ओसायरिसचा केलेला निर्दय खून, परदेशी पत्न्यांमुळे असणारे परदेशसंबंध आणि त्यातूनच परकीय आक्रमकांशी जोडला गेलेला संबंध ह्यांमुळे त्याला खलत्व प्राप्त झाले असावे. त्याच्या लाल रंगाशी असणार्‍या संबंधामुळे नंतर त्याचा संबंध थेट सैतानाशी लावले गेल्याचे दिसते.

संदर्भ :

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे