हॅपी ही सुपीकता आणि उत्पादकतेशी संबंधित प्राचीन ईजिप्शियन देवता होय. ही देवता नाईल नदीचे मानवी मूर्तरूप किंवा नदीच्या पुरामुळे आलेल्या समृद्धीचे प्रतीक मानली गेली आहे. लांब केस, वृद्ध स्त्रीचे भरदार स्तन आणि मोठे पोट (सृजनाचे/यशाचे निदर्शक) असलेला पुरुष, असे ह्या देवतेचे स्वरूप आहे. हे स्वरूप स्त्रीपुरुषाच्या निर्मितिक्षमतेचे संयुक्त प्रतीक मानले गेले आहे. प्राचीन ईजिप्शियन मानवता शेतीसाठी नाईल नदीच्या पाण्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याने भरदार स्तन हे पोषकतेचे प्रतीक मानले गेले. काही ठिकाणी हॅपी देवतेच्या मस्तकावर पाणवनस्पतींचा मुकुट आढळतो, तर काही ठिकाणी ती वानराचे (Baboon) मस्तक असलेली दाखवली आहे.

प्राचीन काळी हॅपीला अन्नाचा स्रोत मानले जायचे. या देवतेचा उल्लेख सर्वप्रथम राजा उनास (Unas) याच्या पिरॅमीडवरील लेखात आढळतो. जिथे नाईल देवतेने मृत राजासाठी अन्नपुरवठ्याचा उपदेश दिला आहे. त्याला पुढील जन्मात लागणारे अन्न हॅपी देवता पुरवते, असा उल्लेख आहे.

दक्षिण नाईल व उत्तर नाईल दोन्हींची दोन वेगवेगळी हॅपी दैवते मानली जात असत. दक्षिणेकडच्या हॅपी देवतेच्या मस्तकावर कमळपुष्पांचा मुकुट आणि उत्तरेकडच्या हॅपी देवतेच्या मस्तकावर पपायरसच्या पुष्पांचा मुकुट असे. दक्षिण व उत्तर ईजिप्तचे एकत्रीकरण दाखवायचे असेल, तेव्हा हॅपी देवतेच्या हातात कमळ आणि पपायरस अशी दोन्ही फुले दाखवली जात असत. भिंतीवरील कोरीवकामात तसेच काही राजांच्या सिंहासनावर कमळ आणि पपायरसची पुष्पे एकमेकांत गुंफलेली दाखवली आहेत. ज्यावरून त्या राजाचे उत्तर व दक्षिण ईजिप्त दोन्हीकडचे सार्वभौमत्व दर्शवले जाई.

एका काव्यात ईजिप्शियनांनी हॅपी देवतेची तुलना पृथ्वीवर जीवन निर्माण करणाऱ्या प्ताह आणि ख्नूम देवतांशी केलेली आहे. जल जीवनदायी असल्याने हॅपी देवतेला खूप महत्त्व होते. हॅपी देवता पराभूत झाली, तर सगळ्या देवता स्वर्गातून पडतील आणि माणसांचा मृत्यू होईल, असा समज होता.

नाईल नदीचा जिथे उगम होतो, तिथे एका गुहेत किंवा कपारीत हॅपी देवता राहते आणि नाईलला येणारा वार्षिक पूर म्हणजे हॅपी देवतेचे आगमन असे मानले जाई (Arrival of Hapi). नाईल नदीचा उगम माहीत नसल्याने नदीदेवता हॅपीविषयी लोकांच्या मनात गूढ होते. वार्षिक पूर आल्यावर मोठा उत्सव साजरा केला जाई आणि हॅपीच्या पुतळ्याची संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाई.

रा या ईजिप्शियन सूर्यदेवतेशी संबंधित एका काव्यात राने वैश्विक जलाच्या साठ्यापासून (नन) जेव्हा जगाची निर्मिती केली, तेव्हाच नदीदेखील निर्माण केली असा उल्लेख आहे. थडग्यावरील काही लेखांत हॅपी देवता स्वतःचा उल्लेख पृथ्वीचा इतिहासपूर्वकालीन (The Primeval of the Earth) असा करते. ज्यामुळे ही देवता नन (देवांचा पिता) या देवतेशी समकालीन (Coeval) मानली गेली आहे. म्हणून प्राचीन ईजिप्शियनांनी हॅपी देवतेला ननचे गुणविशेष प्रदान केले आहेत. एका आख्यायिकेनुसार ओसायरिस हॅपीच्याच (नाईल) जलावर तरंगत असताना इसिस देवतेने त्याचे तरंगणारे तुकडे एकत्र करून त्याला एकसंध केले.

थडग्यांवरील लेखांत हॅपी देवतेचे पूर्ण विकसित स्वरूप आढळते. मृतात्म्याला हॅपी देवतेचे गुण प्राप्त होण्यासाठी तिथे काही मंत्र दिलेले आहेत. मृतांच्या पुस्तकात (Book of dead) मृतात्मे हॅपी देवतेची शक्ती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करत असत.

संदर्भ :

  • Armour, A. Robert, Gods and Myths of Ancient Egypt, New York, 2003.
  • Spence, Lewis, Myths and Legends of Ancient Egypt, UK, 1998.
  • Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.

                                                                                                                                          समीक्षक : शकुंतला गावडे