एखाद्या कार्बनी संयुगातील विक्रियाशील हायड्रोजन अणूचे ॲसिटिक (CH3— CO) या गटाने प्रतिष्ठापन करण्याच्या (हायड्रोजन अणू काढून त्या जागी ॲसिटिक गट घालण्याच्या) विक्रियेला ‘ॲसिटिलीकरण’ म्हणतात. या विक्रियेला IUPAC नामकरण पध्दतीप्रमाणे एथेनॉलीकरण (ethanoylation) असे म्हणतात.

अल्कोहॉले व फिनॉले यांतील —OH गट व अमाइनांतील —NH2 गट यांमध्ये असे विक्रियाशील हायड्रोजन-अणू आहेत. ॲसिटिक क्लोराइड, ॲसिटिक ॲनहायड्राइड व कधीकधी ग्‍लेशियल ॲसिटिक अम्‍ल या कामी वापरतात.

अल्कोहॉलांचे ॲसिटिलीकरण : ॲसिटिल क्लोराइड अथवा ॲसिटिक ॲनहायड्राइड व संहत (पाण्याचे प्रमाण कमी असलेले) सल्फ्यूरिक अम्‍ल यांचे मिश्रण वापरल्यास प्राथमिक आणि द्वितीयक अल्कोहॉलांचे सहज ॲसिटिलीकरण होते. तृतीयक अल्कोहॉलांचे ॲसिटिलीकरण मात्र होत नाही. यामुळे ही विक्रिया प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक अल्कोहॉल यांचे अस्तित्व ओळखण्यास उपयोगी पडते. या विक्रियेने त्या त्या अल्कोहॉलांची, ॲसिटिक अम्‍लाची एस्टरे म्हणजे ॲसिटेटे तयार होतात.

फिनॉलावरही अशीच विक्रिया होते :

 

अमाइनांचे ॲसिटिलीकरण : वरील विक्रियाकारकांनी प्राथमिक व द्वितीयक अमाइनांचे ॲसिटिलीकरण होऊन प्रतिष्ठापित ॲसिटामाइडे मिळतात.

 

यामध्ये अमाइनो गटातील हायड्रोजन अणू ॲसिटिल गटाने प्रतिष्ठापित होतो.

प्राथमिक  अमाइनातील दोन्ही हायड्रोजन प्रतिष्ठापित करण्यासाठी विशेष प्रकारे (अतिरिक्त प्रमाणात विक्रियाकारक व उच्च तापमान वापरून) विक्रिया करावी लागते.

 

विॲसिटिलीकरण (deacetylation) : एखाद्या कार्बनी संयुगातील ॲसिटिल संघ काढून टाकण्याच्या क्रियेला  विॲसिटिलीकरण असे म्हणतात.

उपयोग : (१) विक्रिया तेले आणि चरब्या यांमध्ये असलेल्या —OH गटाचे प्रमाण ठरविण्याकरिता ॲसिटिलीकरण उपयोगी पडते. (२) ॲसिटिलीकरणाने अनेक उपयोगी संयुगे मिळतात. सेल्युलोज ॲसिटेट हे सेल्युलोज रेयॉन व चलच्चित्रपटाच्या सुरक्षित फिल्म यांच्या उत्पादनात वापरले जाते. (३) ॲसिटॅनिलाइड, ॲसिटोफेनिटिडीन ही प्रसिद्ध औषधे तयार करण्याच्या कृतीत ॲसिटिलीकरण उपयोगी पडते. सर्वत्र ताप किंवा डोकेदुखीसाठी उपयोगात असलेले ॲसिटिल सॅलिसिलिक अम्‍ल (ॲस्पिरीन) हे औषध सॅलिसिलिक अम्लाच्या ॲसिटिलीकरणाद्वारे निर्मिले जाते.

संदर्भ :

  • Fieser, L. F.: Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.

समीक्षक – भालचंद्र भणगे