जंबो : (सं. भुतघ्न, दरघर्ष; हिं. तारामिरा, सेओहा; बं. श्वेत सुर्षा; पं. जंबा, तारा, आसु; इं. रॉकेट सॅलड; लॅ. एरुका सॅटायव्हा ). मोहरी जातीतील ०·७५–१·२५ मी. उंच ओषधी. पाने १५ ते ३० सेंमी. लांब, अल्प पिच्छाकृती (काहीशी पिसासारखी); फुले पिवळी किंवा फिकट जांभळी; शेंगा फुगीर, दुहेरी साखळीत बी असलेल्या सु. २·५ सेंमी. लांब असतात.

जंबो वनस्पती : पाने व फुले.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व पंजाबमध्ये स्वतंत्र पीक किंवा गहू हरभऱ्यात याचे मिश्र पीक घेतात. स्वतंत्र पिकासाठी हेक्टरी ४·५ किग्रॅ. बी पेरतात. मिश्र पिकांसाठी १·२५—१·७५ किग्रॅ. बी लागते. ऑगस्ट-सप्टेंबरात बी पेरल्यानंतर दीड महिन्याने पिकास फुले येऊन पुढे एक महिन्याने पीक तयार होते. तेव्हा ते काढून, वाळवून त्याची मळणी करतात. कधीकधी गुरांना चारण्याकरिता किंवा भाजीकरिता हिरवेच कापतात. मिश्र पिकातून हेक्टरी ५४ ते १०० किग्रॅ. व स्वतंत्र पिकातून ४२५ ते ५०० किग्रॅ. बी मिळते.

बी व तेल जिभेला झोंबणारे व तिखट असते. बियांत तेलाचे प्रमाण १२ ते १५ टक्के असते. तेल फिकट पिवळसर असते. मोहरीच्या व सरसूच्या तेलाप्रमाणेच स्वयंपाकात, लोणच्यात आणि अंगाला चोळण्याकरिता ते वापरतात. पेंड गुरांना चारतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा