‘ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशयन्सी सिंड्रोम’ या इंग्रजी शब्दांच्या आद्याक्षरांपासून तयार झालेला शब्द. यास ‘उपार्जित प्रतिक्षमता त्रुटिजन्स लक्षणसमूह’ असे म्हणता येईल. एड्स हा ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही)’ म्हणजेच ‘मानवी प्रतिक्षमता त्रुटिजन्य विषाणू’ यापासून होणारा रोग आहे. या रोगामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत जाते आणि अन्य संसर्गामुळे (उदा., फुफ्फुसदाह, क्षय इत्यादींमुळे) मृत्यू ओढवतो. या रोगाचे विषाणू फक्त रोगप्रतिकारशक्ती कमी करतात आणि त्यांच्याशी कोठल्याही प्रकारचा संबंध नसलेले अन्य सूक्ष्मजीव वा कर्करोग रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात.

एचआयव्ही विषाणूंचे मुख्य लक्ष्य रक्तातील हेल्पर टी या प्रकारच्या लसिका श्वेतपेशी (अधिक नेमकेपणे CD4+ टी-पेशी) हे असते. या विषाणूंचा संसर्ग झाल्यावर सुरुवातीस अंग दुखून ताप येतो, भूक मंदावते व वजन घटते. हेल्पर टी पेशीची संख्या कमी होते पण कालांतराने त्यांची संख्या पूर्ववत होते. संसर्ग झाल्यावर ३-४ महिन्यांत एचआयव्हीची लागण झाल्याचे कळते. मात्र, अशा व्यक्तीत रोगाची लक्षणे दिसत नाहीत. संसर्ग झाल्यापासून लागण होईपर्यंतच्या काळाला ‘विंडो पिरियड’ म्हणतात. यानंतरच्या २ ते १० वर्षांच्या काळात हेल्पर टी-पेशी हळूहळू कमी होतात. या काळात मधूनमधून ताप येणे, शौचास पातळ होणे, पडसे व खोकला येणे असे आजार वारंवार होतात. या आजारांचा विशेष परिणाम जाणवत नाही; मात्र थकवा वाढतो. सामान्यपणे रक्तातील हेल्पर टी-पेशींची संख्या प्रतिघन मिमी.ला १,२०० असते, ती २०० किवा त्यापेक्षा कमी झाली की एड्सची लागण झाली, असे समजतात.

एड्स प्रथम १९८९ सालामध्ये अमेरिकेत समलिंग संभोग करणार्‍या पाच व्यक्तींमध्ये आढळून आला. त्याआधी, १९५९ साली संशोधकांना मध्य अमेरिकेत रक्ताच्या नमुन्यात एड्सचे विषाणू आढळून आले होते. वरील पाचही व्यक्तींना न्यूमासिस्टिम कॅरिनेन्सीस या कवकजन्य फुफ्फुसाचा रोग झाला होता. तसेच काही रुग्णांत कॅपोसी सारकोमा हा त्वचेचा कर्करोग आढळून आला. या रोगात त्वचेवर वेदनारहित व रक्त साकळल्यासारख्या डाग दिसतो. हे दोन्ही रोग एड्सची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सामान्यपणे दिसून येतात.

फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या ल्यूक माँताग्नेर आणि त्यांच्या सहकारी बारे-सिनोसी यांनी एचआयव्हीचे विषाणू प्रथम वेगळे केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना २००४ सालचे मानवी वैद्यकाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट सी. गॅलो व त्याच्या सहकार्‍यांनी हे विषाणू एड्सचे कारक असतात, हे दाखविले. या विषाणूंना एचआयव्ही-१ असे नाव देण्यात आले. १९८५ साली फ्रान्समधील संशोधकांनी एड्स रोगाच्या एचआयव्ही-१ शी मिळताजुळता परंतु वेगळा विषाणू (एचआयव्ही-२) शोधून काढला. एचआयव्ही-२ ने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या पश्चिम आफ्रिकेत अधिक आहे, तर एचआयव्ही-१ जगात सर्वत्र पसरलेला आढळतो. आफ्रिकेतील नववानर गणातील ४० हून अधिक जातींमध्ये एसआयव्ही (सिमियन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) हा विषाणू आढळतो. यांपैकी सूटी मँगाबे या जातीच्या वानरापासून एचआयव्ही-२ आणि चिंपँझीमधून एचआयव्ही-१ माणसामध्ये आले असावे, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

एचआयव्ही हा विषाणू १०० नॅनोमीटर (१ नॅनोमीटर=एक मिमी.चा दशलक्ष भाग) आकाराचा असतो. याच्या मध्यभागी आरएनए (रिबोन्यूक्लिइक आम्ल) हे केंद्रकाम्ल व रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा विकार असतो. मध्यभागाभोवती पी-२४ प्रथिनांचे आवरण असते व त्याभोवती पी-१७ या प्रथिनांचे आवरण असते. या प्रथिनांभोवती फॉस्फोलिपिडाचे दुपदरी आवरण असते. हे आवरण प्रतिजैविके आणि अन्य औषधांना मज्जाव करते. या फॉस्फोलिपिडामध्ये खिळ्याप्रमाणे शिरलेली आणि आवरणाबाहेर आलेली जीपी-१२० व जीपी-४१ अशी दोन ग्लायकोप्रथिने असतात. यांचा उपयोग विषाणूला लक्ष्यपेशीत म्हणजे हेल्पर टी (CD4+ टी) पेशीमध्ये शिरण्यासाठी होतो. पेशीत शिरल्यानंतर विषाणूंच्या आरएनएपासून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज यामार्फत डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल) तयार होते आणि ते आश्रयी पेशीतील डीएनए काही काळ निष्क्रिय राहू शकते. ते क्रियाशील झाल्यास त्याच्यापासून विषाणूच्या आरएनएची प्रतिरूपे बनतात. आश्रयी पेशीमधील प्रथिने वापरून आरएनए प्रतिरूपांपासून पूर्ण विषाणू बनतात. ते आणखी आश्रयी पेशींना बाधित करू शकतात. पेशीमध्ये नेहमी डीएनएचे रूपांतर आरएनएमध्ये होत असते. एचआयव्ही विषाणूच्या बाबतीत ही प्रक्रिया उलट होत असल्यामुळे तो पश्चगामी समजला जातो. आश्रयी पेशीशिवाय एचआयव्ही या विषाणूची तयार होत नाहीत.

एचआयव्हीबधित व्यक्तीमार्फत या विषाणूंचा प्रसार विविध प्रकारे होऊ शकतो:

(१) असुरक्षित लैंगीक संबंध : (अ) एचआयव्हीबाधित व्यक्तीबरोबर गुदद्वारामार्गे केलेला लैंगीक संबंध सर्वांत जास्त संसर्गजन्य असतो. बहुस्तरीय गुदपटलासमवेत असलेल्या लसीकापुंजामधून एचआयव्हीचे विषाणू रक्तात प्रवेश करतात.

(आ) एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या वीर्यात विषाणूंची संख्या सर्वांत जास्त असते. योनीमार्गाचे पटल जरी ४-५ पेशीस्तरीय असले तरी या मार्गात वीर्य अधिक काळ राहत असल्यामुळे एचआयव्हीची लागण लवकर होते.

(२) अंत:क्षेपणद्वारे : एचआयव्हीबाधित रुग्नासाठी वापरलेल्या अंत:क्षेपणाच्या नळ्या व सुयांना लागलेल्या रक्तात हे विषाणू राहू शकतात. या नळ्या व सुया न उकळविता आणि न साफ करता वापरल्यास त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होतो. विशेषकरून, अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांत हा प्रकार आढळतो. अंमली पदार्थ शरीरात टोचण्यासाठी एकच सुई अनेक व्यक्ती वापरतात.

(३) रक्तदान : एचआयव्हीबाधित व्यक्तीचे रक्त अथवा रक्तजन्य पदार्थ एखाद्या निरोगी व्यक्तीला दिले गेल्यास त्या व्यक्तीला एड्सची लागण होते.

(४) गर्भावस्था : एचआयव्हीबाधित मातेकडून अर्भकाला संसर्ग होतो. गरोदरपणी नाळेतून हे विषाणू गर्भात शिरतात. प्रसूतीच्या वेळीदेखील या विषाणूंचा संसर्ग अर्भकाला होऊ शकतो. म्हणून अशा प्रसंगी शक्यतो सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करतात. गरोदरपणी एड्सविरोधी औषधे मातेला दिल्यास ही बाधा कमी होते.

(५) इतर काही कारणे : एचआयव्हीबाधित व्यक्तीने गोंदताना व कान-नाक टोचताना वापरलेल्या सुया इतर व्यक्तींनी त्या वापरण्यापूर्वी पूर्ण निर्जंतुक न केल्यास एचआयव्हीचे विषाणू त्या इतर व्यक्तींच्या शरीरात शिरू शकतात.

एड्सची लागण झाल्यापासून तीन महिन्यांनी रक्ताची एचआयव्ही चाचणी केल्यास ती होकारात्मक येते. एड्सचा संशय आल्यास ही चाचणी करतात. एड्ससाठी विषाणूरोधी औषधे वापरली जातात. एचआयव्ही चाचणी होकारात्मक आल्यास ही औषधे योग्य प्रमाणात देतात. विषाणूंच्या संसर्गामुळे आलेली दुर्बलता कमी करण्यासाठी जीवनसत्त्वे देतात. विषाणूरोधी औषधांचे शरीरावर काही दुष्परिणाम होतात. म्हणून रुग्नाला आहारात भरपूर प्रथिने देतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती टिकून राहण्यास मदत होते. भारतामधअये एचआयव्हीबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पश्चगामी विषाणूरोधी उपचार ( अँटी-रिट्रिव्हायल ट्रीटमेंट) ही संयुक्त पद्धत इ.स. २००६ पासून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधित रुग्णांचे आयुष्यमान वाढले आहे व लागण घटली आहे.

एड्स होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे ठरतात. एकाच जोडीदाराशिवाय अन्य व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवू नयेत. अनोळखी व्यक्तीशी लैंगिक संबंध टाळावा. एड्स असल्यास गरोदरपणी मातेने नियमित औषधोपचार घ्यावेत. म्हणजे बाळाला बाधा होत नाही. मातोला रक्त देण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास रक्ताची एड्ससाठी तपासणी करावी. तसेच एड्सबाधित मातेने बाळाला स्तनपान करू नये.

एड्स ही जगद्‍व्यापी साथ ठरत आहे. २००७ साली जगात ३.५ कोटी एड्सचे रुग्ण आढळले होते. त्यांपैकी २१ लाख रुग्ण मरण पावले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये ३ लाख ३० हजार बालके होती. लसीकरणासाठी इतर प्राण्यांत एचआयव्हीची वाढ होत नसल्यामुळे या विषाणूंची प्रयोगशाळेत पैदास करणे अजून शक्य झालेले नाही. त्यामुळे या रोगावर आजपर्यंत प्रतिबंधक लस निर्माण करणे शक्य झालेले नाही.