फालसा हा पानझडी वृक्ष टिलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ग्रेविया एशियाटिका आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत ते कंबोडियापर्यंत आढळतो. भारतात पंजाबमध्ये तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांत त्याची लागवड करतात. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांत तो आढळतो. मराठीत त्याला फालसी असेही म्हणतात.

फालसा (ग्रेविया एशियाटिका): (१) वृक्ष, (२) फूल, (३) फळे.

फालसा वृक्ष सु. ८ मी. उंच वाढतो. बुंध्याचा व्यास २०–५० सेंमी. असून साल खडबडीत, करड्या रंगाची असते. कोवळ्या फांद्यांवर तारकाकृती केस असतात. पाने साधी, एकाआड एक, मोठी, गोलाकार परंतु टोकदार असतात. पानांची खालची बाजू लवदार असून कडा दंतुर असतात. हिवाळा संपतासंपता पानगळ होते. मार्च-एप्रिल महिन्यांत या वृक्षाला नवीन व लालसर पानांची पालवी येते. फुले लहान, पिवळी किंवा केशरी व सुवासिक असतात. फुले ३–५ च्या लहान गुच्छांत असतात. फुलांत पाच पाकळ्या सुट्या असून अनेक केशरी पुंकेसरांचा जुडगा फुलाच्या मधोमध उचललेला दिसतो. फळे आठळीयुक्त, लहान, गोल व  एक सेंमी. व्यासाची असतात. ती कच्ची असताना हिरवी व केसांचे आच्छादन असलेली असतात, तर पिकल्यावर तपकिरी किंवा काळपट लाल रंगाची होतात. फळात एक किंवा दोन बिया असतात.

फालसाची फळे चविष्ट असून स्तंभक म्हणून उपयुक्त आहेत. पित्त, ताप आणि हृदयरोग यांवर ती देतात. कच्ची फळे आंबट असून त्यांचे सरबत बनवितात. पिकलेली फळे गोड असतात. मद्यनिर्मिती व सरबत तयार करण्यासाठी फळांचा उपयोग करतात. गुऱ्हाळात उसाच्या रसातील मळी काढण्यासाठी खोडाची साल वापरतात. लाकूड तांबूस-पिवळसर पांढरे, बळकट, लवचिक व कठीण असून भाल्याचे दांडे तसेच छपराच्या पातळ फळ्या तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाने गुरांना चारा म्हणून देतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा