एकदांडी ही ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी अॅस्टरेसी कुलातील एक तणासारखी बहुवर्षायू वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव ट्रायडॅक्स प्रोकम्बेन्स आहे. ही वनस्पती जमिनीवर सरपटत वाढणारी, ३०-६० सेंमी. उंचीची व केसाळ असून मूळची मध्य अमेरिकेतील आहे. श्रीलंकेत व भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्रात तिचा प्रसार सर्वत्र आहे.
एकदांडीची पाने साधी, जाड, समोरासमोर अंडाकृति-दीर्घवृत्ताकार, टोकदार, दातेरी काठाची व ग्रंथियुक्त असतात. लहान पिवळे फुलोरे एक एकटे असून लांब व बारीक दांड्यावर वर्षभर येतात. फळ एक बी असलेले, कठिण व राठ केसांनी झाकलेले असून त्याच्या एका बाजूला पांढरा पिसासारखा रोमगुच्छ असतो. एका झाडावर सु. १,५०० बिया येतात. वार्यामार्फत या बियांचा सहज प्रसार घडून येतो. कापणे, खरचटणे व जखमा यांवर एकदांडीच्या पानांचा रस लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते.