पूर्ण ऊस व मुळासह उसाचे खोड

भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली ही सुपरिचित वनस्पती गवताची एक जाती आहे. पोएसी कुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव सॅकॅरम ऑफिसिनॅरम आहे. हिचे मूलस्थान आग्नेय आशिया मानले जात असे; तथापि, ब्रँडेस (१९५६) यांनी सर्व प्रकारची माहिती मिळवून न्यू गिनी हे उगमस्थान निश्चित केले आहे. इ.स.पू.सु. ८,००० वर्षांपूर्वी व नंतर या उसाच्या जातींचा प्रसार सॉलोमन बेटे, न्यू हेब्रिडीझ, न्यू कॅलिडोनिया इ. प्रदेशांत, तसेच इ.स.पू. ६००० वर्षांपासून इंडोनेशिया, फिलिपीन्स ते उत्तर भारतापर्यंत आणि शेवटी इ.स. ६०० ते ११०० या काळात हेब्रिडीझच्या पूर्वेच्या द्वीपसमूहात व ओशिअ‍ॅनियाच्या इतर भागात झाला असावा, असे ते म्हणतात. अठराव्या शतकापर्यंत उसाचा प्रसार जवळजवळ जगभर झालेला आढळतो.

ऊस ही बहुवर्षायू वनस्पती असून ती सु. ६ मी. पर्यंत वाढते. ऊसाची खोडे वेगवेगळ्या जाडीची असून रंगानेही वेगळी असतात. पाने सामान्यतः १.५ मी. लांब, अरुंद, चिवट, ताठ किंवा लोंबणारी असून रंगाने फिकट ते गडद हिरवी असतात. फुलोरा मोठा पिरॅमिडसारखा असून कणिशाचा तळभाग लांब व तलम केसांसारख्या तंतूंनी वेढलेला असतो. फळ आयताकार किंवा गोल असते. उसाच्या लागवडीसाठी सर्वसाधारणपणे तीन डोळे असलेल्या कांड्या वापरतात.

डोळ्यासह उसाच्या कांड्या

उसाचा रस चवीला गोड असतो. तो मूत्रल (लघवी साफ करणारा), रेचक, शीत व कामोत्तेजक असतो, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस उपयोगी ठरतो. खोकला, दमा, पांडुरोग, त्वचेच्या विकारांवर हा रस गुणकारी ठरू शकतो. उसाचे शेंडे जनावरांचे खाद्य म्हणून उपयोगात आणतात. त्याच्या चिपाडांचा व चोथ्याचा जळणासाठी, कागद व तक्ते तयार करण्यासाठी, गाळण कागद व स्ट्रॉ बोर्ड तयार करण्यासाठी उपयोग करतात. उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी तयार करता येत नाहीत अशा भागाला मळी म्हणतात. हा भाग ब्युटेनॉल, अ‍ॅसिटोन, सायट्रीक आम्ल, खते, मेण, मद्य, कृत्रिम रबर व धातूंकरिता वापरावयाचे पॉलिश इ. तयार करण्यासाठी वापरतात.

समशीतोष्ण व उष्ण प्रदेशांतील बर्‍याच देशांत उसाची लागवड प्रामुख्याने साखरेसाठी केली जाते. भारतात इ.स.पू. ३२७ पासून ऊस हे महत्त्वाचे पीक असल्याचे आढळते. चौथ्या व सहाव्या शतकांदरम्यान भारतात साखरनिर्मिती सुरू झाली. तेव्हा ही साखर खड्यांच्या स्वरूपात होती. नंतर आज आपण पाहतो तशी साखर उपलब्ध होऊ लागली. ऊस आणि त्यापासून मिळणारे रस, काकवी, गूळ व साखर हे खाद्यपदार्थ आहेत. ऊस हे नगदी पीक आहे. भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत उसाची लागवड विशेष होते. उसाला पाणी जास्त द्यावे लागत असल्याने जमिनीतील क्षार पृष्ठभागावर येतात. अशा क्षारपड (खारट) जमिनी पिकासाठी निरुपयोगी होतात. अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची सोय केल्यास जमीन पुष्कळ वर्षे चांगले पीक देत राहते असा अनुभव आहे.