कुकर्बिटेसी कुलातील कुकर्बिटा प्रजातीमधील वनस्पतींच्या फळांना सामान्यपणे भोपळा म्हणतात. या वनस्पतींच्या बहुतेक जाती लांब वाढणाऱ्या वेली असून त्यांची खोडे काटक व चौरसाकार असतात. फळांवरील कवच कठीण असून आत रवाळ व तंतुमय गर असतो. फळे वजनाला सु. २∙५–१४ किग्रॅ. असतात. बहुधा फळे रंगाने तांबडी असली तरी काही पांढरी, पिवळी किंवा अन्य रंगांची असतात. फळांमध्ये अ-जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. बियांपासून लोह आणि प्रथिने मिळतात. जगात सर्वत्र भोपळ्याच्या पाच जाती लागवडीखाली आहेत : कुकर्बिटा अर्जिरोस्पर्मा, कु. फिसीफोलिया, कु. मोशाटा, कु. मॅक्सिमा आणि कु. पेपो. यांपैकी भारतात कु. मोशाटा (काळा भोपळा), कु. मॅक्सिमा (लाल भोपळा) आणि कु. पेपो (काशी भोपळा) या जाती लागवडीखाली आहेत. भोपळ्याच्या प्रत्येक जातीत अनेक प्रकार आढळून येतात. तसेच आकार आणि आकारमान यांतही विविधता दिसून येते. दुधी भोपळा कुकर्बिटेसी कुलातील वनस्पती असली, तरी ती लॅजिनेरिया प्रजातीतील आहे.

भोपळ्याच्या वेलीची पाने मोठी व रोमश असून नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळी असतात. मधमाश्यांद्वारे या फुलांमध्ये परागण घडून येते आणि मादी-फुलांपासून फळ तयार होते. विशेष म्हणजे प्रत्येक मादी-फूल फक्त एकच दिवस परागणासाठी उमलते. याव्यतिरिक्त भोपळ्याची बहुधा नर-फुले उमललेली असतात. त्यामुळे काही मोजक्या मादी-फुलांपासून भोपळ्याचे फळ तयार होते.

काळा भोपळा (कुकर्बिटा मोशाटा)

काळा भोपळा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कु. मोशाटा आहे. या वेलीचे खोड पंचकोनी आणि रोमविरहित असते. पाने साधी, मऊ व खंडित असून त्यांवर रंगीबेरंगी ठिपके असतात. पानांच्या देठांवर मऊ रोम असतात. नर-फुले व मादी-फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळ्या शाखांवर येतात. फुले सोनेरी पिवळी व कर्ण्याच्या आकाराची असतात. दलपुंजाच्या पाकळ्या रुंद व ताठ उभ्या असतात. मादी-फुलातील निदलपुंजाचे खंड मोठे व पानांसारखे असतात. फळ कोवळे असताना हिरवे असून नंतर काळपट दिसते. म्हणून त्याला काळा भोपळा म्हणतात. फळाचे दोन प्रकार दिसून येतात; एका प्रकारची फळे गुळगुळीत व काहीशी लंबगोल असतात, तर दुसऱ्या प्रकारची फळे खोबणीदार आणि गोल किंवा बसकी असतात. मगजाचा रंग पिवळा किंवा काळपट नारिंगी असतो. बिया चपट्या, करड्या किंवा तपकिरी असून त्यांची कडा बियांच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाची असते. फळांमध्ये कॅरोटीन अधिक प्रमाणात असते. फुप्फुसातून होणाऱ्या रक्तस्रावावर मगज गुणकारी मानतात. फळांना लागून असलेले देठ वाळवून पाण्यात उगाळून कीटकदंशावर लावतात.

लाल भोपळा (कुकर्बिटा मॅक्सिमा)

लाल भोपळा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कु. मॅक्सिमा आहे. ही वेल जमिनीवर सरपटत छपरावर किंवा मांडवावर वाढते. खोड रोमश असते. पाने साधी, मोठी व एकाआड एक असून ती गोलाकार असतात. पानांचे देठ जवळजवळ पानांइतकेच लांब असतात. नर-फुले व मादी-फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळ्या शाखांवर येतात. फुले पिवळी व घंटेच्या आकाराची असून ती पानांच्या बगलेत येतात. नर-फुलांचे देठ लांब, तर मादी-फुलांचे देठ आखूड असतात. पाकळ्या मोठ्या व बाहेरच्या बाजूला वळलेल्या किंवा लोंबत्या असतात. फळ मृदू व विविध आकारांचे असून साल जाड व कठीण असते. फळाचा आकार गोल किंवा लंबगोल असून त्यावर उभे उथळ कंगोरे व खाचा असतात. साल गडद लालसर असते. पिकलेल्या फळाचा मगज गोडसर, रवाळ व पिवळसर लाल असतो. बिया अनेक, लंबगोल व चपट्या असून त्यांची कडा त्याच रंगाची असते. या वेलीची पाने, फुले व फळे भाजीसाठी वापरतात. फळातील मगज मिठाई बनविण्यासाठी वापरतात. भाजलेल्या जखमांवर मगजाचा लेप लावतात. बिया पौष्टिक, मूत्रल व पट्टकृमिनाशक आहेत. लाल भोपळ्याच्या आकारमानात विविधता आढळून येत असून काही फळांचा घेर २-२∙४ मी. व वजन १००–१५० किग्रॅ. इतके असू शकते. ही फळे कुकर्बिटा प्रजातीत सर्वांत मोठी असतात. जायंट पंपकीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या एका प्रकाराचे वजन किमान ४५ किग्रॅ. असते. त्याच प्रकारच्या एका भोपळ्याचे वजन १ टनापेक्षा जास्त आढळून आले आहे.

काशी भोपळा (कुकर्बिटा पेपो)

काशी भोपळा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कु. पेपो आहे. ती मूळची अमेरिकेतील असून भारतात पिकविली जाते. ती काहीशी काटेरी, वर्षायू व तणावे असलेली वेल असते. पाने साधी, हस्ताकृती, तीन-पाच खंडांत विभागलेली व रुंद असतात. पानांचा देठ पात्याएवढा लांब असतो. पानांच्या मागील बाजूला राठ रोम असतात. फुले पिवळी व मोठी असून नर-फुले व मादी-फुले एकाच वेलीवर येतात. निदले अरुंद आणि दले टोकदार असतात. पुंकेसर तीन व जुळलेले असतात. कुक्षी तीन असतात. फळ सामान्यपणे गोलसर असून सालीचा रंग पिवळसर असतो. फळ भाजीसाठी उपयुक्त असते. काशी भोपळ्याचे आठ प्रकार लागवडीखाली आहेत.

दुधी भोपळा (लॅजिनेरिया सायसेरेरिया)

दुधी भोपळा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लॅजिनेरिया सायसेरेरिया आहे. तिचे खोड रोमश असून ती प्रताणांद्वारे वर चढते. पाने साधी, लांब देठांची व पाच खंडांत विभागलेली असून त्याजवळची प्रताणे दुभंगलेली असतात. फुले पांढरी, मोठी व एकलिंगी असून नर-फुलांचे देठ लांब तर मादी-फुलांचे देठ आखूड असतात. फळे मोठी व गोलाकार असून ती बाटलीच्या, चंबूच्या किंवा तुंब्याच्या आकाराची असतात. फळे हिरवी असून साल गुळगुळीत असते. पिकल्यावर फळाच्या सालीचा रंग पांढरा होतो आणि साल लाकडासारखी कठीण बनते. बिया अनेक, पांढऱ्या, चपट्या व गुळगुळीत असतात. या वेलीची वाढ पटकन होते. दोन महिन्यांनंतर वेलीला फळे लागतात. मगज मऊ व खाद्य असून त्याची भाजी तसेच दुधी हलवा करतात. फळात ब-समूह जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात आणि क-जीवनसत्त्व कमी प्रमाणात असते. दुधी भोपळ्याची पाने रेचक असून त्यांचा काढा साखर घालून काविळीवर देतात. फळे मूत्रल व सारक आहेत. वाळलेल्या भोपळ्याचा वापर पाणी ठेवण्यासाठी, डाव, नळ्या, तुतारी व पुंगी आणि तपकिरीच्या डब्या तयार करण्यासाठी केला जातो.

कुकर्बिटेसी कुलातील कारले, काकडी इ. फळांप्रमाणे दुधी भोपळ्यात कुकर्बिटेसीन हे संयुग असते. ते चवीला कडू असते आणि त्याच्या सेवनाने आतड्याचा अल्सर होऊ शकतो. अधिक प्रमाणात सेवन केल्यास ते विषारी असते. दुधी भोपळ्याचे सेवन सामान्यपणे सुरक्षित असते. मात्र त्याची साठवण नीट न केल्यास म्हणजे तो वाढलेल्या तापमानात ठेवल्यास किंवा अधिक पिकू दिल्यास फार कडू होतो. काही वेळा अशा भोपळ्याच्या रसाच्या सेवनाने मृत्यूही संभवतो. त्यापासून संभवणारी विषबाधा टाळण्यासाठी पुढील उपाय सुचविले जातात : (१) दुधी भोपळ्याचा रस करण्याआधी त्याचा लहानसा तुकडा घेऊन तो कडू आहे किंवा नाही याची खात्री करावी. (२) अतिकडू असलेला भोपळा किंवा रस फेकून द्यावा. (३) भोपळ्याचा रस इतर फळांच्या रसात मिसळू नये. त्यामुळे भोपळा कडू असला तरी त्याची चव इतर रसांमुळे समजत नाही.

तानपुरा, सतार, रुद्रवीणा व तुतारी अशी वाद्ये तयार करण्यासाठी भोपळे वापरतात. त्यासाठी काशी भोपळे आणि दुधी भोपळे मुद्दाम मोठ्या आकाराचे होईपर्यंत वाढू देतात व वाळवितात. नंतर त्यांच्या आकारांनुसार त्यांपासून वेगवेगळी वाद्ये तयार करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा