मेहरोत्रा, अरविंद कृष्ण : (जन्म : १९४७) प्रतिथयश भारतीय इंग्रजी कवी,समीक्षक आणि अनुवादक. भारतीय साहित्यातील आधुनिकवादाच्या कालखंडातील जे काही मोजके प्रयोगशील कवी आहेत त्यामध्ये मेहरोत्रांचा उल्लेख आवर्जून केला जातो.जन्म लाहोर येथे. फाळणीनंतर त्यांचा परिवार भारतात स्थलांतरित झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कलाशाखेचे पदवी शिक्षण आणि मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.१९७१ ते १९७३ व १९८१ ते १९८३ या कालखंडात ते आयोव्हा युनिव्हर्सिटी आयोव्हाच्या इंटरनॅशनल रायटिंग प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले होते. ते अलाहाबाद विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
१९६६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या “भारतमाता: अ प्रेयर” या बीट्सकाव्याच्या अंगाने जाणाऱ्या बंडखोरीचे निर्देशन करणाऱ्या कवितेपासून मेहरोत्रांचा काव्यप्रवास सुरू झाला. त्यांचे नाईन एनक्लोझर्स (१९७६), दि डिस्टन्स इन स्टॅच्यूट माइल्स (१९८२), मिडल अर्थ (१९८४), दि ट्रान्सिफगरींग प्लेसेस: पोएम्स (१९९८), हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अप्रकाशित असलेल्या कवितांसह वरील सर्व कवितासंग्रहांतील कविता कलेक्टेड पोएम्स या संग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत (२०१४). त्यांनी डॅम यू (१९६५) एझरा: अॅन इमेजिस्ट मॅगझीन (१९६७) फकीर (१९६८) ह्या अनियतकालिकांचे संपादन केले आहे. दि ऑक्सफर्ड इंडिया अँथॉलॉजी ऑफ ट्वेल्व्ह मॉडर्न इंडियन पोएट्स (१९९२) हा त्यांनी संपादित केलेला काव्यसंग्रह होय. अॅन इल्युस्ट्रेटेड हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर इन इंग्लिश (२००३) आणि दि लास्ट बंगलो: रायटिंग्ज ऑन अलाहाबाद (२००७) ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके होत.याशिवाय दि अबसेंट ट्रॅव्हल (हालाच्या गाथासप्तशतीचा इंग्रजी अनुवाद,१९९१) आणि सॉंग्ज ऑफ कबीर(२०११)ह्या काही त्यांच्या महत्त्वाच्या अनुवादात्मक कृती होत. अरुण कोलटकर या त्यांच्या समकालीन कवीच्या कवितांचेही संकलन त्यांनी दि बोट राईड अँड अदर पोएम्स या संग्रहात केले आहे.
सुरुवातीच्या काळातील त्यांची कविता ही आधुनिक व उत्तर-आधुनिकतावादातून प्रसार पावलेल्या नवनव्या काव्यप्रारुपांची हाताळणी करताना दिसते. यामध्ये प्रतीमावाद, अतिवास्तववाद, मूर्त कविता यासारख्या विविध प्रकटनतंत्रांचा अवलंब प्रामुख्याने दिसून येतो. “वूडकट्स ऑन पेपर” व “कॉंक्रिट पोएट्री” हे त्यांचे काव्य १९६७ मध्ये पॅरीस येथे भरवण्यात आलेल्या पहिल्या इंटरनॅशनल कॉंक्रिट, स्पेटीअल आणि मेकॅनिकल कवितेच्या प्रदर्शन प्रसंगी प्रसिद्ध झाले. बडोदा येथील वृश्चिक प्रकाशन संस्थेने त्यांचे ट्वेल्व्ह पोएम्स फ्रॉम ए गुड सररीअॅलिस्ट व पोमेज/पोएमेज/पोएमाज या शीर्षकाचे दोन छोटेखानी प्रायोगिक कवितांचे संग्रह छापले (१९७१). या कालखंडातील मेहरोत्रांची कविता ही रूढ काव्यपरंपरांना छेद देणारी, अत्युच्य स्वातंत्र्याचा ध्यास घेणारी व कवितेच्या नव्या प्रारूपांचा शोध घेणारी कविता आहे. मेहरोत्रांची कविता ही आधुनिक भावकवितेचा प्रत्यय देणारी कविता आहे. ‘प्रोझ पोएट्री’ सारख्या काव्यप्रकारातून आलेली लघुकाव्याची परंपरा, भावकवितेच्या मुळाशी असलेली उत्स्फुर्तता, विशुद्ध कवितेच्या शोधात भावलेली अंतःप्रेरणा आणि त्याचवेळी मुक्तछंदातील अंतर्लय सांभाळत सजगपणे केलेले प्रतिमांचे संघटन ही त्यांच्या कवितेच्या आकृतीबंधाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्रतिमांचा काटेकोरपणा आणि मितव्ययी भाषा यामुळे त्यांची कविता एक शब्दशिल्प म्हणून अवतरते. त्यांच्या “डिक्लाइन्स” किंवा “टू लेक्स” सारख्या कविता अशा प्रकारची अनुभूती देतात. टि.एस्.एलियट किंवा एझरा पाऊंड यांच्या काव्यशैलीला अभिप्रेत असलेली ‘इमोशनल अँड इंटलेक्चुअल कॉम्प्लेक्स’ या प्रकारची अभिव्यक्ती मेहरोत्रांच्या कवितेतून ठळकपणे दिसून येते.
आधूनिक भारतीय इंग्रजी कवितेत जाणवणारे उपहासगर्भीत समाजभाष्य मेहरोत्रांच्या कवितेतही आहे. तथापि सुरुवातीच्या कालखंडातील कवितेत जाणवणारी ही तीव्रता, मेहरोत्रांच्या नंतरच्या काव्यसंग्रहामधून अतिशय संयत होत जाताना दिसते. मेहरोत्रांची कविता ही काव्यप्रतिभेवर चिंतन करणारी कविता आहे. विघटन आणि सर्जन या व्यामिश्र व्यवहाराचे स्वरूप कविता निर्मितीप्रक्रीयेमध्ये किती खोलवर रुजले आहे याचाही शोध त्यांची कविता घेत राहते. यायोगे मेहरोत्रांची कविता ही कविता आणि कवी यांच्यातील निर्माण आणि निर्मिक यातील गुंतागुंतीच्या नात्यावर प्रामुख्याने भाष्य करते.
http://https://youtu.be/Wz2IvKNuJXE
१९६०च्या दशकात त्यांनी सुरु केलेल्या डॅम यू (१९६५) एझरा: अॅन इमेजिस्ट मॅगझीन (१९६७) आणि फकीर (१९६८) या अनियतकालिकामधून त्यांचा परंपरेविरुद्धचा आधुनिकतावादी दृष्टीकोन दिसून येतो. दि ऑक्सफर्ड इंडिया अँथॉलॉजी ऑफ ट्वेल्व्ह मॉडर्न इंडियन पोएट्स या ग्रंथातून त्यांचे परखड समीक्षालेखन व काव्यप्रारूपाबद्दलचे स्वतंत्र विचारचिंतन वाचावयास मिळते.अॅन इल्युस्ट्रेटेड हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर इन इंग्लिश (२००३) या ग्रंथामध्ये भारतीय इंग्रजी साहित्याचा एक चिकित्सक इतिहास पहावयास मिळतो. दि लास्ट बंगलो: रायटिंग्ज ऑन अलाहाबाद (२००७) या ग्रंथात अलाहाबाद शहराचा एक साहित्यिक-सांस्कृतिक इतिहास पहावयास मिळतो. कबीरांच्या पदांचा मेहरोत्रांच्या साहित्यिक व्यक्तित्वाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. सॉंग्ज ऑफ कबीर या अनुवादातून त्यांनी मध्ययुगीन कबीराचे व्यक्तित्व २१व्या शतकाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचीन साहित्यातील गाथासप्तशतीसोबतच त्यांनी मलूकदास,मुक्तिबोध, या कवींच्या कवितांचा इंग्रजीमधून अनुवाद केला आहे. डॅनिएल वेसबोर्ट यांच्याबरोबरीने त्यांनी पेरीक्लस: दि पोएट्री इन ट्रान्सलेशन या ग्रंथाचे सहसंपादन केले आहे. अशाप्रकारे चिकित्सक,अभ्यासू संपादन कार्याबरोबरच मेहरोत्रांनी अनुवादामध्ये भरीव योगदान दिलेले आहे.
मेहरोत्रांच्या काव्यक्षेत्रातील योगदानाची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. २००९ मध्ये ‘ऑक्सफर्ड प्रोफेसर ऑफ पोएट्री’ या पदासाठी त्यांचे नामांकन झाले होते. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय कवी आहेत.
संदर्भ :
https://www.poetryfoundation.org/poets/arvind-krishna-mehrotra