पुरुषोत्तम लाल  : (२८ ऑगस्ट १९२९ – ३ नोव्हेंबर २०१०). पी. लाल. प्रसिद्ध भारतीय इंग्रजी साहित्यिक. मुख्य ओळख कवी म्हणून. ललितलेखक, अनुवादक, समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. जन्म कपूरथला पंजाब येथे. वडिलाच्या शासकीय सेवेमुळे कलकत्ता येथे १९३० ला स्थलांतरित झाले. कलकत्त्याच्या  सेंट झेवियर कॉलेजमध्ये आणि कलकत्ता विद्यापिठात त्यांचे शिक्षण झाले. याच कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रूजु झाले (१९५२). जगभरातील विद्यापीठामध्ये गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. त्यामध्ये न्यूयॉर्क,इलिनॉयस, ओहियो येथील विद्यापीठाचा समावेश होतो.

द आर्ट आर्ट ऑफ द एसे  (१९५०) हे त्याचे ललितसंग्रहाचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर पॅरोटस् डेथ अण्ड अदर पोएम्स् (१९६०),चेंज! दे सेड (१९६६), द्रौपदी अण्ड जयद्रध अण्ड अदर पोएम्स् (१९६९), कलकत्ता : अ लाँग पोएम (१९७८) हे कविता संग्रह ; ट्रान्सक्रिएशन : टू एसे (१९७२),द लेमन ट्री ऑफ मॉडर्न सेक्स (१९७४), द अलायन इनसायडर्स : इडियन राइटिंग इन इंग्लीश (१९८७) हे ललित संग्रह; धम्मपद (१९६७), द महाभारता ऑफ व्यास (१९८०), द रामायण ऑफ वाल्मिकी (१९८१) इत्यादी भावानुवाद आणि द कन्सेप्ट ऑफ अॅन इंडियन लिटरेचर (१९६८) हा समीक्षाग्रंथ इत्यादी विपुल प्रमाणात त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. पी. लाल यांचे भावानुवादाचे कार्य अजोड आहे. उपनिषदे, संस्कृत महाकाव्ये आणि नाटके,  संपूर्ण महाभारत आणि रामायण यांतील श्लोक आणि श्लोक यांचा इंग्रजीमध्ये भावानुवाद त्यांनी केला आहे. याशिवाय प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, कबीर, जयदेव, मीरा, मिर्झा गालिब, इलिंगो इडिगल यांच्या साहित्याचा अनुवादही त्यांनी केला आहे.

शालेय जीवनातील ख्रिस्ती धर्मोपदेशनाचे संस्कार आणि उपजतच रामायण आणि महाभारताशी असणारी ओढ यातून पी. लाल यांची साहित्यवृत्ती प्रभावित आहे. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या कविता आणि भावानुवादाच्या लेखनकार्यातून प्रत्ययास येते. पी. लाल यांच्या कवितेत देव ही संकल्पना ख्रिश्चन प्रभावाने संकरित झालेली आढळते; परंतु ख्रिश्चन आणि हिंदू धर्माच्या एकात्मबोधातून देव या संकल्पनेचे प्रकटन ते त्यांच्या कवितेतून करतात. सामाजिक वास्तवाचे भान, जीवनातील दैव आणि देव हा संघर्ष, निर्वासितांचे दु:ख आणि मध्यमवर्गीयांचे आर्थिक संघर्ष हे पी. लाल यांच्या कवितेतील प्रधान सूत्रे आहेत. गांधी आणि गांधी तत्त्वज्ञान हा त्यांच्या आस्थेचा आणखी एक विषय. गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगली, त्यातून दिसून येणारी धार्मिक तेढ आणि मानवीय हतबलता या बाबीही त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबित झाल्या आहेत. त्यांनी रामायणाचा आणि महाभारताचा भावानुवाद केला आहे. या दोन्ही महाकाव्यातील प्रत्येक श्लोकाचा त्यांनी अनुवाद केला असून अनुवादामधील ही अद्वितीय बाब ठरते. त्यांनी इंग्रजी भाषेतील भारतीय अभिजात साहित्य प्रकाशित करण्याकरीता रायटर्स वर्कशॉप नावाची प्रकाशन संस्था स्थापन केली (१९५८). द मॉर्डन रिव्ह्यू आणि प्रवासी (Pravasi) या दोन नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले. जागतिक आणि आशियाई पातळीवर आयोजित साहित्य महोत्सवात त्यांनी उपस्थिती लावली आहे. त्यांच्या साहित्यातील अजोड कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यामध्ये साहित्य अकादेमी , विद्याशाखीय कार्यासाठी जवाहरलाल नेहरू छात्रवृत्ती (१९६९), पद्मश्री (१९७०) इत्यादी महत्वाच्या पुरस्काराचा समावेश आहे.

कोलकाता येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

उपयुक्त लिंक : https://www.academia.edu/1788303/_P._Lal_1929-2010_Critic_and_Scholar_Extraordinary_