ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्‍या पेशींचा समूह. ऊतिविज्ञानात मुख्यत: ऊतींचा, तसेच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश होतो.  १८५१ सालामध्ये ऊतिविज्ञानावरील पहिला ग्रंथ जर्मन भाषेतून प्रसिद्ध झाला. सुरुवातीस द्विबहिर्गोल भिंगातून दिसणार्‍या ऊतींची सूक्ष्मरचना अभ्यासली जाई. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर त्याच्या साहाय्याने ऊतीतील पेशी १,००० ते २,००० पटींनी मोठ्या दिसणे शक्य झाले. आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा तसेच क्ष-किरण, प्रकाश ध्रुवीकरण व प्रकाश व्यतिकरण यांसारख्या भौतिक आविष्कारांवर आधारलेल्या उपकरणांचा वापर करून पेशींचा बारकाईने अभ्यास करणे शक्य झाले आहे.

पेशींचा अभ्यास करण्यासाठी ऊतींचा अगदी लहान आणि पातळ भाग सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पहावा लागतो. असा पातळ ऊतिखंड काचपट्टीवर ठेवून त्यांतून प्रकाशकिरण आरपार जाऊ दिल्यास ऊतींतील पेशी स्पष्ट दिसू लागतात. ऊतीचा पातळ खंड करण्यासाठी सूई, पाते वगैरे साधनांचा उपयोग करतात. अलीकडे त्यासाठी सूक्ष्मछेदक यंत्रही वारण्यात येते. त्याच्या साहाय्याने ऊतींचे १ ते ५० मायक्रॉन (एक मायक्रॉन म्हणजे एक सहस्त्रांश मिमी.) जाडीचे खंड तयार करता येतात. ऊतीचे असे पातळ खंड करून आणि विविध रंजकद्रव्ये वापरून त्यांचा अभ्यास करता येतो.

ऊती शरीरातून बाहेर काढल्याबरोबर त्यांतील पेशींमध्ये संरचनात्मक आणि रासायनिक बदल होतात; त्यामुळे त्यांच्या मूळ गुणधर्मात फरक होतो. असा फरक होऊ नये म्हणून ताबडतोब अनेक रासायनिक द्रव्ये वापरली जातात (उदा., अल्कोहॉल, झायलिन, पॅराफिने इ.). त्यानंतर सूक्ष्मछेदक यंत्रांच्या साहाय्याने ऊतींचे पातळ खंड केले जातात. काही वेळा ऊती ऋण १५० से. इतकी थंड केल्यानंतर तिचे पातळ खंड करून त्यांचा अभ्यास केला जातो.

आजारी व्यक्तीच्या शरीरातील विकृत झालेल्या ऊती काढून घेऊन त्यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे रोगनिदान करणे सुलभ होते.  कर्करोगासारख्या आजारात अशा निदानाचे फार महत्त्व आहे. पक्के निदान झाल्यानंतर पुढच्या उपचाराची दिशा ठरविता येते.

विसाव्या शतकात ऊतिविज्ञान हे शरीररचनाशास्त्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मानवाप्रमाणे इतर प्राणी व वनस्पतींच्या ऊतींचाही अभ्यास केला जातो. विविध रासायनिक तंत्रांचा उपयोग करून ऊतींमध्ये आढळणारी प्रथिने, लिपिडे आणि कर्बोदके इत्यादींच्या जागा निश्चित केल्या जातात.