एक हिंस्र वन्य सस्तन प्राणी. बिबळ्याचा समावेश स्तनी वर्गातील कार्निव्होरा (मांसाहारी) गणाच्या फेलिडी (मार्जार) कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव पँथेरा पार्डस आहे. फेलिडी कुलातील सिंह आणि वाघ यांच्या खालोखाल आकारमानाने बिबळ्याचा क्रमांक लागतो. या कुलात बिबळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आफ्रिका खंडात सहारा येथे आणि आशिया खंडात टर्कीपासून कोरिया व जावापर्यंत बिबळ्या आढळतो. तो मूळचा सायबीरियातील असून आज मितीला आशिया खंडात त्याच्या ११ जाती आहेत. भारतात त्याच्या तीन जाती सर्वत्र दिसून येतात. घनदाट वनात, गवताळ प्रदेशात, वाळवंटी प्रदेशात, डोंगराळ भागात तसेच मनुष्य वस्तीजवळही तो आढळतो. हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून २,५००–३,००० मी. उंचीवरही त्यांचा वावर आढळतो. कोचीनजवळ लहान आकाराचा काळा बिबळ्या आढळतो. हजारीबाग (झारखंड) येथे पांढरे (अल्बिनो) बिबळे आढळत होते. महाराष्ट्रात तो बिबट्या या नावानेही ओळखला जातो.

बिबळ्या (पँथेरा पार्डस)

बिबळ्या दिसायला रुबाबदार असून तो अत्यंत सावध आणि चतुर असतो. आकारमानातील फरक सोडला तर तो मांजरासारखाच दिसतो. आखूड पाय, लांब शरीर आणि मोठी कवटी ही त्याची शरीरवैशिष्ट्ये आहेत. त्याच्या शरीराची लांबी २५०–३०० सेंमी., खांद्याजवळ उंची सु. ८० सेंमी. आणि वजन सु. ६८ किग्रॅ. इतके असते. डोके साधारणत: गोलाकार असून नाक चपटे असते. शेपटी सडपातळ आणि लांब असते. नखे लांब, प्रतिकर्षी आणि तीक्ष्ण असतात. पुढच्या पायांना चार नखे, तर मागच्या पायांना पाच नखे असतात. त्याचे दात अणकुचीदार असून सिंहाच्या दातांपेक्षा मजबूत असतात. दृष्टी तीक्ष्ण असते. त्वचा पिवळी असून त्यावर काळे ठिपके असतात. पोट आणि पाय यांचा आतील भाग पांढरट असून त्यांवरील ठिपके संख्येने कमी, आकाराने लहान आणि विखुरलेले असतात. इतर ठिपक्यांचे पुंजके फुलांच्या पाकळ्यांसारखे असून मध्यभागी ठिपके फिकट असतात. त्यामुळे बिबळ्याचे ठिपके पोकळ वाटतात. मादी आकाराने नरापेक्षा लहान असते.

बिबळ्या एकेकटा वावरतो. तो निशाचर असून अतिशय चपळ, हिंस्र आणि धोकेबाज असतो. तो ताशी सु. ५८ किमी. वेगाने पळू शकतो. तो पोहू शकतो आणि झाडावर चढू शकतो. दिवसातील काही वेळ तो झाडावरच घालवितो. हरिणे, शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्रे, डुकरे, कोंबड्या इत्यादींचा त्याच्या भक्ष्यात समावेश होतो. वेळप्रसंगी तो मनुष्यावरही हल्ला करतो. वाघ-सिंहांपेक्षा नरभक्षक बिबळ्या अधिक धोकादायक असतो. आपली शिकार इतर मांसाहारी जनावरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तो मारलेले भक्ष्य तोंडात धरून झाडांवर चढतो.

सर्व ऋतूंमध्ये बिबळ्यांचे प्रजनन होते. नर व मादी समागमापुरते एकत्र येतात. गर्भावधी सु. ९० दिवसांचा असतो. मादीला एका वेळी २–४ पिले होतात. पिले सक्षम होईपर्यंत मादीसोबत राहतात. बिबळ्याचा आयु:काल १५–२५ वर्षे असतो.

बिबळ्या आणि चित्ता यांच्यामध्ये बरेच साम्य असल्याने पुष्कळ वेळा त्यांना ओळखण्यात गल्लत होते. परंतु त्या दोघांमध्ये काही ठळक फरकही आहेत. (पहा : कु.  वि. भाग – २  च‍ित्ता). बिबळ्या आकर्षक दिसतो. कातडीसाठी मोठ्या प्रमाणावर त्याची शिकार झाल्यामुळे तसेच त्याच्या अधिवासात माणसाने अतिक्रमण केल्यामुळे काही भागांत बिबळ्यांची संख्या कमी झाली आहे. बिबळ्याची कातडी, नखे, दात इ. वस्तू जवळ बाळगणे, त्यांची विक्री करणे आणि बिबळ्याची  शिकार करणे या गोष्टींना कायद्याने बंदी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा