उडीद

एक कडधान्य. उडीद ही वर्षायू व शिंबावंत (शेंगा येणारी) वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना मुंगो आहे. ही वनस्पती मूळची भारतातील आहे. ती प्राचीन काळापासून उडदाच्या डाळीसाठी लागवडीखाली आहे. तिचा प्रसार भारतातून दुसर्‍या देशांत कायम वास्तव्यासाठी गेलेल्या भारतीयांनी केलेला आहे.

उडदाच्या वेलीच्या खोडावर बारीक केस असून तिच्या अनेक फांद्या जमिनीवर पसरलेल्या असतात. पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक असतात. पर्णिका रुंद, अंडाकृती, पातळ व टोकदार असतात. फुले लहान, पिवळी व पाच-सहाच्या झुबक्यांनी येतात. शेंगा अरुंद आणि ६ सेंमी. पर्यंत लांब असतात. शेंगेत १०-१५, गर्द करड्या किंवा काळ्या बिया असतात. या बियांपासून उडदाची डाळ तयार करतात.

माणसांसाठी तसेच जनावरांसाठी बिया उत्तम पौष्टिक खाद्य आहे. उडदाची शिजविलेली डाळ मातेला दुग्धवर्धक असते. तिच्यात  आणि  ही जीवनसत्त्वे असतात. तिच्यात फॉस्फोरिक आम्लही असते. उडदाचे पीठ डोसा, इडली, वडा आणि पापड बनविण्यासाठी वापरतात. अशा पदार्थांमध्ये पांढरे उडीद (साल काढलेले) वापरतात. पंजाबात तुरीच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ जास्त प्रमाणात खातात. पंजाबी अन्नपदार्थांत तिचा जास्त वापर होतो.

उडीद उष्ण, कामोत्तेजक व लघवी साफ करणारे आहे. संधिवात, पक्षाघात व मज्जासंस्थेचे विकार इत्यादींवर उडदाचा काढा पोटात घेण्यास व बाहेरून लावण्यास उपयुक्त असतो. उडीद मधुमेहाच्या सौम्य प्रकारावरही उपयुक्त आहे.