वाळा (क्रायसोपोगॉन झिझेनॉइड्स) : (१) वनस्पती, (२) मुळे.

(व्हेटिव्हर). गवत कुलातील (पोएसी किंवा ग्रॅमिनी) एक उपयुक्त वनस्पती. वाळा उर्फ खस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्रायसोपोगॉन झिझेनॉइड्स आहे. गहू, भात, नाचणी, बाजरी इत्यादी वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. वाळा मूळची भारतातील असून हैती, भारत, इंडोनेशिया या देशांत तिची व्यापारी लागवड केली जाते.

वाळा बहुवर्षायू, गुच्छाने वाढणारे गवत आहे. ते नदीकाठच्या दलदलीत वाढते. मुळे तंतुमय, सुवासिक, लांब असून ती जमिनीत खोलवर सु. २–४ मी. वाढतात. जमिनीतील खोड (मूलक्षोड) १-२ मी. उंच वाढलले असून ते शाखायुक्त असते. खोडावरील ताटे (संधिक्षोड) आवरकांनी वेढलेली असतात. पाने साधी, एकाआड एक, हिरवी, गुळगुळीत, ताठ आणि ३०–९० सेंमी. लांब असतात आणि पानांच्या कडा काटेरी असतात. फुले बिनदेठांची, १५–४० सेंमी. लांब स्तबक फुलोऱ्यात (कणिशक) येतात. फुलोऱ्याचा दांडा जाड असून त्यापासून ६–१० फांद्यांची मंडले तयार होतात. लहान कणिशके करडी जांभळट, ४–६ मिमी. लांब व जोडीने असतात; त्यांपैकी एक कणिशक बिनदेठाचे, तर दुसरे देठ असलेले असते. प्रत्येक कणिशकात दोन फुले असून एक फूल द्विलिंगी व दुसरे फूल वंध्य असते, तर दुसऱ्या कणिशकात एक फूल वंध्य व दुसरे नरफूल असते. वाळ्याचे फुले येणारा आणि फुले न येणारा असे दोन प्रकार आहेत; उत्तर भारतात फक्त फुले येणारा, तर दक्षिण भारतात दोन्ही प्रकार आढळतात.

वाळ्याचे गवत दुष्काळात तग धरून वाढते. मुळे सुवासिक असून त्यांच्यापासून उष्णता शमविणारे सरबत तयार करतात. ते पाण्यात, दुधात किंवा लस्सीत मिसळून पितात. मुळांपासून सुगंधी तेल मिळवतात. त्याचा वापर साबण आणि त्वचेची निगा राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये करतात. तेल वायुनाशी असून ते पोटदुखी, संधिवात, लचकणे यांवर चोळण्यासाठी उपयुक्त असते. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक व मूत्रल आहे. अंगातील उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याचे चूर्ण घेतले जाते. लघवीच्या आजारावर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. मुळे पाण्यात उगाळून किंवा त्याची पूड पाण्यात कालवून तापात अंगास लावली जाते. वाळा पित्तनाशक व कफनाशक आहे. त्याचा उपयोग दमा, खोकला, उचकी, उलटी यांसारख्या विकारावर केला जातो. डोकेदुखीवर उपचार म्हणून वाळा जाळून धुरी घेतात.

वाळ्याच्या मुळांपासून पडदे, पंखे, चटया, टोपल्या इ. बनवितात. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे बनवून त्यावर पाणी मारले, तर घरात गारवा राहतो. छपरासाठी तसेच कागदाचा लगदा करण्यासाठी वाळ्याचे गवत वापरतात. वाळ्याच्या सुकलेल्या गवतापासून केरसुणी बनवितात. वाळ्याची मुळे मृदेचे क्षरण होण्यापासून रोखत असल्याने मृदासंवर्धनासाठी उपयुक्त मानतात. ती पाण्याचे प्रवाह, भाताची खाचरे, रेल्वेमार्गावर बसलेली तटबंदी पकडून ठेवतात. म्हणूनच कोकणातील रेल्वेमार्गाला लागून असलेल्या डोगरांवर जागोजागी वाळ्याचे गवत लावलेले आहे. वाळ्याची ताटे वाहत्या पाण्याचा वेग कमी करतात. त्यामुळे तेथील जमिनीत पाणी शोषले जाण्याचे प्रमाण वाढते. वाळा पिकांचेही संरक्षण करते. खोड पोखरणाऱ्या कीटकांना ती आकर्षित करते, जे वाळ्यावर अंडी घालतात. वाळ्याच्या पानांवरील लोमश रचनेमुळे कीटकांचे डिंभ (अळ्या) पानांवरून खाली पडतात आणि मरून जातात. कॉफी, कोको, चहा यांच्या मळ्यात वाळ्याचा पाला खत म्हणून वापरतात. पाल्यापाचोळ्यापासून या वनस्पतींना पोषक घटक उपलब्ध होतात.