सपुष्प वनस्पतींच्या ऑर्किडेसी या कुलातील ऑर्किड (आमर) ही एक वनस्पती आहे. अंटार्क्टिका तसेच वाळवंट सोडून सर्व वनप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात. उष्णकटिबंधात यांच्या अनेक जाती आढळत असून त्या अपिवनस्पती (दुसर्या वनस्पतींच्या आधारे वाढणार्या वनस्पती) आहेत. मात्र, त्या परजीवी नाहीत. समशीतोष्ण भागात ही वनस्पती जमिनीवर वाढते. काही ऑर्किड मृतोपजीवी असून त्या पर्णबुरशीसारख्या मृत सेंद्रिय पदार्थांवर वाढतात. अपिवनस्पती प्रकारातील या जातीची हवाई मुळे आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. ऑर्किडच्या जमिनीवर वाढणार्या जातींमध्ये आभासी मूलक्षोड (कंद) आढळतात.
बहुतेक ऑर्किड वनस्पतींना लहान फुले येतात. प्लीरोथॅलीसासारख्या फुलांचा आकार ३ मिमी. एवढा लहान असतो, तर कॅटेलियासारखी फुले मोठी, पसरट पाकळ्यांची व १५-२० सेंमी. पर्यंत लांब असतात. या फुलांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतागुंत असून परागीभवन घडून येण्यासाठी विशिष्ट फुलपाखरे किंवा कीटक विशिष्ट प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होतात. ऑर्किडच्या २०० जातींमध्ये स्वयंपरागीभवन घडून येते. मात्र हवा किंवा पाणी यांच्यामार्फत त्यांचे परागीभवन होत नाही.
ऑर्किडच्या फुलांची रचना इतर फुलांहून वेगळी असून निदलपुंजे आणि पाकळ्या यांमध्ये फरक आढळत नाही. फुलाचे बाहेरील आवरण तीन सारख्या आकाराच्या दलांचे असते. आत तीन दले असून त्यांपैकी एक आकाराने मोठे व पसरट असलेले दल कीटकास उतरण्यास तळाप्रमाणे काम करते. तिला ओष्ठ म्हणतात. तिला खाली मधुरसासाठी सोंड (शुंडिका) असते. कळीच्या अवस्थेत हा ओष्ठ वरच्या बाजूला परंतु फुलाची वाढ झाल्यावर खाली दिसतो. बहुसंख्य फुलांमध्ये ही प्रक्रिया फुलांचा देठ १८०० कोनात फिरल्यामुळे घडते. काही फुलांमध्ये ही प्रक्रिया थोड्या वेगळ्या तर्हेने घडते, तर काहींमध्ये ही घडत नाही. ऑर्किड फुलांचा बिया निर्माण करणारा भाग म्हणजे त्यांचे जायांग, याचा वरचा भाग (कुक्षी) तीन दलांचा असून परागकण येथे येऊन पडतात. ऑर्किडच्या बहुतांशी फुलांत या तीन दलांपैकी एकाचा आकार चोचीप्रमाणे झालेला असतो. कीटकांवरील परागकण याच भागात सांडतात.
ऑर्किडच्या पुमगात तीन पुंकेसरांपैकी फक्त एक, क्वचित दोन कार्यक्षम असून उरलेले वंध्य असतात व त्यांचे स्वरूप पाकळ्यांसारखे असते. पुंकेसराच्या वरच्या टोकाला परागकोश असतो. त्यात परागकणाची निर्मिती होते. ऑर्किड फुलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जायांग आणि एक किंवा अधिक पुंकेसर एकत्र येऊन त्यांचा एक लहान स्तंभ बनलेला असतो. याला ‘पुंजायांगस्तंभ’ म्हणतात.
पुंकेसरावरच्या परागकोशातील परागकण झुबक्याने असतात. फुलांच्या आकर्षणामुळे त्यावर आलेला कीटक मधुरस शोषण करीत असताना बहुधा त्याच्या डोक्यास हे परागकण चिकटतात. तो कीटक दुसर्या फुलावर गेला असता तेथील चिकट कुक्षीवर हे परागकण पडून परागण घडून येते. यानंतर बनलेले फळ (बोंड) वाळल्यावर तडकते व असंख्य लहान बिया वार्याने पसरतात. ऑर्किडच्या बियांमध्ये भ्रूणपोष (भ्रूणाचे पोषण करणारा थर) तसेच पाणी नसते. त्यामुळे रुजण्यासाठी त्यांना विशिष्ट कवकांची गरज भासते. बियांचे आयुष्य काही आठवड्यांपुरते मर्यादित असल्याने या काळात त्यांना जर योग्य कवक मिळाले नाही तर बिया मरतात.
ऑर्किडमध्ये कीटकांद्वारे परागीभवन घडून येते. फुलातील सामान्य व त्यापेक्षा अनेकविध आढळणारी जटिल संरचना परागणाच्या या खात्रीच्या व काटकसर साधणार्या पद्धतीशी सुसंगत असते. त्यापासून ऑर्किडचा पुढे फार मोठा बीजप्रसार व जातींचा प्रसार घडून आलेला आहे. या कुलातील अनेक वनस्पतींचे शोभेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. मात्र, या कुलातील फक्त व्हॅनिला ही जाती आर्थिक दृष्टया फायद्याची आहे. या जातीपासून मिळणारा व्हॅनिला हा सुंगधी अर्क आइस्क्रीममध्ये मिसळतात. जगभर ऑर्किडची लागवड हा एक हरितगृह उद्योग झालेला आहे. त्यामुळे ऑर्किडचे हजारो संकर निर्माण झाले असून त्याच्या बागा फुलविण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत.