(डेझर्ट इकोसिस्टिम). वाळवंटी परिसंस्था ही पृथ्वीवरील एक प्रमुख परिसंस्था आहे. ती मोठ्या शुष्क क्षेत्रात पसरलेली आहे. वाळवंटी परिसंस्थेतील वनस्पती व प्राणी यांच्यात अत्यंत विषम स्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. येथे वाळवंट हा शब्द इंग्लिशमधील ‘डेझर्ट’ या अर्थी वापरला आहे. या अर्थी वाळवंटात वाळू असतेच, असे नाही. वाळवंटी प्रदेश एवढे कोरडे असतात की, तेथे वनस्पती अत्यंत तुरळकपणे उगवतात. या तुरळक वनस्पतींमुळे तेथील भूप्रदेश बऱ्याच प्रमाणात उघडा असतो. कमालीच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात तर कोणतीही वनस्पती उगवत नाही.

भूशास्त्रीयदृष्ट्या वाळवंटी प्रदेश पृथ्वीवर तुलनेने नव्याने उदयास आले आहेत. सीनोझोइक कालखंडात म्हणजे सु. ६.५ कोटी वर्षे पूर्वीपासून आजपर्यंत हवामान थंड आणि परिणामी रुक्ष होत गेल्याने वाळवंटीकरण घडले आणि त्याचबरोबर वाळवंटी प्रदेशालगतच्या कमी रुक्ष भागात गवताळ प्रदेशाची (सॅव्हाना) किंवा खुरट्या झुडपांच्या भूमीची वाढ झाली. त्यामुळे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उष्ण व समशीतोष्ण प्रदेशालगत वाळवंटी परिसंस्था विकसित झाल्या. या भागात सूर्यप्रकाश तीव्र असतो. विषुववृत्तीय उष्णतेमुळे तयार झालेले मोठ्या प्रमाणावरील वातावरणीय अभिसरण या प्रक्रियेस मदत करते. तसेच पावसाचे ढग अडविणारे पर्वत वाळवंटीकरणास साहाय्य करतात. अशा पर्वतांच्या पलीकडे पर्जन्यछायेचे प्रदेश असतात. शिवाय भूप्रदेश शुष्क होण्याचे कारण काही अंशी मानवी उपसर्ग हे असते. मोठ्या प्रमाणात गुरे चराईमुळे खुरटे गवत नष्ट होते आणि आधीच शुष्क असलेल्या जमिनी आणखी शुष्क होतात.

वाळवंटी परिसंस्था विविध परिसरांशी निगडित असल्याने या परिसंस्थेची ‘सर्वसमावेशक’ व्याख्या करता येत नाही. मात्र हे निश्चित की, या परिसंस्थेत पाण्याची कमतरता असल्याने वनस्पतींना पुरेसे पाणी मिळत नाही. सूर्यप्रकाश उपलब्ध असला, तरी पाण्याअभावी उत्पादकता कमी असते. अन्नसाखळीत उत्पादक सजीव कमी असल्याने त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सजीव संख्येने आणखी कमी असतात. दिवस आणि रात्र यांच्या तापमानात मोठा फरक असतो. उष्ण वाळवंटात दिवसा साधारणपणे ४० से. पेक्षा अधिक तापमान असते, तर रात्रीचे तापमान २० से. पेक्षा कमी असते. त्यामुळे दिवसा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि रात्री थंडीपासून बचाव होण्यासाठी ऊर्जानिर्मिती करावी लागते. वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण जवळजवळ शून्य मिमी. (दक्षिण अमेरिका व आफ्रिका येथील वाळवंटे) ते ६०० मिमी. पर्यंत (मादागास्कर) एवढे विविध असते. सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटात पावसाचे वार्षिक प्रमाण ७५० मिमी. पेक्षा कमी असते. सबंध वर्षभरात पाऊस १०–१५ दिवस पडतो. चिलीमधील कोचोनस येथील वाळवंटात १९१९ ते १९६४ या ४५ वर्षांत एकदाही पाऊस पडल्याची नोंद नाही. तसेच जेथे थोडा पाऊस पडतो, तेथे अन्नधान्यनिर्मिती होत नाही. खुरट्या गवतावर जनावरे चारणे हाच मानवासाठी अन्ननिर्मितीचा मार्ग ठरतो.

वाळवंटे जशी उष्ण असतात, तशी शीतही असतात. समुद्रकिनाऱ्यापासून दूर आणि समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात शीत वाळवंटे आढळतात; जेथील वातावरणात बाष्प अतिशय कमी असते, तेथे असा शुष्क प्रदेश तयार होतो. मध्य आशियातील शीतशुष्क प्रदेशाचे क्षेत्रफळ सर्वांत अधिक आहे; उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका येथील शीतशुष्क प्रदेशाचे क्षेत्रफळ त्यापेक्षा कमी आहे. शीत व उष्ण या दोन्ही वाळवंटी प्रदेशांत जमिनीतील पाणी कमी उपलब्ध होते. काही वेळा उष्ण (शुष्क), तसेच शीत वाळवंटाखेरीज अर्धशुष्क आणि किनारी वाळवंटे असेही वाळवंटांचे प्रकार केले जातात. अर्धशुष्क वाळवंटात पावसाचे प्रमाण वर्षाला २४० मिमी.पेक्षा अधिक असते आणि तापमान शुष्क वाळवंटाच्या तुलनेत कमी विषम असते. किनारी वाळवंटे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असून तेथे अर्धशुष्क वाळवंटापेक्षा पावसाचे प्रमाण जास्त असते आणि तापमान कमी विषम असते.

वाळवंटी प्रदेशातील वनस्पती-प्राणी यांचे पूर्वज आधी आर्द्र असलेल्या अधिवासातील वनस्पती-प्राणी यांच्यापासून उत्क्रांत झाले आहेत. अशी उत्क्रांती प्रत्येक खंडात स्वतंत्रपणे घडून आली आहे. असे असले तरी वाळवंटी प्रदेशांत आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये लक्षणीय सामाईकपणा आढळतो. असे बदल या वनस्पतींमधील जन्मजात पूर्वबदल क्षमतेमुळे घडून आले असावेत. शिवाय एका वाळवंटी प्रदेशांतून दुसऱ्या वाळवंटी प्रदेशात यादृच्छिक बीजप्रसारातून झालेल्या स्थलांतरामुळेही हे शक्य झाले असावे. असे स्थलांतर उत्तर तसेच दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका येथील वाळवंटात मागील वीस लाख वर्षांत मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रदेशांत आढळलेल्या फुलांतील सारखेपणावरून हे सिद्ध झाले आहे. उदा., क्रिओसोट बुश नावाचे उत्तर अमेरिकेतील वाळवंटातील झुडूप सु. ११,५०० वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत स्थलांतरित झाले आहे. उत्तर गोलार्धातील वालुकामय प्रदेशातून दक्षिण गोलार्धातील वालुकामय प्रदेशात स्थलांतरित होण्यासाठी खारवट किनारपट्टीचा अधिक वापर होतो. काही वेळा समुद्राच्या पाण्याबरोबर अशा बिया तरंगत किनाऱ्याला लागतात. किनोपॉड कुलातील काही वनस्पती चक्क पाण्यातून ऑस्ट्रेलियात पोहोचल्या आहेत.

वाळवंटी वनस्पती

अनेक वाळवंटी प्रदेशात डेझी कुलातील वनस्पती प्रामुख्याने आढळतात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, मध्यपूर्व आशिया आणि उत्तर अमेरिका येथे त्यांचे प्रमाण अधिक आहे. आर्टेमिसिया आणि सेनेसिओ या वनस्पती सार्वत्रिक असल्या, तरी त्यांच्या कुलातील विविध प्रजाती निरनिराळ्या वाळवंटी प्रदेशांत आढळतात. इराण, सहारा आणि थर या वाळवंटी प्रदेशात गवताच्या जाती अधिक आहेत. भारताच्या थर या वाळवंटात डेझी कुलातील वनस्पतींमध्ये अधिक विविधता आहे. तसेच घेवडा कुलातील वनस्पतीही त्याखालोखाल आढळतात.

शुष्क प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक वनस्पतीही असतात. काही ठिकाणी वनस्पतींमध्ये रसाळ पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. त्यांची मुळे वरवर परंतु दूरवर पसरलेली असतात. पावसाचे पाणी चटकन शोषून घेणारी वैशिष्ट्यपूर्ण केशमुळे असतात. उदा., पर्णहीन निवडुंग. पानांद्वारे पाणी निसटून जाऊ नये म्हणून पानांवर मेणचट थर असतो, तसेच पर्णरंध्रे दिवसा बंद राहतात. उदा., घायपात, केकताड इत्यादी. किनोपॉड कुलातील वनस्पती ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, सहारा ते इराण, भारत या भूभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उगवलेल्या दिसतात. मध्य आशियात मात्र किनोपॉड दुर्मीळ आहेत. निवडुंग कुलातील वनस्पती अमेरिका व मेक्सिको येथे ठळकपणे दिसतात, इतरत्र मात्र कमी प्रमाणात आहेत. संख्येने लहान परंतु कमी प्रसिद्ध फ्रँकेनिएसी कुलातील रेताड असलेल्या जमिनीत उगवणाऱ्या वनस्पती फक्त उत्तर आफ्रिकेपासून मध्य आशियापर्यंत पसरलेल्या आहेत.

वाळवंटी प्रदेशात वृक्ष तसेच मोठी झाडे अगदीच नाहीत, असे नाही. मात्र ती फारशी आढळत नाहीत. काही वाळवंटी प्रदेशात तर ती नाहीशी झाली आहेत. याचे प्रमुख कारण मानवी कृती हे आहे. वाळवंटी प्रदेशातील वृक्ष बव्हंशी घेवडा कुलातील बाभूळ तसेच तमाल प्रजातीतील असतात. या प्रदेशातील सूचिपर्णी वृक्षांच्या जाती स्थानपरत्वे बदलतात. जसे पायनस (उत्तर अमेरिका), कॅलिट्रिस (ऑस्ट्रेलिया), क्युप्रेसस (उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व आशिया) इत्यादी.

बहुतेक शुष्क ठिकाणी बहुवर्षीय गवत कुलातील वनस्पती सर्वत्र आढळतात. उत्तर गोलार्धात उष्ण वाळवंटात अरिस्टीडा आणि पॅनिकम, तर समशीतोष्ण वाळवंटात स्टिपा आढळते. ऑस्ट्रेलियातील वाळवंटात स्पिनिफेक्स जातीचे गवत सर्वत्र दिसून येते. काही वनस्पती फक्त ठरावीक वाळवंटी प्रदेशातच आढळतात. उदा., मेक्सिको आणि अमेरिका यांच्या सीमेवर असलेल्या सोनोरान वाळवंटात उंच वाढणारे सॅग्वारो निवडुंग हे त्या वाळवंटाचे वैशिष्ट्य आहे. जोशुआ वृक्ष (युका ब्रेव्हिफोलिया) हे मोजाव्हे वाळवंटाचे वैशिष्ट्य आहे. क्रिओसोट झुडूप हे सॅग्वारो तसेच मोजाव्हे वाळवंटात आढळते. यूफोर्बिया ही वनस्पती पूर्व आफ्रिका येथील वैशिष्ट्य आहे.

वाळवंटातील प्राणी

वाळवंटी प्रदेशातील मोठ्या आकारमानांच्या प्राण्यांमध्ये स्थानपरत्वे ठळकपणे वेगळेपणा दिसून येतो. ऑस्ट्रेलिया इतर खंडापासून अलग असल्याने हा वेगळेपणा प्रकर्षाने दिसून येतो; तेथील सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये खूपच विविधता आहे. तेथील सस्तन प्राणी हे शिशुधानी गटातील आहेत; कृंतक गटातील नाहीत. कांगारू, वालाबी, बँडिकूट व बिळातून राहणारे शिशुधानी सोनेरी मोल ही येथील वैशिष्ट्ये आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वत्र आढळणारा यूरोपियन ससा मात्र तेथे आणला गेला असून त्याला प्रतिकार करणारा मांसाहारी प्राणी नसल्याने त्यांची संख्या अनिर्बंध वाढली आहे. सशाखेरीज उंटदेखील ऑस्ट्रेलियात आयात केला गेला आहे. सध्या वन्य स्थितीतील उंट जगात फक्त ऑस्ट्रेलियात पाहायला मिळतात.

उष्ण प्रदेशातील वाळवंटात अनेक मोठे शाकाहारी सस्तन प्राणी उदा., उंट, गाढव, मेंढी, बकरी, घोडा हे पाळीव झाले आहेत. वन्य प्राणी जसे गॅझेल, आयबेक्स, ओरायएक्स त्यामानाने दुर्मीळ आहेत. तेथे बिळात राहणारे लहान सस्तन प्राणी आणि सरीसृप अधिक आहेत. तेथेच कोल्हा, लांडगा, तरस व बिबट्या यांसारखे मोठे मांसाहारी सस्तन प्राणी आढळतात. मात्र एके काळी वाळवंटी प्रदेशांत वावरणारा सिंह आता स्थलांतरित झाला आहे.

वाळवंटी प्रदेशातील पक्षी बहुधा भटके आहेत. जेथे नुकताच पाऊस झाला आहे तेथे अन्नाची उपलब्धता वाढते, अशा जागा पक्षी शोधून काढतात. बिया खाणारे फिंच, कबुतरे हे वाळवंटातील मुख्य पक्षी आहेत. ऑस्ट्रेलियात कबुतराऐवजी बडगेरीयर नावाचा वाळवंटी पोपट आढळतो. शिकारी पक्ष्यांना त्यांच्या शिकारीतून पाणी मिळते, परंतु बिया खाणाऱ्या पक्ष्यांना पाण्यासाठी बरेच अंतर उड्डाण करावे लागते.

वाळवंटी परिसंस्थेची उत्पादकता कमी असली, तरी वाळवंटी प्रदेश तापल्यावर तेथील हवा तापून वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. जगातील भूभागापैकी सु. २०% वाळवंटी प्रदेश असला, तरी जगातील लोकसंख्येच्या सु. १६% व्यक्ती वाळवंटी प्रदेशांत राहतात. वाळू, खाणउद्योग, मीठनिर्मिती, सौर विद्युतनिर्मिती, खनिज तेलउद्योग असे महत्त्वाचे उद्योग वाळवंटी प्रदेशांत चालतात.