सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ठरविला जातो. याच कालावधीत सजीवाच्या संरचनेत आणि कार्यात अनेक बदल घडून येतात. सर्व सजीवांचा आयुःकाल ठराविक व जातीसापेक्ष असतो आणि वयोवृद्धी काय आहे, हे दाखवितो. सजीवांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांच्या आयुःकालात खूप विविधता आढळते. सजीवांच्या आयुःकालातील फरक, संकर, उत्परिवर्तक, लिंग आणि वाण या बाबींवरून असे लक्षात येते की, सजीवांचा आयुःकाल जनुकांनुसार निश्चित होतो. सध्याच्या घडीला मृत्यूसंबंधी अचूक माहिती काही मोजक्या सजीवांबद्दलच उपलब्ध आहे.
सजीवांच्या जातीतील एखादा सजीव जास्तीत जास्त किती काळ जिवंत राहिला किंवा त्या जातीतील सजीवांचे सरासरी आयुर्मान काय आहे या दोन प्रकारांवरून आयुःकाल मोजतात. वरीलपैकी पहिल्या प्रकाराने मोजलेल्या आयुःकाल जनुकीय क्षमता दाखवितो, तर दुसर्या प्रकाराने मोजलेला आयुःकाल (सरासरी आयुर्मान) पर्यावरण किती अनुकूल आहे हे दाखवितो. सरासरी आयुर्मान हे आयुःकालाचे जास्त अर्थपूर्ण परिमाण मानले जाते. वेगवेगळ्या सजीवांचा आयुःकाल वेगवेगळा असतो. उदा., रोटिफेरा संघातील काही प्राण्यांचा आयुःकाल केवळ ८ दिवस आहे, तर कासवाचा आयुःकाल सु. १५० वर्षे आहे. उच्च वर्गातील सपुष्प वनस्पती काही हजारो वर्षे जगतात. सस्तन प्राण्यांमध्ये, मनुष्याचा सर्वाधिक आयुःकाल १२२ वर्षे, तर देवमाशाचा आयुःकाल सु. २०० वर्षे आढळला आहे.
सजीव वर्षे
१. व्हेल (देवमासा) २००
२. कासव १५०
३. माणूस १२२
४. काकाकुवा ८०
५. भारतीय हत्ती ७८
६. गेंडा ५५
७. घोडा ५०
८. अस्वल ५०
९. मगर ५०
१०. सारस ४५
११. कावळा ४५
१२. चिपॅंझी ४०
१३. शहामृग ४०
१४. सिंह ३५
१५. गाय ३०
१६. कबूतर ३०
१७. मांजर २७
१८. रानडुक्कर २५
१९. कुत्रा २५
२०. बिबळ्या २५
२१. मेंढी १५
२२. बेडूक १५
२३. स्पंज १५
२४. तरस १४
२५. गिनी पिग १४
२६. कोल्हा १२
२७. शेवंडा १०
२८. गांडूळ १०
२९. मुंगूस ८
३०. कसर ७
३१. समुद्री घोडा ६
३२. ईल ६
३३. मुंगी ५
३४. पांढरा उंदीर ५
३५. काळा उंदीर ३
३६. कामकरी मधमाशी ४ महिने
३७. रोटिफर ८ महिने
प्राण्यांप्रमाणे वनस्पतींचा आयुःकाल असतो. वनस्पतींच्या विशिष्ट संरचनेमुळे त्यांचा आयुःकाल निश्चित करणे अवघड असते. उदा., बियांचे अंकुरण होऊन वनस्पती वाढत असली तरी बिया हजारो वर्षे सुप्तावस्थेत असू शकतात. उदा., नीलंबो ल्युसिफेरा नावाच्या कमळाचे बी सु. १,००० वर्षे सुप्तावस्थेत राहिल्याचे दिसून आले आहे. प्राणि-ऊतींच्या तुलनेत वनस्पतींमधील भ्रूणि-ऊतींची वाढ दीर्घकाळ चालू राहते. काही वनस्पतींमध्ये तर त्यांच्या मृत्यूपर्यंत वाढ होत असते. अशा वनस्पतींमध्ये खोडाच्या आणि मुळांच्या टोकाशी असलेल्या विभाजी पेशींचे विभाजन सतत होत असल्यामुळे त्यांची वाढ सतत होत असते. वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या आयुःकालानुसार करतात : वर्षायू, द्विवर्षायू, बहुवर्षायू. वृक्षांच्या खोडातील वार्षिक वलये मोजून त्यांचा आयुःकाल मोजतात. यूरोपातील यू नावाच्या वनस्पतीचा आयुःकाल ९००-३,००० वर्षे, तर लिंडन नावाच्या वनस्पतीचा आयुःकाल २,०००-३,००० वर्षे आहे. कॅलिफोर्नियातील रेडवूड वृक्ष ४,०००-५,००० वर्षे, तर पाइन वृक्ष ५,०००-८,००० वर्षे जगतो.
जीवाणू आणि आदिजीवांसारख्या एकपेशीय जीवांमध्ये सतत अलैंगिक प्रजनन घडून येत असल्यामुळे त्यांचे वयोमान निश्चित करता येत नाही. कोणत्याही जीवाणूचे विभाजन होऊन दोन पेशी निर्माण होतात. अशा प्रकारे या जीवांचे विभाजन झाल्यामुळे एक प्रकारे पुनर्युवीकरण होत असते. म्हणून त्यांचा मृत्यू होतो असे म्हणता येत नाही.
प्राण्यांचे शरीर अनेक पेशींचे बनलेले असून त्यात सतत चयापचय चालू असते. पेशींची झीज होत असते व त्यांचा नाश होत असतो. त्याचबरोबर नवीन पेशी तयार होऊन ही झीज लगेच भरुन काढली जात असते. काही काळानंतर पेशींची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि श्वसन, रक्ताभिसरण व हृदयगती बंद पडून मृत्यू येतो. माणसाव्यतिरिक्त इतर प्राण्यांत जन्म-मृत्यू नोंदीच्या अभावी आयुःकाल निश्चित करणे अवघड असते. हल्ली प्राणि-संग्रहालये, जलजीवालये, उपवने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व वन्य प्राण्यांची संरक्षित आश्रयस्थाने अशा ठिकाणी प्राण्यांचे संगोपन काळजीपूर्वक होऊ लागल्यामुळे आयुःकालासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध झाली आहे. निसर्गात राहणार्या प्राण्यांच्या आयुःकालापेक्षा संरक्षित ठिकाणी असलेल्या प्राण्यांचा आयुःकाल अधिक असतो. तसेच नरांच्या तुलनेत मादीचा आयुःकाल १०-१५% अधिक असल्याचे आढळले आहे.
वैज्ञानिकांनी पृष्ठवंशी प्राण्यांच्या आयुःकालाविषयी काही निश्चित अनुमाने काढली आहेत. या प्राण्यांचा आयुःकाल शरीराचे तापमान, शरीराचे तसेच मेंदूचे वस्तूमान, प्रजननाचा दर, चयापचयाचा दर इ. बाबींवर अवलंबून असतो. प्रजननाचा दर जेवढा जास्त तेवढा आयुःकाल कमी असतो. उदा., उंदराची एका वर्षात १०-१२ वेळा वीण होते. उंदराचा आयु:काल २-३ वर्षे आहे. गाय, घोडा, माणूस यांना वर्षातून एकदाच पिलू किंवा मूल होत असते. त्यांचा आयु:काल ३०-७० वर्षे आहे. चयापचयाचा दर आणि आयु:काल यांत व्यस्त संबंध आढळतो. चयापचयाचा दर कमी असल्यास आयु:काल वाढतो.
माणसाचा सरासरी आयु:काल एकच जन्मदिन असलेल्या एक हजार माणसांतील किती माणसे किती वर्षे जिवंत राहिली असा हिशेब करून मांडतात. माणसाच्या आयु:कालात स्थल-कालानुसार फरक असतो. उष्णकटिबंधातील माणसांचा आयु:काल कमी, तर समशीतोष्ण व थंड हवामानात राहणार्या माणसांचा आयु:काल जास्त असतो. समतोल आहार, पुरेशी जीवनसत्त्वे, आरोग्यदायी राहणी, सांसर्गिक रोगांवर मात, आधुनिक औषधे व शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध असलेले प्रगत तंत्रज्ञान यांमुळे माणसाचा आयु:काल वाढत गेलेला आहे. २०१० साली भारतातील पुरुषांचा सरासरी आयु:काल ६७ वर्षे तर स्त्रियांचा ७२ वर्षे इतका आढळला आहे. आहार, आर्द्रता, तापमान व लोकसंख्येची घनता या पर्यावरणीय घटकांमुळे आयु:कालाच्या कालावधीत परिणाम होऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली आणि समतोल आहार यांमुळे आयु:काल वाढू शकतो, तर व्यसनाधीनता व मानसिक ताण-तणाव यांमुळे आयु:काल कमी होतो.