पाने व फुलो-यासह आघाडा

ही वर्षायू ओषधी अ‍ॅमॅरॅंटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅचिरँथस अ‍ॅस्पेरा आहे. ही वनस्पती सर्वत्र (समुद्रसपाटीपासून सु. १,००० मी.उंचीपर्यंत) मोकळ्या पडिक जागी किंवा कचर्‍याच्या ढिगाच्या आसपास तणाप्रमाणे वाढते. ती आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील उष्ण देशांत आढळते.

आघाड्याची पाने साधी, समोरासमोर, लंबगोल किंवा वर्तुळाकृती असून पानांच्या खालच्या बाजूला मऊ लव असते. फुले हिरवट पांढरी व अनेक फांद्यांच्या टोकांना, लांब कणिश फुलोर्‍यावर नोव्हेंबर-जानेवारीत येतात. फुलोरा ४५ सेंमी.पर्यंत लांब असू शकतो. फळे लहान, शुष्क व एकबीजी असतात. बी लहान व पिंगट असते. आघाड्याचा एक वेगळा प्रकार आढळतो. त्याचे सर्वच भाग लालसर असतात.

आघाड्याच्या मुळांचा भिजवून काढलेला रस सौम्य स्तंभक (आकुंचन करणारा) असतो. पानांच्या भुकटीचा काढा मधाबरोबर अतिसारात व आमांशात उपयुक्त ठरतो. बिया वांतिकारक व आलर्क रोगावर गुणकारी असतात. वनस्पतीचा रस तिखट, रेचक व मूत्रवर्धक असून मूळव्याध, गळवे, चर्मरोग, शूल इ. व्याधींवर देतात. या वनस्पतीची राख खोकला व दम्यावर उपयुक्त असते; तसेच ती रंगकामात व कपडे धुण्यास वापतात. आघाड्याची राख मिसळलेले तिळाचे तेल कानदुखीवर व फक्त राख व्रणावर बाहेरून लावतात.