नारळाच्या वृक्षासारखा एक वृक्ष. जहरी नारळ या वृक्षाचा समावेश ॲरेकेसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव लोडोइसिया माल्दिविका आहे. ॲरेकेसी कुलात नारळ, ताड, खजूर इ. वृक्षांचा समावेश होतो. हा वृक्ष मूळचा सेशेल बेटांवरील आहे. चिखलाची जमीन असलेल्या वर्षावनांत हा वाढतो. या वृक्षाला सी कोकोनट पाम, डबल कोकोनट पाम किंवा सेशेल नट असेही म्हणतात. हा वृक्ष भारतीय उद्यानांत शोभेसाठी लावलेला दिसून येतो.
जहरी नारळ (लोडोइसिया माल्दिविका)

जहरी नारळ वृक्ष सु.२५―३० मी. उंचीपर्यंत वाढतो. खोड सरळ व गुळगुळीत, परंतु त्यावर वलयाकृती व्रण असतात. खोड जमिनीलगत फुगलेले असून त्याच्या चोहोबाजूंनी मुळ्या निघून जमिनीत गेलेल्या असतात. त्यामुळे कितीही वेगवान वारा आला तरी हा वृक्ष उन्मळून पडत नाही. पाम कुलातील इतर वनस्पतींप्रमाणे याला शाखा नसतात. शेंड्याला मोठ्या, साध्या व पंख्यासारख्या जाड पानांचा झुबका (पर्णवृंत) असतो. पान मोराच्या पिसासारखे असून देठ सु.३ मी. लांब व पात्याचा व्यास सु.१.८ मी. असतो. याचे नर व मादी असे स्वतंत्र वृक्ष असतात. फुले पानांच्या बगलेत स्थूलकणिशावर येतात. नरवृक्षावरील फुले लोंबत्या कणिशावर असून त्यांची मांडणी चक्राकार असते. मादीवृक्षावर मादी-फुले थोडी व छदांपासून बनलेल्या कपासारख्या अवयवात असतात. नर-फुलांत १७—२२ पुं-केसर असतात. परागण पाऊस व वारा यांद्वारे होते. फळ आठळीयुक्त, एकबीजी, फार मोठे (४०—५० सेंमी. व्यासाचे) व हिरवे असते. उघडल्यावर ते दोन नारळ एकमेकांना जुळल्यासारखे दिसते. आठळी (कोय) कठीण, व्दिखंडी आणि कवचाला चिकटलेली असते. अंत:कवच (करवंटी) जाड व काळे असते. पूर्ण वाढलेल्या फळाचे वजन १५—३० किग्रॅ. भरते. सर्व वनस्पतींमध्ये सर्वांत जास्त वजन या फळाचे असते. फुले येऊन फळ पिकून बी तयार होण्यासाठी सु. १० वर्षे लागतात. याचे बी सु.३० सेंमी. व्यासाचे असून त्याचे वजन सु. १८ किग्रॅ. असते. हे सर्वांत मोठे बी आहे. फळांचा वापर आयुर्वेदिक औषधांत करतात. आठळीच्या करवंटीपासून कटोरे, बश्या, पेले, अलंकार वगैरे बनवितात. कोवळी पाने सुकवून व त्यांच्या पट्ट्या काढून हॅटकरिता वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा