ॲनाकोंडा

मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने याला पाण-अजगर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव युनेक्टस म्युरिनस आहे.

सर्वसाधारणपणे ची लांबी सु. ९ मी. आणि वजन सु. २५० किग्रॅ. पर्यंत असते. रंग तपकिरी, पिवळा किंवा हिरवा असून पाठीवर मोठे, काळे व अंडाकृती ठिपके; तर पोटाकडच्या पांढुरक्या भागावर लहान काळी वलये असतात. डोके लांबट, चपटे आणि मानेपासून स्पष्टपणे वेगळे दिसते. मासे हे त्याचे प्रमुख भक्ष्य असून बर्‍याचदा तो लहान सरपटणारे प्राणी, पक्षी आणि लहान सस्तन प्राण्यांवर उपजीविका करतो. तो भक्ष्याभोवती आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला गुदमरून मारतो आणि नंतर गिळतो. शत्रूपासून बचाव करताना तो निसटून जाण्याचा प्रयत्‍न करतो, निसटणे अशक्य झाल्यास शत्रूचा चावा घेतो. तो विषारी नाही, मात्र त्याच्या चाव्यामुळे खोल जखमा होतात.

ॲनाकोंडाची मादी आकाराने मोठी असते. मादीला दरवर्षी २०-४० पिल्ले होतात. ती सु. ९० सेंमी. लांब असतात. जन्मल्याबरोबर पिले स्वतंत्रपणे राहू लागतात.

ॲनाकोंडाची लांबी, भक्ष्यग्रहणशक्ती आणि माणसांवरील हल्ले यांविषयी अतिरंजित भयप्रद वर्णने पूर्वीच्या काळी केलेली आहेत. मात्र सहसा तो माणसावर हल्ला करीत नाही.