अल्फा-विषाणूंनी बाधित झालेले डास चावल्यामुळे होणारा एक आजार. हातापायांचे सांधे सतत दुखणे, अंगावर (विशेषकरून हात, पाय, छाती व पाठीवर) पुरळ उठणे, डोके दुखणे आणि ताप येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. चिकुनगुन्याची सुरुवातीची लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणे असतात. मात्र, या आजारामुळे सांधेदुखी दीर्घकाळ टिकून राहते आणि रुग्ण पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो.या संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते आणि म्हणून त्या रुग्णाला पुन्हा चिकुनगुन्या होण्याची शक्यता कमी असते. विशेष म्हणजे हा आजार जीवघेणा नाही.
ईडिस ईजिप्ताय डास

चिकुनगुन्या हा शब्द आफ्रिकेतील माकोंडे भाषेतील असून या शब्दाचा अर्थ ‘वाकवणारा’ असा आहे. या आजारात सांधेदुखीमुळे रुग्ण वाकून चालतो. त्यामुळे चिकुनगुन्या झालेल्या रुग्णाला हा शब्द बरोबर लागू पडतो. टांझानिया आणि मोझँबिक देशांच्या सीमेवर असलेल्या माकोंडे पठारावर सन १९५२ मध्ये या रोगाची प्रथम माहिती झाली. १९५५ मध्ये रॉबिन्सन आणि लुम्स्डेन यांनी या रोगाचे निदान केले.

ईडिस ईजिप्ताय नावाचे डास हे चिकुनगुन्या विषाणूंचे मुख्य वाहक आहेत. दिवसा चावणारे डास हे या रोगाला कारणीभूत असल्याचे दिसले आहे. चिकुनगुन्याचा विषाणू सामान्यपणे उष्ण प्रदेशात आढळतो आणि म्हणूनच या आजाराचे रुग्ण आफ्रिका व आशिया खंडांत आढळतात. चिकुनगुन्या डासांच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. या डासांच्या अळ्या फुलदाण्या, पाण्याची भरलेली पिंपे व नारळाच्या करवंट्यातील पाणी अशा मनुष्यवस्तीभोवती साचलेल्या पाण्यावर वाढतात. परिणामी, अशा वस्तीतील माणसांना हे डास चावण्याचे प्रमाण वाढते आणि चिकुनगुन्या विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. अलीकडे ईडिस अल्बोपिक्टस नावाचे डास या रोगाचे वाहक असल्याचे दिसून आले आहे.

चिकुनगुन्याची लागण होताच थंडी वाजणे, ताप येणे, उलटी होणे, अन्नावरची वासना उडणे, डोके दुखणे आणि सांधे दुखणे यांपैकी कोणते तरी एक लक्षण ठळकपणे दिसते. लक्षणे एकाएकी दिसायला लागून काही वेळा अंगावर पुरळ उठते. तीव्र सांधेदुखी हे चिकुनगुन्याचे मुख्य आणि चिंतादायक लक्षण असते.

चिकुनगुन्या विषाणू

चिकुनगुन्या या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. हा आजार अंगभूत रोगप्रतिकारशक्तीमुळे बरा होत असल्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसते. उपचार प्रामुख्याने लक्षणे दूर करण्यासाठी केले जातात. पुरेशी विश्रांती, द्रवरूप आहार आणि वेदनाशामके घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो. सध्या या रोगावर लस तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

दर ७-८ वर्षांनी चिकुनगुन्याची साथ पसरते, असे दिसून आले आहे. १९६०-८० दरम्यान या आजाराची साथ आफ्रिका आणि आशिया खंडांत पुन: पुन्हा येत असे. मागील काही वर्षांत भारत, इंडोनेशिया, मालदीव आणि थायलंड या देशांत साथ आली होती. २००६ मध्ये चिकुनगुन्याची मोठी साथ फ्रान्समधील ला-रियुनियन आयलंड बेटावर आली होती. त्यामुळे सु. १,००,००० लोक या आजाराने बाधित झाले होते. २०१० मध्ये भारताच्या दिल्ली शहरात चिकुनगुन्याची साथ आली होती. मात्र, हा आजार जीवघेणा नसल्यामुळे चिकुनगुन्या झालेल्या रुग्णांची नोंद नीट होऊ शकली नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा