मांसल व छत्रीसारख्या आकाराच्या कवकाचा एक प्रकार. सामान्यपणे गवताळ प्रदेशांत आणि वनांत अळिंब वाढतात. जगभर यांचे ५,००० हून अधिक प्रकार आढळतात. याला ‘छत्रकवक’ किंवा ‘भूछत्र’ असेही म्हणतात. बहुतांशी जीवशास्त्रज्ञांनी अळिंब आणि इतर कवकांचे वर्गीकरण सजीवांच्या एका स्वतंत्र सृष्टीत म्हणजे कवके (फंजाय) यामध्ये केलेले आहे. इतर कवकांप्रमाणे, अळिंबामध्ये हरितद्रव्याचा अभाव असतो. जिंवत किंवा मृत वनस्पती व प्राणी किंवा इतर कवके यांच्यापासून अन्नघटक शोषून घेऊन अळिंबे वाढतात.
कवक सृष्टीच्या बॅसिडिओमायकोटा संघाच्या अगॅरिकोमायकोटीना उपसंघाच्या अगॅरिकोमायसिटीज वर्गात अळिंब मोडतात. अस्कोमायकोटा या दुसर्या संघातील काही कवकांनाही (उदा., ट्रफल्स, मोरेल) अळिंब म्हटले जाते; परंतु ती खरी अळिंब नाहीत. मोठ्या आकाराची बॅसिडिओमायकोटा संघातील अनेक कवके उदा., ब्रॅकेट कवके, स्टिंकहॉर्न (पूतिकवक), पफबॉल (भूकंदुक), शँतरेल अळिंबासारखी आहेत.
अळिंबामध्ये दोन भाग असतात: (१) कवकजाल आणि (२) फलकाय (फलशरीर). कवकजालाची वाढ जमिनीत होते आणि ते अन्नघटक शोषून घेते. हा भाग अनेक वर्षे जिवंत राहू शकतो आणि वाढू शकतो. यापासून छत्रीसारख्या आकाराच्या फलकायेची वाढ होते आणि हा भाग काही दिवसच राहतो. त्यादरम्यान, या भागात प्रजननशील पेशींची (बीजाणूंची) निर्मिती होते आणि त्यांपासून नवीन अळिंबे वाढतात. छत्रीसारख्या भागालाच बहुतांशी लोक अळिंब समजतात.
आकार आणि रंग यांमध्ये अळिंबांत विविधता आढळते. यांची उंची २ सेंमी. ते ४० सेंमी. आढळते. छत्रीचा आकार ०.६ सेंमी. ते ४५ सेंमी. असतो. बहुतांशी अळिंबे रंगाने पांढरी, पिवळी, नारिंगी, लाल किंवा करडी असतात. काही रंगाने निळी, जांभळी, हिरवी किंवा काळी असतात.
अळिंबाच्या कवकजालात अनेक पांढरे किंवा पिवळे धाग्यांसारखे तंतू असतात. त्यांना कवकतंतू म्हणतात. कवकजालाच्या वाढीकरिता आणि विकासाकरिता हेच कवकतंतू अन्न व पाणी शोषून घेतात आणि अळिंबाच्या फलकायेची निर्मिती करतात. बहुतेक अळिंबांमध्ये तंतूपासून सैल, जाळीप्रमाणे कवकजाल तयार होते. मात्र, काही जातींमध्ये तंतू एकत्र येऊन त्यांच्या सुतळीप्रमाणे तंतुजटा बनतात.
अळिंबाचे फलकाय घट्ट विणलेल्या तंतूंचे बनलेले असते. यात देठ आणि देठाच्या छताला गोलाकार टोपी असते. अळिंबाच्या अनेक जातींमध्ये टोपीच्या खालच्या भागावर पातळ, उभट व चाकूप्रमाणे वाढ दिसून येते. या वाढीला कल्ला म्हणतात. सायकलीच्या चाकातील तारांप्रमाणे हे कल्ले टोपीच्या मध्यापासून बाहेरच्या दिशेने वाढलेले असतात. ज्या अळिंबांमध्ये कल्ले नसतात त्यांमध्ये टोपीखाली घट्ट व एकमेकांना जुळलेल्या समांतर नळ्या असतात. कल्ल्यांच्या बाहेरील पृष्ठभागावर लहान व गदेच्या आकाराच्या पेशी असतात. या पेशींना बॅसिडिया म्हणतात. एक बॅसिडिया पेशी चार बीजाणूंची निर्मिती करते. या बीजाणूंपासून नवीन कवकजाल वाढते.
अळिंबांना कर्बोदके, प्रथिने, विशिष्ट जीवनसत्त्वे आणि इतर पोषक द्रव्यांची गरज असते. यांच्या कवकतंतूपासून विकरे पाझरतात. कवकतंतू ज्या पदार्थांवर वाढतात, त्यांचे या विकरांमुळे साध्या पदार्थांत रूपांतर म्हणजे अपघटन होते. हे साधे पदार्थ कवकजालांमार्फत शोषले जातात आणि त्यातून अळिंबांची पोषकद्रव्याची गरज भासली जाते.
अळिंबांच्या अनेक जाती मृतोपजीवी आहेत. त्या मृत किंवा मृत पावणार्या पदार्थावर जगतात. काही जाती मृत गवत वा नाशवंत वनस्पती किंवा कुथित मृदा (ह्यूमस) यांपासून अन्न मिळवितात. इतर जाती पडलेले वृक्ष, खुंट (स्टंप) आणि घरांच्या बांधकामासाठी वापरलेल्या लाकडापासून अन्न मिळवितात; तर काही मोजक्या जाती गवतावर जगणार्या प्राण्यांच्या मलावर (विष्ठेवर) जगतात. परजीवी अळिंबे जिवंत वनस्पतींवर, विशेषकरून वृक्षांवर, वाढतात. काही परजीवी अळिंबे ज्या वृक्षांवर वाढतात त्या वृक्षांमध्ये रोगांचा प्रसार करतात आणि परिणामी ते वृक्ष नष्ट होतात.
इतर काही अळिंबे जिवंत वनस्पतींच्या मुळांमध्ये किंवा मुळांवर वनस्पतींना कसलीही हानी न पोहोचविता वाढतात. अशा प्रकारच्या सहचरणाला मूळ-कवकता म्हणतात आणि ते सहचरण अळिंब तसेच वनस्पती या दोन्हींना फायदेशीर ठरते. कवकजाल मातीतून पाणी, खनिजे आणि इतर पदार्थ शोषून वनस्पतींना पुरवितात. याउलट, वनस्पतींपासून अळिंबांना कर्बोदके आणि इतर पदार्थ उपलब्ध होतात.
पक्व झालेल्या अळिंबापासून लक्षावधी बीजाणू विखुरले जातात. हलक्याशा वार्यानेदेखील हे बीजाणू दूर अंतरावर जाऊन पसरतात. मात्र, त्यांपैकी काही मोजकेच बीजाणू अंकुरणासाठी पुरेसे अन्न व बाष्प (आर्द्रता) असलेल्या जागी पोहोचतात. त्यांच्या वाढीला पोषक वातावरण मिळाले की, त्यातून एक किंवा अनेक कवकतंतू फुटून अंकुरण होते. प्रत्येक कवकतंतू त्यांच्या टोकाकडून वाढतो, त्याला फांद्या फुटतात आणि कवकजालाची निर्मिती होते. कवकजालावर टाचणीच्या डोक्याएवढ्या आकाराच्या गाठी तयार होतात. या गाठींना गुंडी (बटन) म्हणतात आणि त्यांचे पक्व अळिंबात रूपांतर होते. गुंडी वाढताना टोपी आणि देठ वाढलेले दिसून येतात. त्यानंतर, टोपीखाली कल्ल्याची वाढ होते. सामान्यपणे देठ सरळ उभा वाढतो, तर टोपीचा आकार वाढून ती उघडलेल्या छत्रीप्रमाणे दिसू लागते. पाणी शोषल्यामुळे पेशींची लांबी वाढल्याने ही वाढ घडून येते. म्हणूनच जोरदार पावसानंतर, एका रात्रीत, अनेकदा अळिंबे अचानक दिसू लागतात. जवळपास ८ ते ४८ तासांत त्यांची उंची पूर्ण वाढलेली असते. बीजाणू हवेत विखुरल्यानंतर फलकाय मरतात आणि त्यांचे अपघटन होते; परंतु कवकजाल बहुधा अनेक वर्षे टिकून राहतात.
अळिंबांचे ‘विषारी’ आणि ‘बिनविषारी’ असे दोन गट पाडले जातात. अनेक देशांत अळिंबे खाल्ली जातात. मात्र विषारी अळिंबांपासून बिनविषारी अळिंबे ओळखण्यासाठी कोणतीही निश्चित चाचणी नाही. केवळ अनुभवानेच ते ओळखता येते. यासाठी काळजीपूर्वक परीक्षा केल्याशिवाय अळिंबे न खाण्याचा सल्ला दिला जातो.
बिनविषारी अळिंबाच्या २,००० पेक्षा अधिक जाती आहेत. या जातींतील सर्वपरिचित अगॅरिकस म्हणजे गुंडी अळिंब (बटन मशरूम). कोवळेपणी याची टोपी पांढरी आणि कल्ले गुलाबी असतात. वाढ पूर्ण झाल्यावर ती करडी होतात. याच्या जवळचा प्रकार म्हणजे फिल्ड किंवा मेडो मशरूम ही अळिंबे हिरवळीवर तसेच कुरणात वाढतात. फेअरी-रिंग मशरूम, ऑयस्टर मशरूम (धिंग्री), पॅरासोल मशरूम आणि शिटेक मशरूम हे प्रकार बिनविषारी आहेत. इंकी कप नावाच्या अळिंबापासून शाईसारखा द्रव मिळतो.
अनेक देशांत अळिंबाची लागवड हा महत्त्वाचा उद्योग आहे. खास उभारलेल्या जागेत अळिंबाची लागवड करण्यात येते. या जागेतील तापमान आणि ओलसरपणा यांवर काटेकोरपणे नियंत्रण राखले जाते. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश व आसाम या राज्यांत अळिंबाची लागवड अधिक प्रमाणावर होत असून गुंडी अळिंब, धिंग्री आणि भात-पेंढीचे अळिंब लागवडीखाली आहेत. वनस्पतींच्या वाढीसाठी जमीन सुपीक होण्यास अळिंब हातभार लावतात. ती ज्यांच्यापासून अन्न मिळवितात त्या पदार्थांचे अपघटन होत असते. या प्रक्रियेमुळे महत्त्वाची खनिजे मातीत मिसळतात. वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी ही खनिजे उपयुक्त ठरतात. हानी पोहोचलेल्या पर्यावरणात वनस्पतींचे पुन:संवर्धन करण्यासाठी अळिंबाचा वापर केला जातो. अशाच तर्हेने, परिसंस्थेत कवकांचे प्राथमिक कार्य अपघटनाचे असल्यामुळे, अळिंबे आणि इतर कवकांचा उपयोग प्रदूषण कमी करण्याकडे केला जाऊ लागला आहे. या तंत्राला जैवोपचारण (बायोरेमेडिएशन) म्हणतात. यासाठी विशिष्ट प्रदूषकाकरिता कोणत्या अळिंबाचा (कवकाचा) उपयोग होईल याचा शोध घ्यावा लागतो. उदा., डीझेल तेलमिश्रित मृदेतील प्रदूषकांचे अपघटन बिनविषारी संयुगांमध्ये घडवून आणण्यासाठी धिंग्री अळिंबे उपयुक्त आहेत, असे आढळून आले आहे.
कीटक तसेच अनेक लहान प्राणी यांचे अळिंब हे अन्न आहे. काही खारी उन्हाळ्यात अळिंबे गोळा करून झाडांच्या फांद्यात सुकण्यासाठी ठेवतात आणि हिवाळ्यात ती खातात.
काही देशांत ताजी अळिंबे कोशिंबिरीमध्ये मिसळतात. तसेच अंडे, मांस, सूप आणि इतर अन्नपदार्थांना स्वाद आणण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ब जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोहयुक्त खनिजांचा ती उत्तम स्त्रोत आहेत. यांखेरीज, अळिंबाच्या औषधी गुणधर्मांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करीत आहेत. कर्करोग, उच्च रक्तदाब आणि इतर रोगांवर ती गुणकारी ठरू शकतात.
विषारी अळिंबे टॉक्सिनची निर्मिती करतात. काही विषारी अळिंबे प्राणघातक आहेत. मात्र काही अळिंबे खाण्यात आल्यामुळे पचन संस्थेचे विकार (जुलाब, ओकारी, पोटदुखी) होतात, डोके दुखते आणि अधिहर्षता (अॅलर्जी) निर्माण होते. डेथ कप ही जाती सर्वांत जास्त विषारी आहे. सुंदर दिसणारी डिस्ट्रॉयिंग एंजल हीदेखील विषारी जाती आहे. ती डेथ कपचाच पांढर्या रंगाचा प्रकार मानला जातो. फ्लाय अगॅरिक ही जातीसुद्धा विषारी आहे. हे रंगाने लालभडक किंवा नारिंगी, बुळबुळीत व चकचकीत असून त्यावर पांढरट चामखिळीसारखे ठिपके असतात. रशियात या अळिंबाचा वापर माश्या मारण्यासाठी केला जातो. माश्यांना आकर्षित करण्यासाठी रशियन लोक या अळिंबावर साखरेचे पाणी मारतात.