(डेंग्यू). एक विषाणुजन्य रोग / ताप. डेंगी हा रोग डेन्व्ही (DENV) या विषाणूमुळे होणारा फ्ल्यूसारखा, तीव्र स्वरूपाचा आहे. ईडिस  प्रजातीच्या मुख्यत: ईडिस ईजिप्ताय  जातीचे डास या रोगाचे वाहक असून या डासांच्या मादीच्या चावण्यामुळे डेंगी होतो, तसेच प्रसारित केला जातो. तीव्र ताप हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. तापाबरोबरच अंग खूप दुखणे, हे सुद्धा एक लक्षण असल्याने या रोगाला ‘हाडमोड्या ताप’ म्हणतात. या रोगाचा प्रसार उष्ण प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर होत असून आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडातील अनेक देशांत या रोगाचे रुग्ण आढळून येतात. काही मोजक्या रुग्णांमध्ये या रोगाचे रूपांतर ‘डेंगी रक्तस्रावात्मक ताप’ किंवा ‘डेंगी आघात लक्षणसमूह’ असे अधिक गंभीर स्वरूपात होते. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. मराठीमध्ये या रोगाला ‘डेंग्यू’ म्हटले जाते. या नोंदीत मात्र डेंगी ही जगात सर्वत्र प्रचलित असलेली संज्ञा वापरली आहे.

इतिहास : अनेक शतकांपासून डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. चीनमधील जीन राजवंशात हा रोग पहिल्यांदा आढळून आला. १५–१९ व्या शतकांच्या दरम्यान आफ्रिकेत अनेकदा डेंगीच्या साथी आल्याचे पुरावे आहेत. मात्र डेंगी कसा होतो आणि त्याचा प्रसार कसा होतो, यासंबंधीची माहिती २०व्या शतकातच झाली. इ.स. १९०६ मध्ये हा रोग ईडिस ईजिप्ताय या डासाच्या चाव्याद्वारे पसरतो, यावर एकमत झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर डेंगीचा प्रसार झपाट्याने होऊन आता तो जागतिक प्रश्न बनला आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आशिया, कॅरिबियन बेटे आणि पॅसिफिक महासागरातील उष्ण प्रदेशांतील देशांमध्ये हा रोग स्थानिक स्वरूपात आढळतो. आज सु. २.५ अब्ज लोक (जगातील ४० टक्के लोकसंख्या) डेंगीच्या प्रसाराचा धोका असलेल्या भागात राहतात. डेंगी शब्दाची उत्पत्ती स्पष्ट नाही; परंतु एका सिद्धांतानुसार स्वाहिली भाषेतील ‘डींगो’ (स्नायूंच्या आणि हाडांच्या वेदना होणाऱ्या व्यक्तीच्या चालण्याचे वर्णन करणारा शब्द) या शब्दावरून ‘डेंगी’ हा शब्द आला असावा, असे मानतात.

विषाणू : डेंगी हा आरएनए प्रकारचा विषाणू असून ‘अर्बोव्हायरस’ म्हणूनही ओळखला जातो. त्यांचे ५ प्रकार आहेत. एका प्रकारच्या विषाणूमुळे रोग होऊन गेल्यावर त्या प्रकारच्या रोगाविरुद्ध आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारशक्ती किंवा रोगप्रतिक्षमता मिळते. पण उरलेल्या चार विषाणूंविरुद्ध ही रोगप्रतिक्षमता अल्पकाळच टिकते. या चार प्रकारच्या विषाणूंचे संक्रामण झाल्यास पुन्हा डेंगी होऊ शकतो आणि तो सहसा जास्त गंभीर असतो.

लक्षणे व चिन्हे : डेंगीच्या संक्रामणक्षम डासाच्या मादीच्या चाव्यानंतर ३ ते १४ (सहसा ४ ते ७) दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. डेंगीच्या विषाणूंची लागण झालेल्या बहुतांश लोकांत (८०%) कोणतेच लक्षण दिसत नाही किंवा अगदी सौम्य ताप येतो. काही जणांना (अंदाजे ५%) मात्र गंभीर रोग होऊन तीव्र लक्षणे दिसतात. त्यातील अगदी थोड्या व्यक्तींसाठी हा रोग जीवघेणा ठरू शकतो.

(१) डेंगी ताप : या रोगात तीव्र ताप, अशक्तपणा, डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे, मळमळणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ किंवा लाल चट्टे येणे इत्यादी लक्षणे दिसतात. ४-५ दिवसांनंतर ताप कमी होतो, तसेच ८–१० दिवसांत रुग्ण बरा होतो; परंतु रोग गंभीर स्वरूप धारण करतो किंवा नाही, हे पाहण्यासाठी प्रत्येक रुग्णाकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते.

(२) डेंगी रक्तस्रावात्मक ताप : (डेंगी हेमरॅजिक फिव्हर). हा डेंगीचा गंभीर प्रकार असून या रोगात इतर लक्षणांबरोबर अंगावर चट्टे उठणे, बाह्यरक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव, पोटदुखी, रक्तासह किंवा रक्ताविना उलट्या होणे इत्यादी लक्षणे दिसतात. तसेच छातीच्या, पोटाच्या भागात पाणी होऊ शकते.

(३) डेंगी अतिगंभीर आजार : (डेंगी शॉक सिंड्रोम). ही डेंगी रक्तस्रावाच्या तापाची पुढची अवस्था असून काही मोजक्या लोकांमध्येच दिसून येते. यात अस्वस्थपणा, अंग थंड पडणे, नाडी कमकुवतपणे व जलद चालणे, रक्तदाब कमी होणे, श्वास घेताना त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात. या प्रकारामुळे मृत्यू ओढवू शकतो.

रोगनिदान : डेंगी रोगाची प्रारंभिक लक्षणे सामान्यपणे फ्ल्यूसारखी असल्याने फक्त लक्षणांवरून रोगनिदान करणे अवघड असते. रोगनिदानासाठी रक्तचाचणी केली जाते. या चाचणीत रक्तातील पांढऱ्या पेशी आणि मुख्यत: रक्तपट्टिका (प्लेटलेट्स) यांची संख्या कमी झालेली आढळून आल्यास डेंगी झाल्याचे निदान गृहीत धरून उपचार सुरू करतात. निदाननिश्चितीसाठी डेंगी विषाणू विरुद्ध रक्तातील प्रतिद्रव्याचे (प्रतिपिंड) प्रमाण पाहणे किंवा विषाणूंतील आरएनए तपासणे, यांसाठी विशेष चाचण्या केल्या जातात. डेंगी रोगाची वाढ पाहण्यासाठी, तसेच पुढील उपचार करण्यासाठी रक्तातील रक्तपट्टिकांसाठी चाचणी पुन्हा:पुन्हा केली जाते. रक्तपट्टिका वाढायला लागून एका मर्यादेपुढे वाढल्या की डेंगी रोगाचा धोका कमी होतो.

उपचार : या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. कोणताही ताप आल्यानंतर जास्त वाट न पाहता डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने रक्तचाचणी करणे, त्यांच्या देखरेखीखाली उपचार घेणे, आवश्यक असते. सौम्य किंवा मध्यम स्वरूपाच्या आजारात लक्षणांनुसार आणि आधार देणारे उपचार केले जातात. रक्तस्रावाचा धोका विचारात घेऊन ताप आणि अंगदुखी यांवर ‘पॅरॅसिटेमॉल’ हे औषध जास्त योग्य समजले जाते. विश्रांती घेणे, हलका पण पौष्टिक आहार घेणे, पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे, क्षारयुक्त द्रव (सलाइन) घेणे, फळांचे रस पिणे इत्यादी आवश्यक असते. काही वेळा (लघवीचे प्रमाण बघून) शिरेतून क्षारयुक्त द्रव द्यावे लागते. या रोगामुळे रक्तपट्टिकांची संख्या प्रमाणाबाहेर कमी झाल्यास, रक्तस्राव किंवा आघात यासंबंधीची लक्षणे दिसल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे, गरजेचे असते. काही वेळा रुग्णाला रक्तपट्टिका, रक्तघटक किंवा रक्त यांचे अंत:क्षेपण करावे लागते. वेळीच रुग्णालयात नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

हाडमोड्या तापाचा प्रसार

प्रसार : डेंगी रोग थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. ई. ईजिप्ताय  जातीच्या डासाची मादी डेंगीग्रस्त माणसाला चावल्यास रुग्णाच्या रक्तातील डेंगीचे विषाणू डासाच्या मादीच्या शरीरात शिरतात आणि वाढतात. साधारणपणे ७-८ दिवसांनंतर ही मादी दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास हे विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. ई. ईजिप्ताय  हा एक लहान, ५ मिमी. लांब, काळ्या रंगाचा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. तो दिवसा, सकाळी अथवा संध्याकाळी चावतो. डेंगीचा प्रसार अशा प्रकारे होतो. रक्ताधान किंवा अवयवरोपण यांमुळेही डेंगीचे विषाणू संक्रमित होऊ शकतात.

प्रतिबंध : डेंग्यूच्या विषाणूंविरुद्ध लस काही देशांत उपलब्ध आहे. मात्र जेथे लस उपलब्ध नाही तेथे अंगभर कपडे घालून किंवा अन्य उपायांनी डासांच्या चावण्यापासून बचाव करणे आणि प्रामुख्याने ई. ईजिप्ताय  डासांची उत्पत्ती थांबवणे, हे प्रतिबंधक उपाय आहेत. या डासांच्या अळ्या स्वच्छ पाण्यात वाढतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे, साठविलेले पाणी झाकून ठेवणे किंवा वेळच्या वेळी रिकामे करणे आणि डासनाशक औषधांची फवारणी करणे अशा उपायांद्वारे या डासांची उत्पत्ती रोखता येते.

This Post Has One Comment

  1. चंद्रकांत पवार

    फारच सुंदर आणि उपयोगी माहिती दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा