(सोशल एन्‌व्हायरन्मेंट). मानवी पर्यावरणाचा एक प्रमुख प्रकार. आपल्या परिसरातील प्राकृतिक आणि सामाजिक घटकांशी मानवाच्या सतत आंतरक्रिया घडत असतात. हे सर्व घटक मिळून ‘सामाजिक पर्यावरण’ तयार होते. सामाजिक पर्यावरणात मानव ज्या संस्कृतीमध्ये राहतो व वाढतो ती संस्कृती, ते लोक अथवा संस्था यांच्याशी होणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. अशा आंतरक्रिया प्रत्यक्ष व्यक्तीबरोबर अथवा संदेशवहनाच्या माध्यमातून होत असतात आणि एकतर्फी अथवा ओळखीशिवाय होत असतात. अशा आंतरक्रिया ज्यांच्यामध्ये घडतात त्या घटकांचे सामाजिक स्तर विभिन्न असू शकतात. सामाजिक पर्यावरण ही संकल्पना समाजगट, समाजवर्ग यांपेक्षा भिन्न आहे.

नैसर्गिक पर्यावरण हा पर्यावरणाचा प्रमुख प्रकार आहे. या नैसर्गिक पर्यावरणावर सामाजिक पर्यावरण आधारित असते. स्थल-कालानुसार सामाजिक पर्यावरण बदलत असते. नैसर्गिक पर्यावरण गतिमान असल्याने सामाजिक पर्यावरणही गतिमान असते. मानव ज्या पर्यावरणात राहतो, तेथील जैव-अजैव घटकांचा त्याच्यावर परिणाम होतो. त्याच्या जीवनावर नैसर्गिक पर्यावरणाबरोबर मानवकृत पर्यावरणाचाही प्रभाव होत असतो. हे मानवकृत पर्यावरण म्हणजेच सामाजिक पर्यावरण होय.

सामाजिक पर्यावरणाचे प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय असे चार मुख्य घटक आहेत. सामाजिक पर्यावरणात अध:संरचना, औद्योगिक संरचना, व्यावसायिक संरचना, मजूर, बाजारपेठ, सामाजिक व आर्थिक प्रक्रिया, संपत्ती, संसाधने, मानवी सेवा, आरोग्य, सत्तासंबंध, शासन, वांशिक संबंध, सामाजिक विषमता, सांस्कृतिक रूढी, परंपरा, कला, धार्मिक संस्था, प्रचलित पद्धती, स्थळ-समूहाबाबतची श्रद्धा इ. बाबींचा समावेश होतो. अनेकदा राजकीय, आर्थिक आणि धार्मिक संस्था या सामाजिक पर्यावरणाची महत्त्वाची अंगे मानली जातात. यावरून सामाजिक पर्यावरण ही अत्यंत जटिल संकल्पना आहे, हे दिसून येते.

सामाजिक पर्यावरण समाजाच्या संरचनात्मक मांडणीनुसार लक्षात घेणे आवश्यक असते. समाज संरचना ही सामाजिक संस्थांच्या जालकातून तयार झालेली असते. मानवी समाज हा लोकसमूह आदी संस्था यांच्या जटिल जालकांचा असतो. समाजाच्या अस्तित्वासाठी विशिष्ट समाजरचना, समाज मांडणी असावी लागते; ज्यामुळे विविध लोकसमूह, गट, संस्था यांच्या संबंधाचे प्रारूप ठरते. सामाजिक संरचनेसाठी पुढील बाबी आवश्यक असतात : (१) आर्थिक प्रणाली – वस्तू उत्पादन आणि वितरण. (२) संदेशवहन प्रणाली – माहितीचा प्रवाह समाजातील एका भागातून दुसऱ्या भागात व्हावा लागतो. यासाठी भाषा आणि तंत्रज्ञान यांचा विकास व्हावा लागतो. (३) कुटुंब प्रणाली – कुटुंबातील प्रत्येकाची शारीरिक व बौद्धिक वाढ करून संपूर्ण कुटुंबाचा समतोल विकास साधणे आवश्यक असते. (४) सत्ता व अधिकार प्रणाली – राजकीय तसेच शासकीय संस्थाकडून सार्वजनिक हितांची ध्येये साध्य करण्यासाठी ही प्रणाली आवश्यकता असते. (५) कर्मकांड प्रणाली – सामाजिक संलग्नता वाढवणे आणि टिकवणे यासाठी कर्मकांडांचा उपयोग केला जातो. जन्म, साहचर्य, लग्न, मृत्यू अशा विविध वैयक्तिक घटनांना महत्त्व असल्याने त्याला सामाजिक मान्यता दिली जाते.

प्रमुख संस्था आणि लोकसमूह हे सामाजिक संस्थासाठी मूलभूत घटक असतात. हे सर्व मिळून सामाजिक पर्यावरण बनते. सामाजिक पर्यावरणावर काही घटकांचा परिणाम होत असतो. त्यात प्रामुख्याने कुटुंब संस्कृती, अर्थव्यवस्था आणि न्यायसंस्था इत्यादींचा समावेश होतो.

कुटुंब : ही सामाजिक संघटनाची मूलभूत संस्था आहे. सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाच्या व्यापक संदर्भात कुटुंब संस्था महत्त्वाची असते. प्रजनन, बालसंगोपन, सांस्कृतिक मूल्यांचे पुढील पिढ्यात अंतरण इत्यादींसाठी कुटुंबाला महत्त्व असते. अनेक कुटुंबांचा गट एकत्रित राहतो, त्यातून समाज निर्माण होतो. ठराविक भौगोलिक एककातील लोकांचे व्यवसाय, धार्मिक श्रद्धा इ. एकत्रित येऊन समाजसंस्था तयार होतात. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील समाजसंस्थेमधील लोकांचा गट, त्यांतील व्यक्ती यांच्यात परस्पर आंतरक्रिया होतात, हे संघटितपणे व सहकार्यातून होते आणि यातून समान संस्कृती वाढीला लागते.

संस्कृती : हा पर्यावरणाचा मानवकृत महत्त्वाचा घटक आहे. संस्कृतीमुळे सामाजिक कृती आणि सामाजिक पर्यावरण ठरते. तसेच व्यक्तिवर्तनाचे स्वरूप ठरते. संस्कृती ही अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना आहे. यात एखाद्या समाजगटातील त्या गटाचे विशिष्ट असे ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी, व्यक्तींच्या सवयी, क्षमता इत्यादींचा समावेश होतो.

अर्थव्यवस्था : सामाजिक स्थितीचा परिणाम पर्यावरणीय संसाधनाच्या वापरावर होत असतो. संसाधने किती प्रमाणात आणि कशा प्रकारे वापरायची, हे सामाजिक स्थितीवर अवलंबून असते.

न्यायसंस्था : सामाजिक नैतिकता नियमित करण्यासाठी, नागरिकांचे हक्क आणि अधिकार देण्यासाठी न्यायसंस्था मार्गदर्शन करते. नैसर्गिक अधिवासाचे संधारण करण्यास न्यायसंस्था उपयुक्त ठरते.

समान सामाजिक पर्यावरणीय जनतेमध्ये सामाजिक दृढतेचा व ऐक्याचा दृष्टिकोण विकसित होतो. समाजगटातील लोक परस्परांवर विश्वास ठेवतात. समाजात एकरूपता व एकसंघता वाढते. एखाद्या निर्णयात विसंगती आली, तरी त्यांचा विचार समान पद्धतीचा व प्रारूपाचा असतो.

मानव आपल्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत राहत असतो. त्याच्या समाजाच्या आर्थिक क्रियांचे ठरावीक प्रारूप असते. प्राकृतिक घटक आणि आर्थिक कार्ये यांमुळे त्याचे जीवन विकसित होत असते. त्यावर सामाजिक पर्यावरणाचाही प्रभाव असतो. त्याचे सामाजिक पर्यावरण त्याच्या संस्कृतीशी जोडले जाते. त्याची एक समाज परंपरा असते, एक सामाजिक वारसा असतो. मैदानी किंवा डोंगरी प्रदेशात राहणारा समाज असो अथवा शेती किंवा औद्योगिक क्षेत्रांत कार्यरत असलेला समाज असो, त्यांचे जीवन त्यांच्या सामाजिक परंपरेने प्रभावित झालेले असते. मानव वास्तवत: ‘संपूर्ण पर्यावरणात’ राहत असतो. हे संपूर्ण पर्यावरण त्याच्या पारिस्थितिकीचा भाग असतो.

मानव वैयक्तिक, एकटा, एकाकी कधीच राहत नाही. तो एखाद्या समाजाचा घटक असतो. त्याचे त्यातून सामाजिकीकरण होत असते. त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीवर त्याचे सामाजिकीकरण आधारित असते. सामाजिक पर्यावरणात प्रत्येक व्यक्तीला सामाजिक घटकांशी तडजोड करावी लागते. अप्रगत समाजातील मानवाला अशी तडजोड करणे शक्य होते; परंतु आधुनिक, प्रगत, प्रगतशील राष्ट्रांतील सामाजिक पर्यावरणात तडजोड करून राहणे कठीण होत आहे. प्रगत व प्रगतशील राष्ट्रांतील सामाजिक पर्यावरणाच्या असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. सामाजिक पर्यावरण प्रदूषणमुक्त होण्यासाठी समाजाचा सर्वांगीण, समन्यायी, समान विकास होणे गरजेचे आहे. नैसर्गिक पर्यावरणातील घटकांच्या प्रदूषणाच्या घातक परिणामांइतकेच घातक परिणाम सामाजिक पर्यावरणातील घटकांच्या प्रदूषणाचे होतात. समाजस्वास्थ्य, सामाजिक स्थैर्य, सामाजिक विकास यांसाठी न्यायसंस्था, शासन, प्रशासन आणि इतर मानवकृत संस्थांचे योगदान मोलाचे व महत्त्वाचे ठरते.