अहाळीवाचे निकट छायाचित्र

अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत वर्षायू औषधी असून मूळची ईथिओपिया देशातील आहे. भारतामध्ये तिची विविध उपयोगांसाठी सर्वत्र लागवड केली जाते.

अहाळीवची पाने साधी, विविध, पूर्णत: किंवा अंशत: अखंड किंवा पुर्णपणे विभागलेली असतात. मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी पाने लांब देठाची, तर खोडापासून निघालेली पाने बिनदेठाची रेषाकृती असतात. फुले लहान व पांढरी असून लांबट मंजरीवर येतात. फळे गोलाकार, अंडाकृती व टोकास खाचदार असतात. फळात लहान कप्पे असून प्रत्येक कप्प्यात दोन बिया असतात. बिया लांबट, टोकाला निमुळत्या व रंगाने लाल असतात.

ही वनस्पती सर्वकाळी व सर्वत्र पिकविली जाते. सखल भागात सप्टेंबर ते फेब्रुवारीत व उंच प्रदेशात मार्च ते सप्टेंबरमध्ये बी पेरतात. त्यानंतर थोड्याच दिवसांत पाने कोशिंबिरीत किंवा कढीत घालण्यास खुडून घेतात. बियांच्या वाढीसाठी ४-६ आठवडे लागतात. पाला घोडयांना व उंटांना चारा म्हणून घालतात. दिवाळीत लहान मुले किल्ल्यावर हिरवळ करण्यासाठी अहाळीवाचा वापर करतात.  दमा, कफ व रक्ती मूळव्याध इ. व्याधींवर ही वनस्पती गुणकारी आहे. पाने उत्तेजक, मूत्रल व यकृताच्या विकारावर चांगली आहेत. बिया दुग्धवर्धक, रेचक, शक्तिवर्धक व मूत्रल आहेत. मुडपणे, दुखापत इत्यादींवर त्यांचे पोटीस बांधतात.