‘अशोक’ या नावाने भारतात दोन वेगवेगळ्या वनस्पती ओळखल्या जातात. त्यांना ‘लाल अशोक’ आणि ‘हिरवा अशोक’ असे म्हणतात.
लाल अशोक
फॅबॅसी कुलातील हा सदापर्णी आकर्षक असा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव सराका इंडिका आहे. हा वृक्ष श्रीलंका, म्यानमार, मलेशिया, बांगलादेश आणि भारतात आढळतो. भारतात तो सर्वत्र, सस.पासून ७५० मी. उंचीपर्यंत सदाहरित वनात आणि लागवडीखाली आढळतो. याला ‘सीतेचा अशोक’ असेही म्हणतात.
मध्यम आकाराचा हा वृक्ष सु. ९ मी. पर्यंत उंच वाढत असून त्याचा विस्तार अनेक रोमहीन शाखांत झालेला असतो. पाने कोवळेपणी लोंबती, पिसाच्या आकाराची ३०-६० सेंमी. लांब असून यात २-३ भालाकृती पर्णिकांच्या जोड्या असतात. पानांच्या बगलेत डिसेंबर ते मे महिन्यात नारिंगी रंगांचे फुलोरे येतात. फुलोरे समशिख प्रकाराचे (फुले वर छताला सपाट असलेली) व सुवासिक असतात. फळे गडद तपकिरी शेंगा असून वरून त्या चामड्याप्रमाणे भासतात. प्रत्येक शेंगेत लंबवर्तुळाकार ४-८ बिया असतात. या वृक्षाची लागवड बियांपासून करतात. लाल अशोकाच्या फांद्या करड्या ते राखाडी किंवा काळसर असून किणमय (चामखिळाप्रमाणे पुरळ उटल्यासारख्या) असतात. फांद्यांची जाडी ५ मिमी. ते १ सेंमी. असते. फांदीचा कापलेला पृष्ठभाग हवेशी संपर्कात येताच लालसर होतो.
पुराणकाळापासून या वृक्षाला महत्त्व दिले गेले आहे. ताप, त्वचेचा दाह, पुटकुळ्या इत्यादींवर या वृक्षाची साल उगाळून लावतात. गर्भाशयाच्या तक्रारींवर या वृक्षाची साल दुधात उकळून घेतात. फुले मुळव्याध, आमांश, लहान मुलांना होणारी खरूज इत्यादींवर गुणकारी असतात. मधुमेहावर सुकलेली पाने तर मूत्रविकारांवर बिया उपयुक्त ठरतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो.
हिरवा अशोक
अॅनोनेसी कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव पॉलिअॅल्थिया लाँगिफोलिया आहे. हा मोठा सदापर्णी वृक्ष मूळचा भारताच्या दक्षिण भागातील व श्रीलंकेतील आहे. भारतात सर्वत्र हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा व बागेत शोभेकरिता मुद्दाम लावलेला आढळतो. ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी या वृक्षाची मदत होते.
हिरवा अशोक सु. ९ मी. उंचीपर्यंत वाढतो. फांद्या मऊ, करड्या रंगाच्या व जाड असतात. पाने साधी, चिवट, अरुंद, भाल्यासारखी, गुळगुळीत, चकचकीत, तरंगाप्रमाणे कडा असणारी व टोकाला लांबट असतात. फेब्रुवारी ते मे या महिन्यांत तार्यांसारखी हिरवट-पिवळी फुले गुच्छाने येतात. मृदुफळे लहान व अंड्याच्या आकाराची असतात. फळात एकच बी असते. या वृक्षाची लागवड ताज्या बियांपासून होते.
हिरव्या अशोकाची साल कठिण, शीतल व कडू असून ताप, त्वचेचे रोग, मधुमेह इत्यादींवर गुणकारी ठरते, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. या वृक्षाची साल पेन्सिली, पिपे व ढोलकी तयार करण्यासाठी वापरतात. आगकाड्या तयार करण्यासाठी याचे लाकूड वापरतात.