अनेक सजीवांत नैसर्गिक रीत्या तयार होणारी नायट्रोजनयुक्त व रासायनिक दृष्ट्या आम्लारीधर्मी संयुगे. निसर्गत: अल्कलॉइडे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात. तसेच कवके, प्राणी, जीवाणू इत्यादींसारख्या सजीवांतही काही अल्कलॉइडे तयार होतात.
अल्कलॉइडे ही अ‍ॅमिनो आम्ले किंवा पॉलिअमाइनासारख्या नायट्रोजनयुक्त संयुगांपासून तयार होतात. त्यांचा रेणुभार १०० ते ९०० या दरम्यान असतो. अल्कलॉइडे ही रंगहीन, स्थायू, स्फटिकी व आम्लारी असतात. परंतु, काही अल्कलॉइडे यास अपवाद आहेत. कारण ती आम्लारी नाहीत. त्यांना रंग असून ती द्रवरूपात आढळतात. ज्या अल्कलॉइडांच्या संरचनेत ऑक्सिजन नसतो अशी अल्कलॉइडे सामान्य तापमानाला द्रवरूपात आढळतात. उदा., निकोटीन, कोनीन, स्पाटीन. ज्यांच्या संरचनेत ऑक्सिजन असतो, अशी अल्कलॉइडे स्फटिकी असतात. काही अल्कलॉइडांना आंबट चव असते.

वनस्पती अल्कलॉइडे का तयार करीत असाव्यात, याबाबत वेगवेगळी मते आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, अल्कलॉइडे वनस्पतींच्या चयापचय क्रियेत तयार होणारी सह-उत्पादिते आहेत. काहींच्या मते प्राणी व कीटकांपासून वनस्पतीचे संरक्षण व्हावे यासाठी अल्कलॉइडे निर्माण होतात, तर काहींच्या मते अल्कलॉइडे ही प्रथिनांच्या निर्मितीसाठी वनस्पतींना लागणारे घटक साठविण्याचे ठिकाण आहे.

हजारो वर्षांपूर्वीपासून मानव अल्कलॉइडांचा वापर विविध रोगांवर औषध म्हणून करीत आहे. अतिप्राचीन सुमेरियन आणि ईजिप्शियन लोकांनी यांचा वापर सर्वप्रथम केला. वर्णलेखन (क्रोमॅटोग्राफी) आणि वर्णपटविज्ञान (स्पेक्ट्रोस्कोपी) अशा प्रगत तंत्राच्या साहाय्याने अल्कलॉइडांबाबत अधिक माहिती मिळविता आली. रासायनिक संरचनेनुसार अल्कलॉइडांचे पिरिडीन, पायरोलिडीन, ट्रोपेन, क्किनोलीन, आयसोक्किनोलीन, इंडोल, फिनिल एथिल अमाइन, प्यूरीन, टर्पिनॉइड, विंका अल्कलॉइड अशा अनेक गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे.

बहुतेक अल्कलॉइडांमध्ये औषधी गुण असल्याने त्यांचा निरनिराळ्या औषधांकरिता उपयोग केला जातो. काळी मिरी, एरंड, डाळींब, कोको, तंबाखू, धोतरा, सिंकोना, अफू, चहा यांच्या पाने व फळे यांतील अल्कलॉइडांचा प्राण्यांच्या शरीरावर विशिष्ट परिणाम होतो. तंबाखूत सापडणारे उत्साहवर्धक निकोटीन हे आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करते. अफूत सापडणारे मॉर्फीन हे ठराविक मात्रेत उत्तम वेदनाशामक म्हणून काम करते; परंतु अतिसेवनाने शरीरावर दुष्परिणाम घडविते. अफूत सापडणारे कोडिन हेसुद्धा वेदनाशामक तसेच अतिसारावर उत्तम उपाय आहे. धोतर्‍याच्या फळात सापडणारे अ‍ॅट्रोपीन हे काही विषांवर उपाय म्हणून वापरले जाते. कोकोत सापडणार्‍या कोकेनमध्ये बेशुद्धी करणारे गुण आढळतात. कॉफीमधील आंबट चवीचे कॅफीन हे मानसिकता उद्दिपित करणारे अल्कलॉइड आहे. एफेड्रिनसुद्धा असेच बहुगुणी औषध म्हणून वापरले जाते. रक्तदाबासंबंधी व्याधींवर डोपामाइनसारखे अल्कलॉइड उपयुक्त ठऱते. क्किनिन हे सिंकोना वनस्पतीपासून मिळविलेले अल्कलॉइड मलेरियासारख्या घातक आजारात उपयुक्त ठरते. सदाफुलीच्या पानांपासून मिळणार्‍या व्हिनब्लास्टिन आणि व्हिनक्रिस्टिन अल्कलॉइडांचा वापर ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगावर करतात. सॉक्रेटीस या तत्त्ववेत्त्याला कोनीन हे अल्कलॉइड देऊन मारण्यात आल्याचा उल्लेख आहे. अशा गुणांमुळे अल्कलॉइडांना वैद्यकक्षेत्रात विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही अल्कलॉइडे प्रयोगशाळेत कृत्रिम रीत्या तयार करता येतात.