आ. १. यूपीएस

विविध ठिकाणी (उदा., दवाखान्यात वेगवेगळ्या उपचारासाठी, रासायनिक उद्योगधंदे)  अशा ठिकाणी आपल्याला सतत ऊर्जेची गरज भासत असते. अशा ठिकाणी ऊर्जा स्रोताचा अभाव जाणवला तर खूप नुकसान होऊ शकते. अखंडित (निर्बाध) वीज पुरवठा हे साधन प्राथमिक ऊर्जा स्रोत संपुष्टात आल्यावर विजेच्या उपकरणांना चालू ठेवण्यास मदत करते.

जेव्हा आपल्याला प्राथमिक स्रोतापासून वीज मिळू शकत नाही, तेव्हा यूपीएसमध्ये साठवलेली ऊर्जा वापरात आणली जाते. आपण संगणकावर (Computer) एखादे काम करत असताना अचानक जर  वीज गेली, तर आपली माहिती नष्ट होऊ शकते. जर ती माहिती व्यवस्थित जपून ठेवायची असेल तर आपल्याला दुय्यम ऊर्जा स्रोताची गरज आहे. असा दुय्यम ऊर्जा स्रोत यूपीएसद्वारे पुरविला जातो.. यूपीएसच्या वापरामुळे आपली माहिती सुरक्षित राहते. संगणक, माहिती केंद्र (Data Centre), दूरसंचार उपकरणे किंवा इतर विद्युत उपकरणांसाठी दुय्यम ऊर्जा स्रोत म्हणून यूपीएसचा वापर केला जातो. जेव्हा प्रमुख वीज पुरवठा (Main Power Supply)  बंद पडतो तेव्हा यूपीएस ऊर्जा पुरवण्याचे काम करते.

 

आ. २. यूपीएसची ठोकळाकृती

कार्य : यूपीएसमध्ये विद्युत भारक (charger) , बॅटरी व प्रतिपरिवर्तक (inverter) हे मुख्य घटक असतात (आ. २). जेव्हा प्रमुख वीज पुरवठा चालू असतो, तेव्हा विद्युत भारकद्वारे बॅटरी विद्युत भारित होते. बॅटरी एकदिशदर्शक शक्ती (DC energy) निर्माण करते, प्रतिपरिवर्तक हे एकदिशदर्शक शक्तीचे  प्रत्यावर्ती शक्तीमध्ये (AC energy) रूपांतर करतो.  जेव्हा प्रमुख वीज पुरवठा बंद पडतो तेव्हा  ही प्रत्यावर्ती शक्ती विद्युत उपकरणांना पुरवली जाते.  यूपीएस हे असे साधन आहे, जे अतिशय स्थिर ऊर्जा (Stable Power Supply) पुरवते.

उपयोग : विविध उद्योगधंदे, दवाखाने, दूरसंचार, बँक आणि विमा, विविध प्रकल्प येथे यूपीएसचा वापर केला जातो.

संदर्भ :

 समीक्षक – अमृता मुजुमदार