जैवविघटन : सेंद्रिय पदार्थांचे जीवाणूंद्वारे विघटनाचे दोन प्रकार आहेत : ऑक्सिजनच्या सान्निध्यात म्हणजेच वातजीवी (aerobic) आणि ऑक्सिजनच्या गैरहजेरीत म्हणजेच अवातजीवी (anaerobic).  हे जीवाणू वितंचक प्रक्रियेद्वारे पदार्थातील क्लिष्ट घटकांचे लहान रेणूंमध्ये रूपांतर करतात. हे वायुरूप घटक हवेत मिसळतात व पर्यावरणाचे संतुलन राखतात. निसर्गात पडून राहिलेले नकोसे घटक सूक्ष्म जीवाणू अन्न म्हणून वापरतात. या प्रक्रियेत विविध प्रकारचे जीवाणू, बुरशी व यीस्टसारखे जीव सहभाग घेतात. जैवविघटनातून मुक्त होणारा कार्बन डायऑक्साइड वायू हा अंतिम घटक असतो.

वस्तू वापरून झाली की तिचे कचऱ्यात रूपांतर होते. हा कचरा वातावरणात पडून राहिला की, त्याचे जैविक विघटन होते. हा कचरा कुजताना त्याच्या रासायनिक घटकांचे विघटन होऊन त्यांचे वायूमध्ये रूपांतर होते आणि ते हवेत मिसळून जातात, तर त्यांचा अवक्षेप मातीत मिसळतो. स्युडोनॉमस एस.पी. आणि ब्रेवीबेसिलियस एस.पी. यासारखे जीवाणू यासाठी प्रामुख्याने जैविक विघटनात सहभाग घेतात. त्यातून मिथेन व कार्बन डायऑक्साइड यांसारखे वायू हवेत मुक्त होतात.  या विघटन प्रक्रियांतून ते आपली अन्नाची गरज भागवितात.

पदार्थांच्या जैवविघटनाचा काळ माहित होण्यासाठी त्यांच्या रासायनिक गटानुसार विशिष्ट चाचण्या कराव्या लागतात आणि त्यासाठी भिन्नभिन्न सूत्रे वापरली जातात. पदार्थांचे जैविक ऑक्सिडीकरण (biological oxygen demand) आणि रासायनिक ऑक्सिडीकरण (chemical oxygen demand) मोजावे लागते. सेंद्रिय पदार्थ ऑक्सिजनच्या सान्निध्यात किंवा ऑक्सिजनरहित वातावरणातदेखील विघटन पावतात. पदार्थाची रासायनिक रचना जेवढी क्लिष्ट असेल, तेवढा त्याच्या रासायनिक विघटनाला लागणारा कालावधी जास्त असतो.

नैसर्गिक पदार्थ त्यांच्या जडणघडणीनुसार कमी-जास्त कालावधीमध्ये विघटित होत असतात. परंतु प्लॅस्टिक, थर्माकॉलसारखे काही पदार्थ मानवनिर्मित असतात. हे विश्लेषित पदार्थ सहसा विघटन पावत नाहीत. खालील तक्त्यावरून विविध पदार्थांच्या साधारण विघटन काळाची कल्पना येऊ शकते :

मानवनिर्मित पदार्थ

जैवविघटनाचा कालावधी

पेपर-टॉवेल २ ते ४  आठवडे
कागदी पिशवी १ महिना
वर्तमानपत्र दीड महिना
पुठ्ठा २ महिने
कापसाचे मोजे ३ महिने
लाकूड १५ महिने
प्लायवूड १ ते ३ वर्षे
लोकरी मोजा १ ते ५ वर्षे
दुधाचा डबा ५ वर्षे
रंगविलेल्या लाकडी काठ्या  १३ वर्षे
चामड्याचे बूट २५ ते ४० वर्षे
पातळ धातूचा डबा ५० वर्षे
फोम/प्लास्टिकचे कप ५० वर्षे
रबरी बुटाचे तळवे ५० ते ८० वर्षे
प्लॅस्टिक भांडी ५० वर्षे
ॲल्युमिनियम डबा २०० ते ५०० वर्षे
प्लॅस्टिक बाटल्या ४५० वर्षे
डायपर्स ५५० वर्षे
एकधागी फिशिंग लाइन ६०० वर्षे
प्लॅस्टिक पिशव्या २०० ते १००० वर्षे
थर्माकॉल १ दशलक्ष वर्षे

संदर्भ :

 

समीक्षक – राजीव चिटणीस