कुँवर नारायण : (१९ सप्टेंबर १९२७ -१५ नोव्हेंबर २०१७). भारतीय साहित्यातील हिंदीतील एक अग्रणी कवी. २००५च्या साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे. फैजाबाद आणि अयोध्या याठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले. याकाळातच त्यांच्या आईचे अकाली निधन झाल्याने, मोठ्या भावासह लखनौला त्यांच्या काकांकडे ते आले आणि चुलत भावंडासह एकत्र कुटुंबात राहू लागले. म. गांधींच्या विचारांनी प्रेरित अनेक राजकीय नेते त्यांच्या काकांच्या घरी येत असत. बौद्ध समाजवादी नेता, विद्वान आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य कृपलानी यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. आचार्य नरेन्द्र देवांबरोबर ते मुंबईमध्ये वर्षभर राहिले.

नंतर आचार्य कृपलानींबरोबर दिल्लीला त्यांच्या विजिल या पत्रिकेच्या कामासाठी मदत करू लागले. याच सुमारास  लखनौ विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली (१९५१). इंटरपर्यंत विज्ञान विषयात त्यांनी शिक्षण घेतले होते.पण साहित्यिक प्रभावामुळे ते इंग्रजी विषयाकडे वळले.सखोल जीवनानुभव, विपुल अध्ययन, गंभीर चिंतन यामुळे त्यांचे साहित्य लक्षणीय झाले आहे.

१९५६ मध्ये त्यांचा चक्रव्यूह हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.हिंदी साहित्यातील ही एक प्रमुख साहित्यकृती मानली जाते. त्यानंतर तीसरा सप्तक (१९५९),परिवेश-हम तुम (१९६१),अपने सामने (१९७९), कोई दूसरा नही (१९९३), कविता के बहाने (१९९३), इन दिनो (२००२), हाशिये का गवाहं  इ. काव्यसंग्रह प्रकाशित झाले. आत्मजयी (१९६५) आणि वाजश्रवा के बहाने (२००८) या त्यांच्या विशेष उल्लेखनीय दीर्घकाव्य रचना आहेत.आकारों के आसपास (१९७१) हा कथासंग्रह आणि आज और आजसे पहिले (१९९८), मेरे साक्षात्कार (१९९९), साहित्यके कुछ अन्तविषयक संदर्भ (२०१३) हे समीक्षाग्रंथही प्रसिद्ध झाले आहेत. युगचेतना, नया प्रतीक,छायानट या पत्रिकांचे ते सहसंपादक म्हणून कार्यरत होते.याव्यतिरिक्त त्यांनी अनुवादही केले आहेत. चित्रपट, संगीत, कला व इतिहास या विषयांवरही लेखन केले आहे.

अज्ञेयजींनी १९५९ मधील तिसरा सप्तक या नियतकालिकामध्ये कुँवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने, त्यांना  प्रसिद्धी मिळाली.अपने सामने या संग्रहातील अधिकतर कविता सामाजिक, राजकीय विडंबनात्मक आहेत. १९६५ मध्ये आत्मजयी हे दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली. कठोपनिषद आत्मजयी या कवितासंग्रहाचा आधारग्रंथ आहे. मृत्यूसंबंधी शाश्वत प्रश्न कठोपनिषदच्या माध्यमातून आत्मजयी या दीर्घकाव्यातून त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत.नचिकेता याच्या कथेची त्यांनी पुनर्रचना केली आहे.कवीने येथे नचिकेता आणि यम यांच्यामधील संघर्षाला जीवन आणि मृत्यूमधील संघर्षात परिवर्तित केले आहे. मृत्यूसारख्या विषयावर भाष्य करीत, आजच्या सैरभैर मानसिकतेला दिलासा देत, त्यांनी दोन पिढ्यातील समन्वय समजूतदारपणे कसा होऊ शकतो, हे सूचित केले आहे. एका अमूर्त विषयाला सूक्ष्म संवेदनशील शब्दात, नव्या उत्साहात त्यांनी काव्यबद्ध केले आहे. पौराणिक कथा आणि समकालीनता नाण्याच्या दोन बाजू मानून कुँवर नारायण यांनी त्यांच्या कवितांमध्ये वेद, पुराण आणि इतर शास्त्रांची  मांडणी केली आहे.

कुँवर नारायण यांच्या एकूण कवितेत निराशा, विसंगती आणि कठीण परिस्थितींविरूद्धच्या मानवी जाणिवेच्या संघर्ष- चेतनांची  अभिव्यक्ती आढळते. भौतिकवादी व्यवस्थेने प्रभावित झालेल्या माणसाची उदात्त मूल्ये आणि मानवी मूल्ये अदृश्य होत आहेत. कुँवर नारायण यांनी पौराणिक कथांचे आश्रय घेऊन त्यांच्या कवितेला आधुनिक संदर्भात अभिव्यक्त केले आहे. त्यांची ही पौराणिक दृष्टी एक नवीन वैचारिक प्रकाश देऊन पौराणिकतेचे महत्त्व अधोरेखित करते. कुँवर नारायण यांची काव्यशैली अतिशय मनोवेधक,सहज आणि ओघवती आहे. संदिग्ध शब्दांचा वापर ते करीत नाही.त्यांच्या कवितेतील शब्द आणि पदे अर्थात्मकतेच्या दृष्टीने सघन आहेत.

यूरोप, रशिया,चीन आणि स्वीडन इ. अनेक देशातील साहित्यविषयक सेमिनारमध्ये ते सहभागी झाले आहेत.त्यांच्या कवितांचे अनेक भारतीय भाषांत, तसेच इंग्रजीमध्ये अनुवाद झाले आहेत. हिंदुस्तानी पुरस्कार (१९७१-आत्मजयीसाठी), प्रेमचंद पुरस्कार (१९७३-आकारोंके आसपास कथासंग्रहासाठी), कुमारन आसन पुरस्कार (१९८२- अपने सामने काव्यसंग्रहासाठी), तुलसी पुरस्कार (१९८२), व्यास सन्मान (१९९५-कोई दूसरा नही काव्यसंग्रहासाठी), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९५- कोई दूसरा नहीं काव्यसंग्रहासाठी), कबीर सन्मान (२००१), अलाहाबादच्या राजर्षी पुरुषोत्तम टंडन मुक्त विश्व विद्यालयातर्फे डी. लीट.(२००४), वार्सा (पोलंड) विद्यापीठाचे सन्मान पदक (२००५), इटलीचा प्रेमियो फेरोनिया आंरराष्ट्रीय पुरस्कार (२००६), पुणे पंडित पुरस्कार (२०११) आणि भारतातील पद्मभूषण इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :