हिमांशु जोशी  :  (४ मे १९३५ – २३ नोव्हेंबर २०१८). भारतीय साहित्यातील प्रख्यात हिंदी साहित्यिक. कवी, कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. उत्तराखंड राज्यातील चंपावत जिल्ह्यात जोस्यूडा या गावी त्यांचा जन्म झाला. बालपण खेतीखान या गावात गेले. त्यांचे माध्यमिक शिक्षण खेतीखान व्हर्नाकुलर हायस्कूलमध्ये झाले.

पुढील उच्च शिक्षण त्यांनी नैनीताल येथे घेतले. त्यांचे वडील पुर्णानंद जोशी हे स्वतंत्र सेनानी होते. त्यांनी केलेला संघर्ष हिमांशू जोशी यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला व त्याचा प्रभावही त्यांच्या लेखनावर पडलेला दिसतो. त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयातून एम. फिल. ही पदवी संपादन केली. हिमांशु जोशी हे साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार म्हणून जेवढे परिचित आहेत तेवढेच ते पत्रकार म्हणूनही सुपरिचित आहेत. वेगवेगळ्या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहेत. त्यांनी कादम्बिनी आणि साप्ताहिक हिंदुस्थान  या दोन हिंदी पत्रिकांचे संपादन दीर्घकाळपर्यंत केले. वागर्थ  या पत्रिकेच्या संपादनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. नार्वे वरुन प्रसिद्ध होणाऱ्या शांतिदूत या पत्रिकेचे सल्लागार संपादकही ते होते.

कादंबरी, कथा, कविता, नाटक, वैचारिक लेखन, प्रवासवर्णन, चरित्र अशी  विविध  वाङ्मय प्रकारातून जोशी यांनी लेखन केलेले आहे. कादंबरीअरण्य (१९६५), महासागर (१९७१), छाया मत छुना मन (१९७४), कगार की आग (१९७५), समय साक्षी है (१९७६), तुम्हारे लिए (१९७८), सुरज (१९८०); कथासंग्रहअंतत: तथा अन्य कहानियाँ (१९६५), रथचक्र (१९७५), मनुष्य चिन्ह तथा अन्य कहानिया (१९७६), जलते हूए डैन तथा अन्य कहानियाँ (१९८०), तपस्या तथा अन्य कहानियाँ (१९९२), आचलिक कहानियाँ  (२०००), गन्धर्व गाथा (१९९४), चर्चित कहानियाँ (२०००), दस कहानियाँ (२००१), नंगे पायो के निशान्त (२००२), प्रतिनिधीक लोकप्रिय कहानिया (२००४), इसबार फिर बर्फ गिरी तो (२००५), सागर तट के शहर (२००५), एक हजार कहानियाँ (२००९), पाषाणगाथा (२०१०), स्मृतिया, परिणति तथा अन्य कहानियाँ इ. हिमांशु जोशी यांनी काव्यलेखनही केलेले आहे. नील नदी का वृक्ष  (२००८), अग्नि संभव एक आँख की कविता आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. उत्तर पर्व (१९९५), आठवा स्वर्ग (१९९७) हे दोन वैचारिक लेखनपर ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी बालसाहित्यदेखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले आहे.

वैचारिकता हा हिमांशु जोशी यांच्या लेखनाचा प्रधान बिंदू असला तरी मानवीय जीवन हीच सामग्री त्यांच्या वैचारिकतेला बळ देताना आढळते. विचार हा नावेसारखा असतो. त्याने मानवीय जीवनाच्या सुख संपन्नतेचा किनारा गाठता आला की त्याचे कार्य संपले ही विवेकशीलता ते त्यांच्या लेखनातून पाळताना दिसतात. मानवी जीवनात दुःख आहे तर दुःखाचे निवारण करण्याचे मार्गही उपलब्ध आहेत यावर त्यांचा विश्वास आहे.जो विश्वास त्यांच्या साहित्यातून प्रतीत होतो.

त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी संस्थान लखनौचा प्रेमचंद पुरस्कार (१९६५), गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार (१९८३), बिहार सरकारचा तीन तारे पुरस्कार (१९८७), यशपाल पुरस्कार (१९९३), उत्तरप्रदेशाचा अवन्तीबाई पुरस्कार (१९९६), हिंदी साहित्य संमेलनाचा वाचस्पती पुरस्कार (२००६), उदयराज सिंह स्मृती साहित्य सन्मान (२००८) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/himanshu_joshi.pdf