तेराव्या शतकातील पंडित शारंगदेव यांनी लिहिलेला भरत परंपरेतील एक महत्त्वाचा संगीतविषयक ग्रंथ. हा ग्रंथ म्हणजे प्राचीन संगीतविषयक अनेक ग्रंथांचे सार आहे. या ग्रंथात काही ठिकाणी प्राकृत किवा अर्धमागधी भाषा वापरली आहे. शारंगदेव महाराष्ट्रातील यादव राजघराण्यातील सम्राट सिंघण याच्या दरबारात ‘श्रीकरणाधिप/श्रीकरणाग्रणी’ म्हणजे महालेखापरीक्षक होता. त्यांच्या वडिलांचे नाव शोढल. त्यांना राजा सिंघण यांचा आश्रय मिळाला होता. शारंगदेवांस संगीत, नाट्य व नृत्य तसेच काव्य, छंद, वेदान्त व वैद्यक इत्यादी अनेक विषयांत गती होती आणि विविध विषयांवर त्यांनी ग्रंथलेखनही केले होते. संगीतावरील पूर्वीच्या उपलब्ध ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. प्राचीन व मध्यकालीन संगीताचे विवेचन त्यांनी या ग्रंथात केले असून त्याच्या समकालीन आणि प्रचलित संगीताबद्दलही त्यांनी या ग्रंथात माहिती दिली आहे.
या ग्रंथाचे तीन भागात स्वरगताध्याय, रागविवेक, प्रकीर्णकाध्याय, प्रबंधाध्याय, तालाध्याय, वाद्याध्याय व नर्तनाध्याय असे एकूण सात अध्याय असून त्यातील विषय पुढीलप्रमाणे – स्वर, राग, प्रकीर्णक, प्रबंध, ताल, वाद्य व नृत्य तसेच रस या विषयांचे विवेचन या अध्यायात आहे.
पहिल्या भागातील पहिल्या स्वरगताध्यायामध्ये शरीरोत्पत्ती हा विषय आला असून शारंगदेवाला वैद्यकशास्त्राची उत्तम माहिती असल्याचे यावरून सिद्ध होते. त्यानंतर श्रुतिस्वर, ग्राम, मूर्छना, जाती इ. विषय दिले यात आहेत. दुसऱ्या रागविवेक या अध्यायात रागवर्गीकरण, २६४ रागांची विस्तृत माहिती मिळते. तिसऱ्या प्रकीर्णकाध्यायात वाग्गेयकाराची (संगीतकार) लक्षणे, गायकाचे गुण-दोष आणि त्याचे प्रकार, आवाजाचे प्रकार, वृन्दगान (गायक-वादकांचा संघ) इ.विविध विषय आले आहेत. चौथ्या प्रबंधाध्यायात तत्कालीन प्रचारातील विविध गानप्रकारांचे वर्णन आहे. प्रबंध म्हणजे बंदिश किंवा चीज म्हणजेच गीत. यात वर्णिलेले काही प्रबंध आजही आपणास पाहायला मिळतात, जसे चर्यागीत (आसाम), चर्चरी (चाचर अथवा ठुमरी), पद्धाडी (पोवाडा), लोली (लोरी गीत), धवल (डोहाळे) इत्यादी. विशेष म्हणजे ध्रुव प्रबंधापासून धृपद या गानप्रकाराची उत्त्पती मानली जाते. आजची ख्यालगायकी म्हणजे या ग्रंथात वर्णिलेली रूपकप्रबंध किंवा रूपकालाप्तीच आहे असेही मानले जाते.
दुसऱ्या भागामध्ये पाचवा तालाध्याय आणि सहावा वाद्याध्याय असे दोन अध्याय आहेत. तालाध्यायामध्ये प्राचीन तालाचा विषय स्पष्ट केला आहे. वाद्याध्यायामध्ये तत, सुषिर, अवनद्ध व तालदर्शक घनवाद्ये हे चतुर्विध वाद्यप्रकार सांगितले असून त्यांच्या व्याख्या, प्रमुख वाद्यांची यादी, वाद्यवादनाचे प्रकार इत्यादी माहिती दिली आहे. तिसऱ्या भागामध्ये सातवा नर्तनाध्याय (नृत्याध्याय) असून यात नाट्य, नृत्य व नृत्त असे नृत्याचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यातच पुढे नवरसांचे वर्णन दिले आहे.
संगीतरत्नाकर या ग्रंथावर अनेक टीका लिहिल्या गेल्या. सिंहभूपाळ व कल्लिनाथ यांच्या टीका मुद्रितरूपात आहेत. केशवकृत टीका कौस्तुभ या नावाने, तर गंगारामकृत टीका सेतु या नावाने आहे. सेतु टीका व्रजभाषेत आहे. संगीतरत्नाकाराच्या स्वराध्यायाचे इतर भाषांतही भाषांतर झाले आहे. ते पुढीलप्रमाणे – पं. वाडीलाल-गुजराती (१९११); डॉ. कुन्हन राजा-इंग्रजी (१९४५); हाथरस-हिंदी (१९६४). नृत्याध्यायाचे इंग्रजी भाषांतर राजा के. कुजुन्नु यांनी ब्रह्मविद्या या नावाने केले आहे (१९५९).
संदर्भ :
- आचरेकर, बा. गं., भारतीय संगीत व संगीतशास्त्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७४.
- देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळासाठी सुविचार प्रकाशन मंडळ, नागपूर, १९७९.
समीक्षक – मनीषा पोळ
#बृहद्देशी#नारदीय शिक्षा#स्वरमेलकलानिधि