संगीतरत्नाकर  या शार्ङ्गदेवलिखित ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या प्रकरणात रागांग निर्णय हा विषय विस्ताराने सांगितला आहे. त्यात रागाची छाया घेऊन गायन करणे त्यास रागांग म्हणावे, असे म्हटले आहे. शिवाय ग्रामरागांचे मर्यादित वर्गीकरण देऊन नंतर अनेक रागांची नामावली व लक्षणे देण्यात आली आहेत. कित्येक ग्रंथकारांनी विशिष्ट पद्धतीने रागांचे वर्गीकरण करून नंतर प्रत्येक वर्गातील रागांचे विवेचन केले आहे. शुद्ध व विकृत स्वराधिकृत राग, उत्तम-मध्यम राग; मुख्य राग व उपराग, राग आणि रागभार्या व त्यांचा पुत्रपौत्रादिक विस्तार, जन्य-जनक राग, आश्रयी-आश्रित राग, मेळ आणि तज्जन्य राग अशी अनेक प्रकारची वर्गवारी वेगवेगळ्या ग्रंथकारांनी दिली आहे. या वर्गीकरणातून काही राग हे मूळ असून इतर रागांचा उद्भव त्यापासून झाला आहे, हे दिसून येते. प्रत्येक ग्रंथकाराने मानलेल्या मूळ रागांची नावे आणि संख्या यात भेद असला, तरी मूळ राग आणि तज्जन्य राग हे सूत्र रागांच्या वर्गीकरणात प्रभावी असल्याचे दिसून येते. मूळ राग कोणते, किती आणि ते का मानावेत यांसंबंधी मतैक्य आढळत नाही. या सर्वांचा साकल्याने विचार करून पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं.नारायण मोरेश्वर खरे यांनी रागांग वर्गीकरणाची स्वतंत्र पद्धत निर्माण केली. त्यांनी सर्व रागांचा सूक्ष्म अभ्यास करून ३० स्वरसमुदायांची निवड केली व ३० रागांगांमध्ये सर्व रागांचे विभाजन केले. या वर्गीकरणामध्ये ‘स्वर साम्य’ प्रकारावर अधिक भर दिला आहे. प्रत्येक रागांगांचे स्वत:चे असे एक वैशिष्ट्य किंवा ओळख असते की, जी त्या अंगाच्या सर्व रागांमध्ये दिसून येते किंवा काही रागांमध्ये असे स्वरसमुदाय असतात की ज्यामुळे त्या रागाची स्वतंत्र ओळख दिसते. असे स्वतंत्र अंग असणारे राग रागांग वर्गीकरण पद्धतीमध्ये प्रमुख राग मानले गेले आहेत.

समीक्षण : सु. र. देशपांडे