याला चलनशील किंवा गतिविशिष्ट बाष्पित्र असेही म्हणतात. वाहनांमधील वाफेच्या एंजिनाला चालविण्याकरिता लागणारी वाफ तयार करण्यासाठी या एंजिनाचा शोध लावण्यात आला. हे एक अग्नी-नलिका बाष्पित्र आहे. याचे मुख्यत्वे तीन भाग असतात. अग्नी-कुपी (Fire box), नळकांडे व धूम्र-कुपी (Smoke box). अग्नी-कुपीच्या आत जाळीवर कोळसा इंधन म्हणून जाळला जातो. इंधनद्वारातुन कोळसा / इंधन पुरवठा केला जातो. अग्नी-कुपीत एक आगविटेपासून बनविलेली कमान असते. इंधनाच्या ज्वलनामुळे तयार होणारे उष्ण वायू या कमानीद्वारे वळविल्या जातात. नळकांड्यात असलेल्या अग्निनलिकांच्या सभोवती पाणी असते. या नलिकांमधून हे उष्ण वायू प्रवास करतात. उष्णवायूंमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन वाफ तयार होते. ही वाफ नळकांड्याच्या वर असलेल्या वाफेच्या पिंपात जमा होते. ह्या वाफेत बाष्पाचे प्रमाण असल्यामुळे ही वाफ संपूर्ण कोरडी नसते. त्यामुळे ह्या बाष्पित्रात ह्या वाफेला कोरडे करण्या करता व तिला अतिउष्ण करण्याकरता अतितापक (Supper-heater) लावलेले असतात. अतितापकात नलिकांचे जाळे असते. हे जाळे प्रवेशाची मुख्य नलिका व निवेशाची मुख्य नलिका यांस जोडलेले असते. बाष्पयुक्त वाफ प्रवेशाच्या मुख्य नलिकेतून प्रवेश घेऊन, नलिकांच्या जाळ्यातून पुढे निवेशाच्या मुख्य नलिकेतून अतिउष्ण व कोरड्या वाफेच्या स्वरूपात बाहेर पडते. ही अति उष्ण व कोरडी वाफ वाफेचे एंजिने चालविण्यासाठी वापरल्या जाते. तयार झालेला धूर या नलिकांमधून प्रवास करून धूम्र-कुपीत येतो. धूम्र-कुपीतून पुढे तो चिमणी वाटे बाहेर सोडला जातो. या धूम्र-कुपीस एक भले मोठे दार असते. या दाराद्वारे धूप-मालिकांची साफ-सफाई व बाष्पित्रांची देखभाल करणे सुलभ होते.
हे चल-बाष्पित्र असल्यामुळे यास परंपरागत धूराडे नसते. धूर बाहेर घालविण्यासाठी वाफेच्या एंजिनामधून उत्सर्जित झालेला वाफेचा झोत वापरला जातो. ही एक प्रकारची अप्राकृतिक झोत पद्धती आहे.
संदर्भ :
- मराठी विश्वकोश : खंड ११, पृष्ठ क्र. ५०९ ते ५१८.