सुलभ अनुलंब बाष्पित्रास  दंडगोलाकृती अनुलंब कुपी असते. या कुपीत दंडगोलाकृती ज्‍वलनकोठी (firebox) असते. या ज्‍वलनकोठीच्या वरील बाजूस एक अनुलंब नलिका असते ज्याद्वारे बाष्पित्रांतील ज्वलनवायू उत्सर्जित केला जातो. पाण्याचे अभिसरण चांगले होण्यासाठी व उष्णता वहन पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढविण्यासाठी काही आडव्या नलिका लावलेल्या असतात. ज्‍वलनकोठीच्या तळाशी इंधन (कोळसा) ज्वलनासाठी एक शेगडी (विस्तव जाळी) असते. उष्णता वहन करणाऱ्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ इंधन शेगडीच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या अंदाजे ७ – १० पट असते. बाष्पित्र कुपीच्या आतील भागात प्रवेशासाठी व तपासणीसाठी मनुष्य किंवा त्याचा हात आत जाऊ शकेल अशा आकाराची तपासकुंडी कुपीच्या बाहेरून आत पर्यंत उपलब्ध केलेली असते. शेगडीतून ज्वलनानंतर उत्पन्न झालेला उष्ण वायू वर जाऊन कुपी व नलिकांतील पाण्याला गरम करतो. कालांतराने या पाण्यापासून वाफ तयार होते व ती वाफेच्या पिंपात (drum) जमा होत जाते. वाफेच्या पिंपाच्या ऊर्ध्वभागी असलेल्या बाष्प नियंत्रित करण्याच्या झडपेने हवी तेव्हा व हवी तेवढी वाफ वापरता येते. ह्या प्रकारच्या बाष्पित्रांमध्ये १००० कि. ग्रॅ. प्रति तास या क्षमतेने व अधिकतम १० बारच्या  दाबाने वाफ तयार करता येते. या बाष्पित्रांचा आकार साधारणतः ०. ६ – २ मी. व्यास व १.२ – ४ मी. उंच असा असतो. या बाष्पित्रांची कार्यक्षमता जवळपास ५०% असते.

आ. १. कॉक्रन धूमनलिका बाष्पित्र : (१) राखोडे, (२) विस्तव जाळी, (३) भट्टी, (४) धूमनलिका, (५) ज्वलन कोठी, (६) दाबपात्र, (७) वाफेकरिता जागा, (८) धूरांडे, (९) धूमकोठी, (१॰) पाणी.

कॉक्रन बाष्पित्र (Cochran Boiler) : हे एक अनुलंब अग्नि-नलिका बाष्पित्र आहे. सुलभ अनुलंब बाष्पित्रातील उष्णता वहन पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढविण्याच्या उद्दिष्टाने हे बाष्पित्र विकसित करण्यात आले. यातील उष्णता वहन पृष्ठभाग इंधन ज्वलन शेगडीच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या अंदाजे १०-२० पट असतो. यांस एक दंडगोलाकृती भांडे असून त्यावर अर्धगोलाकृती (hemispherical) शिखरटोपी असते. या अर्धगोलाकृती भौमितीय रचनेमुळे त्यात अधिक वाफ साठवली जाते. त्याचप्रमाणे त्यास अधिक शक्ती प्रदान केली जाते व अधिकतम  प्रारणिक (radiant) ऊर्जेचे शोषण केले जाते. या बाष्पित्राची ज्‍वलनकोठीसुद्धा अर्धगोलाकृती असते. ज्वलन कक्षेेच्या सभोवती उच्चतापसह (refractory) सामुग्रीचा लेप लावलेला असतो. इंधन ज्वलनाने तयार झालेला धूमवायू (वाहिनी वायू; flue gas) धूम नलिकेद्वारे (अलगूज नळी; flue pipe) ज्‍वलनकोठीतून ज्वलनकक्षाकडे वाहतो. ज्‍वलनकोठीत संपूर्ण ज्वलन न झालेल्या इंधनाचे पूर्ण ज्वलन या ज्वलनकक्षात होते व त्यानंतर हा उष्ण वायू सर्व नलिकांत पसरतो. या नलिकांची अंतिम टोके/तोंडे धूम कुपीत (smoke box) उघडतात . या धूमकुपीच्या वर धुरांडे (chimney) असते. या बाष्पित्राची ज्‍वलनकोठी स्वतंत्र असल्यामुळे यात कोणतेही इंधन जसे लाकूड, भुसा (paddy husk), उसाची चिपाडे (bagasse), इंधन तेल इ. चे सहज ज्वलन होते. या बाष्पित्रांची वाफ तयार करण्याची साधारण क्षमता २० – ३०००  कि. ग्रॅ. प्रति तास असून दाब २० बार पर्यंत असतो. या बाष्पित्रांच्या कुपीचा व्यास १ – ३ मी. असून उंची २ – ६ मी. असते. यांची कार्यक्षमता ७० ते ७५% असते (आ. १).

आ. २. लँकाशर बाष्पित्र : (अ) पार्श्वदर्शन : (१) उत्सर्जन झडप, (२) राखोडे, (३) विस्तव जाळी, (४) भट्टीचा दरवाजा, (५) संभरण झडप, (६) संरक्षक झडप, (७) जलपातळी धोकासूचक, (८) तपास विवर, (९) वाफ विलगक, (१॰) मुख्य वाफ झडप, (११) दाबपात्र, (१२) अधितापक स्थान, (१३) धुराड्याकडे जाणारा मार्ग, (१४) खालचा धूममार्ग, (१५) भट्टीनळ; (आ) पुरोदर्शन : (११) व (१५) (अ) प्रमाणेच.

लँकाशायर बाष्पित्र (Lancashire Boiler) : लँकाशायर बाष्पित्र हे एक क्षैतिज (horizontal) अग्नि-नलिका बाष्पित्र आहे. ते विटांनी केलेल्या एका विशिष्ट बैठकीवर आरोहित असते. यातील कुपीला पाणी वाहून जाण्यासाठी त्यास १ : २५० असा उतार दिला असतो. यांस एक दंडगोलाकृती कुपी असून ती दोन्ही बाजूंस अंत थाळीला गासट (gusset) थाळीने ने जोडलेले असते. दोन अग्नि-नलिका (fire tube)  बाष्पित्राच्या संपूर्ण लांबीपर्यंत टाकलेल्या असतात. मुख्य नलिकेच्या व्यासाच्या निम्म्या पेक्षा कमी अग्नि-नलिकांचा व्यास असतो व त्यांचा व्यास पुढील बाजूस थोडा अधिक कमी केलेला असतो. त्यामुळे उष्ण धूम वायू सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पोहचतो.  या बाष्पित्रामध्ये घन इंधन वापरतात. हे इंधन भट्टीतून बाहेर पडू नये म्हणून अग्नी-अवरोधकाची तरतूद केलेली असते. या अवरोधकामुळे हवा व धूमवायूचे योग्य मिश्रण होऊन संपूर्ण ज्वलन होण्यास मदत होते. उष्ण वायू शेगडीच्या जाळीवर इंधनाचे ज्वलन झाल्यावर निर्माण होऊन अग्नि-नलिकांत शिरतात. ते बाष्पित्राच्या पृष्ठाभागाकडे जाऊन तल धूम नलिकेतून (bottom flue) बाष्पित्राच्या पुढील भागाकडे जातात. यानंतर ते पार्श्वधूम (बाजूंच्या) नलिकांतून (side flue) मुख्य निवेश मार्गात जातात. या प्रवासात हे उष्ण वायू आपली उष्णता कुपीतील भरण जलाला देतात. एकूण उष्णतेपैकी सुमारे ८५% उष्णता अग्नी-नलिकांच्या पृष्ठभागाद्वारे व उरलेली १५% उष्णता तल नलिका व पार्श्व नलिकांद्वारे हस्तांतरित केली जाते. उष्ण वायूंनी उष्णता दिल्यानंतरचा धूमवायूचे बाष्पित्रातून उत्सर्जन होणे आवश्यक असते. त्यासाठी त्याच्या दाबातील फरक नियंत्रित करावा लागतो. पार्श्वधूम नलिकांना असलेल्या नियंत्रक झडपांद्वारे हा झोत नियंत्रित केला जातो. छोट्यात छोट्या लँकाशायर बाष्पित्राचा व्यास २ मी. व लांबी ५ मी. असते, त्याचप्रमाणे  मोठ्यात मोठ्या बाष्पित्राचा व्यास ३ मी. व लांबी १० मी. असते. या बाष्पित्रातून सर्वसाधारणपणे ०.७ – २.० मेगा पास्काल इतक्या दाबाची वाफ मिळू शकते. या बाष्पित्राची कार्यक्षमता ६५% ते ७०% पर्यंत असते (आ. २).

आ. ३. कॉर्निश बाष्पित्र : (अ) पुरोदर्शन : (१) संधमन तोटी, (२) जाळी, (३) धूम नलिका, (४) अटकाव झडप, (५) प्रवेशविवर, (६) सुरक्षा झडप; (आ) पार्श्वदर्शन : (७) बाष्पित्र प्रकवच; (इ) ऊर्ध्वदर्शन : (८) भट्टी नलिका, (९) पार्श्व धूममार्ग.

कॉर्निश बाष्पित्र (Cornish Boiler) : एकच धूम नलिका असलेले हे क्षैतिज अग्नि-नलिका बाष्पित्र आहे. याची सर्वसाधारण रचना लँकाशायर बाष्पित्राप्रमाणेच आहे. एका मोठ्या कुपीत पाणी असून ते या एकमेव अग्नि-नलिके सभोवती असते. उष्ण धूमवायू नलिकांमधून पुढे गेल्यावर बाष्पित्राच्या टोकाला दोन भागांत विभागला जातो. नंतर बाजूच्या धूम नलिकांमधून प्रवाहित होऊन बाष्पित्राच्या समोरील बाजूस येऊन तेथून तो तल धुप नलिकेतून प्रवास करून चिमणीवाटे उत्सर्जित होतात. अशा रितीने हा उष्ण धूमवायू बाष्पित्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तीनदा प्रवाहित होतो. मुख्य कुपीच्या/भांड्याच्या तळाशी अवसादनाचे (sedimentation) प्रमाण अधिक असल्याने उष्णतेचे हस्तांतरण तल धूम नलिकांपेक्षा पार्श्व धूम नलिकांमधून जास्त होते. ह्या  बाष्पित्रात  साधारतः एका तासात १३५० कि. ग्रॅ. वाफ  १२ बार दाबापर्यंत तयार होते. याच्या मुख्य भांड्याची लांबी साधारणतः ४ ते ७ मी. व व्यास १२ मी. ते १.८ मी. असतो (आ. ३).

 

संदर्भ : https://boilersinfo.com/simple-vertical-boiler-working/