हरि केशवजी : (१८०४–१८५८). अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील एक लेखक आणि भाषांतरकार. संपूर्ण नाव हरि केशवजी पाठारे. जन्म मुंबईचा. रेव्हरंड केनी ह्याच्या हाताखाली त्यांनी इंग्रजी भाषेचे उत्तम शिक्षण घेतले. तसेच बाबा व्यास या शास्त्र्यांकडे संस्कृतचे शिक्षण घेतले. सरकारच्या शास्त्रीय खात्यासाठी शिक्षण देऊन नोकरवर्ग तयार करणाऱ्या कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस (१७९४–१८५१) ह्याच्या अभियांत्रिकी शाळेत हरि केशवजी हे कारकून होते. १८२९ मध्ये ठाणे कोर्टात मुख्य लिपिक व मराठी भाषांतरकार म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८२२ मध्ये मुंबईत ‘हैंदशाळा शाळापुस्तक मंडळी’ ही संस्था स्थापन करण्यात आली होती. ह्या संस्थेच्या माध्यमातून देशी भाषांद्वारा एतद्देशीय लोकांना भौतिक शास्त्रांचे ज्ञान करून देण्यास आरंभ झाला. यात हरि केशवजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. मिसेस मार्सेट ह्यांच्या कॉन्व्हर्सेशन्स इन नॅचरल फिलॉसफी ह्या पुस्तकाचे भाषांतर त्यांनी सिद्धपदार्थविज्ञानशास्त्रविषयक संवाद (१८३३) ह्या नावाने केले. उपर्युक्त भाषांतरित ग्रंथात हरि केशवजींनी परिभाषा आणि सूचीही दिलेली आहे. त्यांच्या रसायन-शास्त्रविषयक संवाद (१८३७) ह्या ग्रंथातही त्यांनी परिभाषा दिलेली आहे. त्यांचा हा ग्रंथही मिसेस मार्सेटच्या कॉन्व्हर्सेशन्स ऑन केमिस्ट्री ह्या ग्रंथावरून तयार केलेला आहे. हा ग्रंथ ‘जेम्स फेरीश साहेब, वास्तव्य मुंबई’ ह्याला अर्पण केला असून ह्या ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेवरून असे दिसते, की फेरीश साहेबाने हरि केशवजींना उपर्युक्त दोन्ही ग्रंथ समजावून देऊन त्यांचे मराठी भाषांतर करण्यास प्रवृत्त केले. रसायनशास्त्रावरील त्यांचा ग्रंथ गुरू आणि त्यांचे शिष्य गोपाळ व कृष्ण ह्यांच्यातील संवादातून उभा राहिलेला आहे. यामध्ये प्रकाश आणि उष्णता, वाफेचे यंत्र, ‘आक्सिजन’, ‘नैत्रोजन’, ‘सल्फर’, ‘फास्फोरस’ , मूलरूप पदार्थांचे स्वरूप व रचना, जीवरूप पदार्थांची रचना, जीवांचे इंद्रियव्यापार इ. अनेक विषय तपशीलवारपणे मांडलेले आहेत; मात्र रसायनशास्त्राचे पारिभाषिक शब्द त्यांनी तयार केले नाहीत. उलट, मूळ इंग्रजी शब्दांचीच अनेकवचने करणे, उदा., गॅस-ग्यासे, मसल-मसला . तसेच ग्यासरूपता, आसिडभवन, आक्सीडकरण ह्यांसारखे शब्द वापरले आहेत. रसायनशास्त्र हा विषय एतद्देशीयांस नवा होता त्यामुळे तो समजणे, त्याच्या परिभाषेचे आकलन होणे हे तसे कठीणच होते.

ह्यांखेरीज इंग्लंडचा वृत्तांत (१८३८), यात्रिक-क्रमण (१८४१, जॉन बन्यन ह्या इंग्रज लेखकाच्या द पिल्ग्रिम्स प्रोग्रेस ह्या विख्यातग्रंथाचे भाषांतर), शालोपयोगी नीतिग्रंथ (१८४६), शिक्षालाभनिबंध, देशव्यवहारव्यवस्था (१८५४, मिसेस मार्सेटकृत कॉन्व्हर्सेशन्स… व मिलकृत पोलिटिकल इकॉनॉमी ह्या ग्रंथांच्या आधारे) हे ग्रंथही त्यांनी लिहिले. शालोपयोगी नीतिग्रंथ हा ग्रंथ मॉरल टेल्स ह्या इंग्रजी ग्रंथाचे भाषांतर आहे. त्यातील काही भाग निबंधवजा, तर काही कथात्मक आहे. मिताहार, परोपकारबुद्धी, स्वदेशप्रीती ह्यांसारख्या विषयांची मांडणी निबंधात्मक असून कथात्मक भागात इसापनीतीतल्या अनेक कथा घेतलेल्या आहेत. हरि केशवजी यांचे चरित्र (१९११) या शीर्षकार्थाने त्यांचे चरित्र रामचंद्र हरी यांनी लिहिले आहे.

संदर्भ :

  • जोग, रा. श्री. संपा. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड चौथा, पुणे, १९६५ आवृ. दुसरी, १९७३.