छत्रे, सदाशिव काशीनाथ : ( १७८८ – १८३० ?). अव्वल इंग्रजीतील एक आरंभीचे मराठी ग्रंथकार आणि भाषांतरकार. ‘बापू छत्रे’ ह्या नावानेही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबईचा. मुंबईतील प्रसिद्ध वाळकेश्वर मंदिरातील पूजा अर्चा छत्रे कुटुंबाकडे होती. आरंभी संस्कृतचे अध्ययन केल्यानंतर व्यंकोबा नाईक ह्या मुंबईतील एका प्रतिष्ठित आणि विद्वान गृहस्थाच्या उत्तेजनाने त्यांनी इंग्रजीचा अभ्यास केला आणि त्या भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळविले. प्रथम काही दिवस सरकारी इंजिनिअराच्या कार्यालयात ‘रैटर’ म्हणून त्यांनी काम केले. पुढे ‘हैंदशाळा शाळापुस्तक मंडळी’ चे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक झाली (१८२३). ह्या पदावर असताना सिंहासनबत्तिशी (१८२४), बाळमित्र—भाग पहिला (१८२८), इसाप नीतिकथा (१८२८) आणि वेताळपंचविशी (१८३०) ही पुस्तके त्यांनी लिहिली. ह्यांशिवाय मराठी बोधवचने (आवृ. तिसरी, १८३१) हे पुस्तकही त्यांच्या नावावर मोडते. परंतु त्या पुस्तकावर त्यांचे नाव मात्र आढळत नाही. छत्र्यांचा बाळमित्र म्हणजे एका फ्रेंच कथाग्रंथावरून तयार केलेल्या बर्क्विन्स चिल्ड्रन्स फ्रेंड ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. व्याकरण, कोश ह्यांचा अभाव, थोडा शब्दसंग्रह इ. मराठी भाषेच्या स्वतःला जाणवणाऱ्या मर्यादा सांगून ह्या भाषेतील आपले भाषांतरही यथामतीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाळमित्राची भाषा ही इंग्रजी वळणाचीच आहे ; परंतु हा ग्रंथ छत्र्यांच्या काळी फार लोकप्रिय होता. हा आणि इसाप नीतिकथा ह्या दोन अनुवादित ग्रंथांबद्दल दादोबा पांडुरंगांनी आपल्या आत्मचरित्रात प्रशंसोद्गार काढले असून मराठीतील ‘गद्यात्मक ग्रंथांचे जनक’ म्हणून छत्र्यांचा गौरव केला आहे. बाळमित्राला जोडलेल्या प्रस्तावनेतून छत्र्यांची शास्त्रीय शैक्षणिक दृष्टी आणि बालमनाचे मार्मिक आकलन प्रत्ययास येत. नेटिव्ह सेक्रेटरीपदाचा राजीनामा दिल्यानंतर (सु.१८२९) उपयुक्त इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी वाळकेश्वर येथे एक छापखाना काढण्याचेही त्यांनी योजिले होते. तथापि त्यानंतर अल्पावधीत मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- दडकर, जया ; गणोरकर, प्रभा, संक्षिप्त मराठी वाङ्मकोश, जी.आर.भटकळ फाउंडेशन, मुंबई.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.