सरदेशमुख, त्र्यंबक विनायक : (२२ नोव्हेंबर १९१९ – १२ डिसेंबर २००५). श्रेष्ठ मराठी साहित्यिक. कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्यांची मुख्य ओळख आहे. त्यांचा जन्म अक्कलकोट (सोलापूर जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील विनायक मल्हार सरदेशमुख हे संस्थानिकांचे खाजगी सचिव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोटच्या शहाजी विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील ह.दे.प्रशाला येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात झाले. पुणे येथील टिळक शिक्षण महाविद्यालयातून त्यांनी बी.टी. ही पदवी आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातून एम.ए. ही पदवी मिळविली. आरंभी सोलापूर येथील रा.स.चंडक विद्यालयात त्यांनी १८ वर्ष शिक्षक म्हणून अध्यापन केले. नंतर १९६० मध्ये सोलापुरातील दयानंद महाविद्यालय येथे प्राध्यापकीस प्रारंभ करून १९७९ साली ते मराठी विभागप्रमुख म्हणून तेथून निवृत्त झाले.
सरदेशमुखांचे वडील विनायक मल्हार संस्थानात शिक्षक म्हणून रूजू झाले, आपल्या अंगभूत हुशारीवर मामलेदार होत अखेरीस राजाचे ते खासगी सचिव झाले. राजाच्या मृत्यूनंतर संस्थानातल्या अनागोंदीचा फटका बसल्याने कटू प्रसंगाला सामोरे जाऊन अक्कलकोट सोडून ते १९३१ मध्ये सोलापुरात आले. या घटनाक्रमाने पौगंडावस्थेत सरदेशमुखांना वेदना दिली. विनायक मल्हार पौराणिक साहित्यापासून आधुनिक युरोपीय साहित्यापर्यंतच्या अभिजात साहित्याचे व्यासंगी आस्वादक होते. त्यांच्या कविता, ग्रीक इतिहास – साहित्यावरील लेख तत्कालिन मासिकांमधून प्रकाशित झाले होते. यामुळे या सगळ्यांचे संस्कार शाळकरी वयातच सरदेशमुखांना लाभले होते. त्यांच्या घरातील ग्रंथसंग्रह समृद्ध होता. साहित्य निर्मितीला प्रेरणादायी असे हे वातावरण होते. स्वत: सरदेशमुख ह्यांनी मराठी साहित्याबरोबरच रवींद्रनाथ टागोर, जे. कृष्णमूर्ती, व्हिक्टर ह्यूगो, स्पॅनिश विचारवंत मीगेल दे ऊनामूनो ई हूगो, रशियन तत्त्वज्ञ निकोलाई ब्यरदयायेव्ह इत्यादींच्या साहित्याचे आणि विचारांचे प्रभावस्त्रोत आत्मसात केले होते.
कोणत्या तरी एकाच साहित्यप्रकारात लिहीत जावे, असा सरदेशमुखांच्या मनाचा कल नव्हता ; मात्र जे लिहायचे ते मनापासून अशी त्यांची मनोधारणा होती आणि तिला अनुसरून त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. सखोल चिंतनात्मकता त्यांच्या ठायी होती आणि तिचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येत राहतो. महाविदयालयात विदयार्थिदशेतच ते लेखन करू लागले होते. १९४४ साली त्यांची ससेमिरा ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर उच्छाद (१९७८), बखर एका राजाची (१९८३), डांगोरा एका नगरीचा (१९८८) ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. उत्तररात्र (१९५५) आणि कविता चंद्रकेतूची (१९९९) हे त्यांचे कवितासंग्रह. त्यांच्या समीक्षाग्रंथांत अंधारयात्रा (१९६८), गडकऱ्यांची संसारनाटके (१९७०), प्रदेश साकल्याचा (१९७९), रामदास : प्रतिमा आणि प्रबोध (१९८४), धुके आणि शिल्प (१९८५), शारदीय चंद्रकळा (१९९२) आणि स्फटिकदिवे (१९९९) ह्यांचा समावेश होतो. टाहो (१९८२) आणि थैमान (१९८६) ही दोन नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत. हेर्मान हेस, खलील जिब्रान, व्हिक्टर ह्यूगो आणि अझॅन योनेस्को ह्यांच्याही काही साहित्याचा त्यांनी अनुवाद केला आहे. हर्मन हेसेची सिद्धार्थ (नदीपार, १९५९) आणि जर्नी टु द ईस्ट ( सिद्धार्थ आणि पूर्वेची यात्रा,२००३), गुस्ताव यानूशचे कन्वरसेशन्स विथ काफ्का (काफ्काशी संवाद,२००६), खलिल जिब्रानची प्रॉफेट (देवदूत,२००३), गार्डन ऑफ प्रॉफेट आणि फोररनर (देवदूताचे विहारवन आणि अग्रदूत,२००८) आणि युजिन आयनेस्कोचे नाटक हाऊ टु गेट रीड ऑफ इट (मग एकच धडकी, २०१९) हे त्यांचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांचे काही लेखन मरणोत्तर प्रकाशित झाले आहे. परिवर्तनाला व्यापक परिप्रेक्षात पाहणारे सामाजिक विषयांवरील त्यांचे लेखन वाटा परिवर्तनाच्या (२०१९) या पुस्तकात संग्रहित झाले आहे.
ससेमिरा ही त्यांची विशीत लिहिलेली पहिलीच कादंबरी, महायुद्ध काळातील वादळी प्रेमकथा तीत आली आहे. त्यानंतर तीन दशकांनी बखर एका राजाची, डांगोरा एका नगरीचा आणि उच्छाद या कादंबरी त्रयीतून त्यांनी १९१३-१९६० या घटितांनी गजबजलेल्या दीर्घ कालखंडातल्या महाराष्ट्रातल्या एका संस्थानातले तरी पुरेसे प्रातिनिधिक म्हणता येईल असे वैयक्तिक तसेच सामुहिक र्हासपर्वाचे चित्रण केले आहे. ही कादंबरी त्रयी मराठीतील काल्पनिक इतिहासाचा (Fictional History) दुर्मिळ नमुना असली तरी तिचे सामर्थ्य त्यापलीकडे जात तिला समूहाच्या सुखदुःखाशी जोडण्यात आले आहे. तिच्या तपशीलात्मक जडणघडणीसाठी सरदेशमुखांनी चार दशके केलेले अथक परिश्रम, तिच्यातून वाहते केलेले आपले जीवनसंदर्भ यांचे महत्त्व आहेच पण त्याही पलिकडे त्यांच्या साधारणीकरणातून त्यांचा जो सांगावा जाणवतो, तो प्रेम, आस्था, सामाजिक – वैयक्तिक सद्भाव, सामंजस्य यांची सार्वकालिक गरज अधोरेखित करणारा म्हणून महत्त्वाचा आहे. नोकरीपलीकडे सरदेशमुख यांच्या वडिलांचे आणि राजेसाहेबांचे संबंध मित्रत्वाचे होते. त्यांच्या चर्चेतून राजे ज्या व्यथावेदना व्यक्त करीत, त्यासंदर्भात बखर एका राजाची आणि डांगोरा एका नगरीचा ह्या दोन कादंबऱ्यांकडे पाहता येते. कादंबरी हा साहित्यप्रकार सरदेशमुखांना मुख्यतः सामाजिक विषयाच्या विवरणासाठी सोयीचा वाटत होता.
अल्प पण लक्षवेधी भावकविता असलेला उत्तररात्र आणि श्रेयस्कर मूल्यांच्या सार्वत्रिक विध्वंसकाळात सात्तिकाचे पायस मागणारी दीर्घकविता कविता चंद्रकेतूची हे त्यांचे कवितालेखन होय. सरदेशमुखांच्या उत्तररात्र मधील कविता सर्व दृष्टींनी सघन आहेत. कवितेला वैचारिकतेचे वावडे असू नये आणि तो आशय तीतून सहजपणे व्यक्त व्हावा अशी त्यांची धारणा होती. तसा प्रयत्न त्यांनी त्यांच्या ‘धिंड’ ह्या दीर्घकवितेत केला आहे. ह्या एका कवितेवर ते दहा वर्षे संस्कार करीत होते. बखरवरील टाहो आणि व्हिक्टर ह्युगोच्या लाफिंग मॅनचा आधार असलेले सामाजिक नाटक थैमान हे त्यांचे नाट्यलेखन होय.
अंधारयात्रा या पहिल्या समीक्षाग्रंथात त्यांनी केशवसुतांच्या पहिल्या कविता संग्रहापासून ते मर्ढेकरांची समग्र कविता (१८८५ ते १९५९) अशा साधारण पाऊण शतकातल्या मराठी कवितेचे बृहत्चित्र रेखाटतानाच कवितेची आधुनिकतेपासून अध्यात्मापर्यंत सर्व संकल्पनांच्या संदर्भात आत्मप्रत्ययी चिकीत्सा केली आहे. भावकविता, तिचे जन्मकारण, पोषण, आस्वाद्यता हा प्रामुख्याने प्रतिपाद्य विषय आहे. ह्या गंथात त्यांनी आधुनिक मराठी कवितेचा एक अन्वयार्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी आणि मर्ढेकर ह्या कवींच्या कवितांच्या अंतरंगाविषयीचे आपले चिंतन त्यांनी ह्या ग्रंथात प्रकट केले आहे. अंधारयात्रा ह्या ग्रंथनामाचा अर्थ ह्या चार कवींच्या भावविश्वात शोधता येतो. पुस्तकाच्या उत्तरभागात कवितेबद्दलचे मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. प्रदेश साकल्याचा मध्ये त्यांनी आधुनिकता, अस्तित्ववाद, विद्रोह अशा विविध संकल्पनांच्या संदर्भात साहित्याचे आकलन आणि त्या त्या संदर्भात समकालीन मराठी, इंग्रजी – युरोपिय पुस्तक – लेखकांची चिकित्सा केली आहे. साहित्याचा आणि समीक्षेचा जीवनाशी असलेल्या विविधांगी संबंधांचा शोध त्यांनी या ग्रंथातून घेतला आहे. रामदास : प्रतिमा आणि प्रबोध हा ग्रंथ लिहिताना महानुभाव पंथप्रवर्तक चक्रधर आणि ज्ञानदेव ते रामदास ह्या संतांचे साहित्य समाजाच्या सर्व थरांतील लोकांना आजही का प्रिय वाटते, ह्याचा शोध घेण्यास समीक्षेने पुढे आले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. समग्र साहित्यविषयक आकलनातून सिद्ध होत गेलेली समीक्षा धुके आणि शिल्प- मध्ये त्यांनी मांडली. यामध्ये गोविंदागज, नारायण सुर्वे, कवी ग्रेस आणि अमेरिकन कवयित्री एमिली डिकिन्सन ह्यांच्यावरचे लेख आहेत. ह्यांशिवाय एका बेचैन, अस्वस्थ जीवनावस्थेत आत्महत्या केलेल्या एका तरूण कवीवरही त्यांनी लिहिले आहे. पुढे शारदीय चंद्रकळा (१९९२) मधून दलित साहित्य, नारायण सुर्वे, ग्रेस, कुसुमाग्रज, मुक्तिबोध, एमिली डिकीन्सन, ब्रेख्त, आयनेस्को, व्हिक्टर ह्युगो आदिंच्या साहित्यातले अंत:प्रवाह यात त्यांनी उलगडले आणि तसेच आपले साहित्यविषयक चिंतनही सिद्धीस नेले. राम गणेश गडकरी यांच्या चार पूर्ण नाटकांचा वेगळा, सर्वांगीण परामर्श घेणारे गडकऱ्यांच्या ५० व्या स्मृतीवर्षात आलेले गडकऱ्यांची संसारनाटके (१९६९), सांप्रदायिक समर्थांना मुक्त करणारे रामदास : प्रतिमा आणि प्रबोध (१९८४), खलील जिब्रान – जे. कृष्णमूर्ती आदि अध्यात्मिक प्रतिभावंतांचा परामर्श घेणारे स्फटिकदिवे (१९९९) आणि अभिज्ञान शाकुंतल मधील सौंदर्यस्थळे तपशीलाने उलगडणारे कालिदास आणि शाकुंतल: एक अर्ध्यदान (२०१४) हे सरदेशमुखांचे अन्य समीक्षालेखनही महत्त्वाचे आहे. गडकऱ्यांची संसारनाटके ह्या ग्रंथात पुढल्याही पिढयांना प्रेरक ठरतील अशी गडकऱ्यांची बलस्थाने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याशिवाय नट, नाटक आणि आपण (२०१९) यात जागतिक रंगभूमीवरील महत्वाच्या नाटकांचा परामर्श घेत आपले नाट्यविषयक चिंतन त्यांनी सिद्धीस नेले आहे.
समीक्षाच नव्हे तर सरदेशमुखांच्या सर्वच लेखनाला जात-धर्म भुगोलाची मर्यादा ओलांडणाऱ्या, आपल्या अस्तित्वाचा तळ – अर्थ शोधू पाहणाऱ्या अध्यात्माचे परिमाण आहे. त्यामुळे त्यांचे लेखन एकाच वेळी ह्युगो, हेसे, जिब्रान पासून बर्दिएव, किर्केगार्ड, रसेल पर्यंत – ज्ञानदेव, तुकाराम, रामदासांपासून मर्ढेकर, दिलीप चित्र्यांपर्यंत जगभरच्या प्रतिभावंतांशी जोडलेले होते, संवादी होते. सरदेशमुखी अध्यात्माचा संबंध माणसाच्या अस्तित्वविषयक प्रश्नांशी आहे,त्याच्या आत्मप्रत्ययाशी आहे. हेच त्यांना समीक्षेचे आधारसूत्र वाटते. त्यांच्या समीक्षेला कधी कधी अध्यात्मवादी हे विशेषण लावले गेले आहे. अध्यात्मविचार हा सर्वजीवनस्पर्शी विचार आहे, असे ते मानत. समीक्षा आणि साहित्य यांना जीवनाच्या समग्रतेपासून तोडून पाहता येत नसल्यामुळे आपली समीक्षा आध्यात्मिक विचाराशी कुठे कुठे जोडली गेली असेल, असे ते म्हणत. अनुवाद प्रक्रियेसंदर्भात ‘मूळ लेखक मौनात, आपण त्याच्याशी संवादात’ असा सरदेशमुख विशद करतात.
त्यांच्या साहित्यविषयक कार्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (डांगोरा), फाय फौंडेशन पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार, प्रियर्शिनी अकादमी पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, उच्छाद, बखर एका राजाची, डांगोरा एका नगरीचा या कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार, रामदास : प्रतिमा आणि प्रबोध आणि शारदीय ग्रंथकळा ह्या गंथांना प्रा. रा. श्री. जोग पुरस्कार, नाट्यसमीक्षेसाठी माधव मनोहर पुरस्कार, मसाप जीवनगौरव असे सन्मान त्यांना लाभले आहेत. वयाच्या ८७ व्या वर्षात सोलापूर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले .
संदर्भ :
- गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.