कानिटकर, काशीबाई : (२० जानेवारी १८६१-३० जानेवारी १९४८). आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका.आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी ,चरित्र आणि कथा या साहित्याप्रकाचे महिला म्हणून प्रथमता लेखन केले आहे. काशीबाई या पंढरपूरचे कृष्णराव बापट यांच्या कन्या. २० जानेवारी १८६१ रोजी  सातारा जवळील अष्टे या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत, ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या. त्याकाळात स्त्रीशिक्षणाला विरोध होत असे. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे या अशा पद्धतीने शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. तत्पूर्वी वयाच्या ९ व्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले. ते सुधारणावादी होते. हरिभाऊ आपटे, न्या. रानडे यांच्या सहवासामुळे स्त्रियांनी शिकावे अशा विचारांचे ते होते. पण उघडपणे त्याकाळात काशीबाईंचे शिक्षण सुरू ठेवण्याची सोय नव्हती. पण तरीही काशीबाई टीका सहन करीत चोरून मारून शिकत, वाचत राहिल्या. गोविंदरावांसोबत त्या रविवारी दुपारी प्रार्थनासमाजातील सभांना जात असत, चर्चेत भाग घेत असत. घरी समजले की खूप गहजब होत असे. मग त्यांच्यावर घरातील अवघड व श्रमाची कामे लादण्यात येत असत. पण ते काहीही असल तरी त्यांना या प्रार्थना समाजातील व्याख्याने ऐकून शास्त्रीय विषयांची गोडी लागली. त्यांनी मराठीतील प्राथमिक शास्त्रीय पुस्तके वाचली. तसेच मंडलिकांचा इतिहास, अर्थशास्त्र, कादंबरीसह भारतसार व पेशवे, होळकर, पटवर्धन, शिवाजी महाराज इ. बखरीही त्यांनी वाचल्या. याशिवाय कुमारसंभव, किरातार्जुनीय, मेघदूत या संस्कृत नाटकातील बरेचसे श्लोक त्यांनी तोंडपाठ केले होते. शाकुंतल, वेणीसंहार, मृच्छकटिक, मुद्राराक्षस इ. संस्कृत नाटकांचे वाचनही त्यांनी केले होते. इंग्रजीही त्या शिकत होत्या. गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून  मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. तेव्हा गोविंदरावांबरोबरच हरिभाऊ आपटे  काशीबाईंना लेखनास उत्तेजन देत असत. या नियतकालिकात काशीबाईंचे लेखन सुरू झाले. शेवट तर गोड झाला (१८८९) हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. काशीबाईंना प्रथम लिहावेसे वाटले ते प्रार्थनासमाजातील सभांना त्या जात असत (इ.स. १८८१). त्यामुळेच आपले लिहिणे आणि आपले संसारातील जगणे यातील एका तणावपूर्ण गमतीदार नात्याचा शोध त्यांना लागला आणि त्या लिहू लागल्या.

मनोरंजन,नवयुग आणि विविधज्ञानविस्तार आदि मासिकांमधून काशिबाईचे स्फुटलेखन प्रसिद्ध झाले आहे. रंगराव (१९०३) व पालखीचा गोंडा (१९२८) या कादंबऱ्या आणि शेवट तर गोड झाला (१९८९), चांदण्यातील गप्पा (१९२१), शिळोप्याच्या गोष्टी (१९२३) हे कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. डॉ.आनंदीबाई जोशी :चरित्र व पत्रे या चरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच ख्याती मिळाली. हरीभाऊंची पत्रे  हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.१९८८ मध्ये गोविंदराव अलिबाग मुक्कामी मुन्सफ होते. तेव्हा तेथील वास्तव्यात काशीबाईंनी चांदण्यातील गप्पांतील कथांचे लेखन केले. या संग्रहात शिसवी पेटी, मारूतीचा प्रसाद, वनवास, सारसबाग, लावण्यवती अशा एकूण पाच कथा आहेत. ही कथामालिका १९०४ मध्ये मासिकातून प्रसिद्ध होत होती. साध्या, सरळ शैलीतील या कथा केवळ करमणुकप्रधान तर नाहीतच, पण विविध मानवी स्वभावाचे रेखाटन चांगले झाले आहे. या कथांमधील राजकन्या, चंपी अथवा मथुताई, स्वरुपसिंह यांच्या व्यक्तिरेखाटनातून काशीबाईंची सूक्ष्म अवलोकन शक्ती आणि साधी, सरळ वर्णनशैली जाणवते. शिळोप्याच्या गोष्टीतील कथांमध्येही काशीबाईंनी विविध स्वभावाच्या माणसांचे नमुने वर्णिले आहेत. केवळ करमणुसाठी, मनोरंजनासाठी अशी एकही कथा त्यांनी लिहिलेली नाही. त्यांच्या पहिल्या रंगराव या कादंबरीची पहिली ३६ प्रकरणे मनोरंजन  आणि निबंधचंद्रिका  या मासिकात प्रसिद्ध झाली. स्त्रीची सुखदु:ख, कर्तबगारी या साऱ्याचं चित्रण त्यांच्या रंगराव  या कादंबरीत रेखाटलं आहे. पती शिकायला वा नोकरीच्या निमित्ताने परगावी मग एकत्र कुटुंबात अल्पवयी मुलींना होणारा सासुरवास, अपत्यहीन स्त्रीला भोगावे लागलेले शाब्दीक चटके. पैसा नाही, आधार नाही अशा निराधार अवस्थेत, कुठेतरी अपार कष्ट आणि अवेहेलना सोशित राहणाऱ्या बालविधवा या साऱ्याचे चित्रण त्यांच्या इतर लेखनाप्रमाणेच पहिल्या रंगराव या कादंबरीत आले आहे. पालखीचा गोंडा (१९२८) या कादंबरीमध्ये  पात्र रेवतीचे लग्न एका वेडगळ संस्थानिकाशी होते. पण ती संस्थानाची सर्वांगीण प्रगती साधून अनेक सुधारणा घडवून आणते. अखेर राज्यकारभार प्रजेच्या हाती देऊन मन:शांतीसाठी यात्रेला निघून जाते. रेवतीच्या निमित्ताने त्यांनी स्त्रीला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाची जाणीव वाचकांना करून दिली आहे.

डॉ. आनंदीबाईंच्या चरित्र लेखनाला हात घालण्याची आपली कुवत नाही, असे प्रामाणिकपणे म्हणतच, इंग्रजी शिकत, आनंदीबाईसंबंधी देशभगिनीने लिहिणे कर्तव्य आहे या भावनेने त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशींचे चरित्र लिहिले . यादृष्टीने त्या मराठीतील आद्यचरित्र लेखिका ठरतात.जे. कृष्णमूर्ती यांच्या अॅट द फिट ऑफ द मास्टर या पुस्तकाचे गुरुपदेश (साधन चतुष्ट्य) हे भाषांतर १९११-१२ मध्येच काशीबाईंनी केले आहे. काशीबाई कानिटकरांनी आपले आत्मचरित्र लिहावयाला सुरुवात केली होती; काही कारणास्तव त्यांचे हे लेखन अधुरे राहिले. पुढे सरोजिनी वैद्यांनी मूळ कागदपत्रांच्या आधारे १९०९ ते १९४८ पर्यंतचा भाग काशीबाईंचे चरित्र या रूपात लिहिला आणि १९८० मध्ये श्रीमती काशीबाई कानिटकर-आत्मचरित्र आणि चरित्र (१८६१-१९४८) हे पुस्तक प्रसिद्ध केले. काशीबाईंच्या लेखनाला उत्तेजन देण्यासाठी, स्नेहभावाने हरिभाऊ आपटे पत्रे लिहित असत. हरिभाऊंची पत्रे (१९२९) या शीर्षकाने काशीबाईंनी ती पत्रे संपादित केली होती. काशीबाईंचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात. पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते. १९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनाचे गोविंदराव कानिटकर अध्यक्ष होते. त्या संमेलनाला त्या एकट्या स्त्री लेखिका उपस्थित होत्या. १९०९ मध्ये वसंत व्याख्यानमालेत काशीबाई अध्यक्ष होत्या. त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ठरल्या. पुणे सेवासदन संस्थेच्या स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग होता. रमाबाई रानडे सेवासदनच्या अध्यक्षा तर काशीबाई उपाध्यक्षा होत्या. पंडिता रमाबाईंबरोबर काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाला हजर असणाऱ्या आठ महिला सदस्यांपैकी महाराष्ट्रातील एकमेव हिंदू महिला-काशीबाई उपस्थित होत्या. त्या थिऑसॉफिस्ट होत्या. त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे काशी येथे ब्रह्मचिंतनात घालवली.

संदर्भ :

  • वैद्य,सरोजनी ,श्रीमती काशीबाई कानिटकर,आत्मचरित्र आणि चरित्र (१८६१-१९४८),पॉपुलर प्रकाशन, मुंबई.
  • Kosambi,Meera(Edi),Women writing gender: Marathi fiction before independence,Permanent Black,Delhi,2012.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा