वैद्य, चिंतामण विनायक : (१८ ऑक्टोबर १८६१–२० एप्रिल१९३८). एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार. जन्म कल्याण (ठाणे जिल्हा) येथे. वडील विनायकराव कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्‌फिन्स्टन स्कूल व एल्‌फिन्स्टन कॉलेजात झाले. एम्‌.ए. (१८८२) आणि एल्‌एल्‌. बी. (१८८४) झाल्यानंतर काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर उज्जैन येथे न्यायाधीश पदावर ते रुजू झाले. पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली (१८९५–१९०४).

सेवानिवृत्तीनंतर १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्य करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी कॉंग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी म. गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढे चिंतामणरावांनी राजकारण सोडले.

वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात विपुल लेखन ( सु. ५०,००० पृष्ठांचे) केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी थोडेच लेखन ग्रंथरूपाने संगृहीत झाले. इंग्रजी (९) व मराठी (२०) अशा त्यांच्या एकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस आहे. त्यांपैकी काही उल्लेखनीय ग्रंथ असे : महाभारत : ए क्रिटिसिझम (१९०४), संक्षिप्त महाभारत (१९०५), रिडल ऑफ रामायण (१९०६), अबलोन्नतिलेखमाला (१९०६), एपिक इंडिया (१९०७), मानवधर्मसार -संक्षिप्त मनुस्मृति (१९०९), दुर्दैवी रंगू (१९१४), श्रीकृष्ण चरित्र (१९१६), महाभारताचा उपसंहार (१९१८), हिस्टरी ऑख मिडिव्हल हिंदु इंडिया ( ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६), संस्कृत वाङ्‌मयाचा त्रोटक इतिहास (१९२२), मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५), गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या (१९२६), ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६), वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१), शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१), हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१), महाभारताचे खंड – सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५), संयोगिता नाटक (१९३४).

या ग्रंथांपैकी महाभारत : ए क्रिटिसिझम यावर लोकमान्यांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे आणखी एक अग्रलेख लिहून परीक्षण केले. रामायणमहाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी एपिक इंडियाश्रीकृष्ट चरित्र हे ग्रंथ महाभारताच्या संदर्भात लिहिले. महाभारताचा तर्कशुद्ध सखोल प्रगाढ अभ्यास त्यांतून जाणवतो. महाभारताची सर्वंकष मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून लोकमान्यांनी वैद्यांना `भारताचार्य’ ही पदवी दिली. गणेश विष्णू चिपळूणकर आणि मंडळी यांनी श्रीमत्‌ महाभारताचे मराठीत नऊ खंडांत सुरस भाषांतर प्रसिद्ध केले (१९०४–१२), त्याचा उपसंहार वैद्यांनी लो. टिळकांच्या सूचनेनुसार लिहिला (१९१८). त्याची पृष्ठसंख्या ५८० असून त्यात अठरा प्रकरणे व एक परिशिष्ट आहे. वैद्य यांचे सारे विवेचन साधार आणि विवेकयुक्त आहे. केवळ धर्मग्रंथ व पाठग्रंथ म्हणून असलेली रामायण-महाभारत या प्राचीन ग्रंथांची पारंपरिक महती बाजूला ठेवून वैद्यांनी ही महाकाव्ये, विशेषतः इतिहासाचे ग्रंथ आहेत, हे प्रथम लक्षात घेतले. रिडल ऑफ रामायण (वाल्मीकि रामायण-परीक्षण या नावाने याचा मराठी अनुवाद शि. गो. भावे यांनी प्रसिद्ध केला–१९२०) व महाभारताचा उपसंहार हे दोन ग्रंथ त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

संशोधनात्मक चिकित्सक लेखन करताना  नागेशराव बापट यांची पानिपतची मोहीम ही कादंबरी त्यांच्या वाचनात पडली. त्यावर त्यांनी घणाघाती टीका केली आणि दुर्दैवी रंगू ही ऐतिहासिक कादंबरी त्याच विषयावर एक आव्हान म्हणून लिहिली. पानिपतच्या युद्धाची हकीकत या दृष्टीने यात उत्तम विवेचन साधले आहे. तथापि विशुद्ध इतिहास व कादंबरीतंत्र या दृष्टींनी काही बाबतींत ती सदोष असली, तरी पानिपतच्या युद्धाची रोमहर्षक हकीकत, त्यावेळची सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि रीती सांगणारी आहे, यात शंका नाही. चरित्रनायिका बालविधवा रंगू हिच्या दुर्दैवाची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे.

मानवधर्मसारहिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून त्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे. वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया हा त्रिखंडात्मक ग्रंथ प्रथम इंग्रजीत लिहिला. आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद तीन खंडांत मध्ययुगीन भारत या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या आणि शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज हे दोन अन्य ग्रंथ होत. शिवाजी महाराजांचे चरित्र काहीसे टाचणवजा झाले असून त्यातून चरित्रनायकाचे व्यक्तिमत्त्व परिस्फुट होत नाही.

भाषाशास्त्र हे इतिहासतज्ञानाचे एक साधन असल्यामुळे वैद्यांनी भाषाशास्त्राकडे लक्ष पुरविले. राजवाड्यांच्या व्याकरणावरील परीक्षणात्मक पाच लेख, पुणे येथील सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनातील (१९०८) अध्यक्षीय भाषण, १९०९ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या निबंधांच्या व भाषणांच्या संग्रहातील काही लेख, विविधज्ञानविस्तारातून मराठी भाषेच्या उपपत्तीच्या निमित्ताने लिहिलेला लेख (१९२२, यातूनच मराठीतील गाजलेले वैद्य-गुणे-वाद निर्माण झाला), मराठी शब्दरत्नाकार (वा. गो. आपटे, १९२२) या शब्दकोशास लिहिलेली प्रस्तावना आदींतून त्यांची भाषाशास्त्राबद्दलची आवड, त्या विषयातील व्यासंग व अधिकार दिसतो.

महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९०८). भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरूपद त्यांनी भूषविले (१९२२–३४) व पुढे ते त्याचे कुलपती (१९३४–३८) होते. वैदिक संशोधन मंडळाच्या स्थापनेत ना. श्री. सोनटक्के यांना त्यांनी बहुमोल सहकार्य केले. टिळक विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्थेत ते शिकवीत असत. कल्याण येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • कुलकणी, द.भि. वैद्य, ना. भा. संपा. भारताचार्य चिं. वि. वैद्य स्मृतिग्रंथ, नागपूर, १९९६.
  • गद्रे, धुंडिराज त्रंबक, भारताचार्य नानासाहेब वैद्य, ठाणे १९३१.
  • दामले, द. मो. महाभारताचार्य चिं.वि. ऊर्फ नानासाहेब वैद्य चरित्र, भाग १ व २, १९७२.